Get it on Google Play
Download on the App Store

भाग १३

"आपल्यापैकी डॉ.अभिजीत आणि जॉर्डन कोण आहे?" जॉर्डनची टीम विमानातून खाली उतरल्यावर जपान सैन्यदलातील एक अधिकारी त्यांना विचारतो. डॉ.अभिजीत आणि जॉर्डन पुढे येतात.

"मी डॉ.अभिजीत आणि हे माझे सहकारी जॉर्डन आहेत. बोला, आम्ही आपली काय मदत करू शकतो?" डॉ.अभिजीत सैन्यदलातील अधिकाऱ्यांशी बोलतो.

"आपल्याला कळवण्यात अत्यंत दु:ख होत आहे की आपण ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यास भेटलात त्यांचा मृत्यू झाला आहे." एक अधिकारी म्हणतो.

"हो, आम्हाला ते कळलं. पण नक्की काय झालं आहे?" जॉर्डन म्हणतो.

"तुम्ही भेट घेतल्यानंतर ते वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कार्यालयात निवांतपणे बसले होते. आम्ही कार्यालयाबाहेर काम करत असताना आम्हाला आतमधून मोठ्याने किंचाळण्याचा आवाज आला. आत गेलो तर साधारण १० ते १२ फुट उंचीच्या एका महामानवाने त्यांचा गळा पकडून त्यांना उचललं होतं. त्या मानवाच्या शरीराला भेगा पडल्या होत्या आणि त्या भेगांमधून ज्वाला बाहेर निघत होत्या, त्याला बघताक्षणी आम्ही त्याच्यावर गोळीबार सुरु केला. तो एका विचित्र भाषेत काहीतरी बडबडला आणि तिथून निघून गेला. आम्ही अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी गेलो तर त्यांनी आम्हाला तुम्हाला सावध करायला सांगितलं आणि त्यांनी प्राण सोडला." तो अधिकारी बोलत असताना त्याच्या चेहऱ्यावर दुःख, भीती आणि चिंता असे तिन्ही भाव एकाच वेळी दिसत होते.

तिथे उभे असलेली जॉर्डनची संपूर्ण टीम घाबरून जाते. अधिकाऱ्यांना काय प्रतिक्रिया द्यावी हे त्याला सुचत नव्हतं. अधिकाऱ्यांना प्रतिक्रिया द्यावी कि टीमला सांभाळावं यात तो गोंधळला होता. आपण काहीतरी मोठी चूक करून बसलो आहोत याची त्याला आता जाणीव झाली होती. आपले दोन्ही हात तोंडावर ठेवून डोळे बंद करून तो तिथे असलेल्या खुर्चीवर बसला तोच डॉ.एरिक ओरडले.

"मित्रांनो, ते बघा टीव्हीवर काय दाखवत आहेत." विमानतळावरील टीव्ही वर बातम्या सुरु असतात. त्यामध्ये एक अज्ञात राक्षसाच्या धडकेने एक इमारत कोसळली असल्याचं वृत्त दाखवत होते.

"तुम्हा सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची आम्ही व्यवस्था केली आहे. कृपया आपण सर्वांनी समुद्रमार्गे चीन येथे जावे. तिथे आमचे सहकारी आपली सुरक्षा करतील. जोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येत नाही आपल्यापैकी कुणीही चीन मधून बाहेर निघू नका. आपणा सर्वांना इथे धोका आहे आणि आम्हाला तिथल्या सुरक्षा व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे."

जॉर्डन डॉ.अभिजीतकडे बघतो. डॉ.अभिजीत होकारार्थी मान हलवतो. जॉर्डन त्याच्या टीमसह सैन्यदलातील अधिकाऱ्यांबरोबर चीनला जाण्यासाठी रवाना होतो. ब्रूसला काही महत्वपूर्ण गोष्टी सोबत घ्यावयाचा असतात म्हणून काही अतिरिक्त सैन्यासह तो त्याच्या घरी जातो आणि इतर सर्वजण समुद्रमार्गे चीनला जाण्यासाठी रवाना होतात. समुद्रमार्गे जात असताना वाटेत डॉ.अभिजीत आणि जॉर्डन यांच्यात चर्चा होते.

"तुला काय झालं आहे? बातमी समजल्यापासून तू गोंधळलेला दिसतो आहेस." डॉ.अभिजीत जॉर्डनला विचारतो.

"आपल्या मोहिमेचे परिणाम इतके भयानक होतील याची मला जरादेखील कल्पना नव्हती. खरं तर मी हिमालयातच ही मोहीम थांबवायला हवी होती. भूकंप झाला तेव्हाच मी सावध व्हायला हवं होतं. मला अजूनही विश्वास बसत नाहीये की आपल्यामुळे एका दानवाने पृथ्वीवर जन्म घेतला आहे." जॉर्डन डॉ.अभिजीतला सांगत होता.

"शांत हो. झालं ते झालं. आता हे सर्व कसं निस्तारायचं ते बघायला हवं." डॉ.अभिजीत जॉर्डनला समजावण्याच्या स्वरात म्हणतो. ते दोघे बोलत असताना तिथे डॉ.मार्को येतात.

"त्या दानवाची काही माहिती मिळाली का?" डॉ.मार्को म्हणतात.

"अजून तरी नाही, आम्ही त्याच गोष्टीवर बोलत आहोत. तो नक्की कसा दिसतो, काय आहे, त्याची बलस्थानं आणि कमकुवत बाजू काय आहेत, आपल्याला काहीही माहित नाही. एका अशा दानवाशी आपला सामना होत आहे ज्याच्या सर्व गोष्टींशी आपण अनभिज्ञ आहोत." डॉ.अभिजीत म्हणतो.

"म्हणजे आपण त्याच्याशी सामना करणार आहोत?" डॉ.एरिक देखील तिथे येतात.

"जे काही झालं त्याची जबाबदारी आपणच उचलायला हवी. आणि आपल्यामुळे तो या पृथ्वीवर आला आहे तर त्याच्याविरुद्ध असलेल्या लढ्यात सैनिकांना आपली मदत लागेल असं मला वाटतंय." डॉ.अभिजीत म्हणतो.

"पण आपण त्यांना काय मदत करू शकतो?" जॉर्डन विचारतो.

"नाही म्हटलं तरी आपल्याकडे त्याची थोडीफार माहिती आहे." डॉ.अभिजीत म्हणतो.

"पण पूर्ण माहिती नाहीये आणि जी माहिती आहे ती सुद्धा चुकीची आहे की बरोबर हे सुद्धा आपल्याला माहित नाही." डॉ.मार्को म्हणतात. चौघांच संभाषण सुरु असतं तेच अँजेलिना तिथे धावत येते.

"काय झालं अँजेलिना? एवढी घाबरलेली का दिसतेस?" जॉर्डन विचारतो.

"सर... ब्रूस..." अँजेलिना मोठ्याने श्वास घेत म्हणते.

"ब्रूस? काय झालं ब्रूसला? तो निघाला का तिथून?" जॉर्डन पुन्हा विचारतो.

"ब्रूस आता या जगात नाहीये." मोठा श्वास घेत अँजेलिना म्हणते.

"काय?" चौघेही आश्चर्याने विचारात. "कधी? कसं काय? तुला कसं समजला?" अँजेलिनावर प्रश्नांचा वर्षाव सुरु होतो.

"ब्रूस त्याच्या घरातून काही महत्वाचा डेटा घेऊन निघत होता तोच तिथे भूकंपाचे हादरे सुरु झाले. तो आणि त्याच्याबरोबर असलेले सैनिक घरातून बाहेर आले तर तो राक्षस त्यांच्याच दिशेने येत होता. सैनिकांनी त्याच्यावर गोळीबार सुरु केला पण त्याचा काही उपयोग नाही झाला. वाटेत येणाऱ्या अनेकांना मारत त्याने ब्रूसला उचललं आणि वेगळ्या भाषेत काही बडबडत होता. ब्रूसला बहुतेक ती भाषा समजत असावी, त्याने त्या राक्षसाच्या प्रश्नांची उत्तरं दिली तेव्हा त्या राक्षसाने त्याला सोडून दिलं. मग तो राक्षस बराच वेळ त्याच्याशी बोलत होता. तेवढ्यात सैनिकांची मोठी पलटण आली आणि तो राक्षस पिसाळला. त्याने आपल्या ब्रूससह अनेकांना मारून टाकलं." असं म्हणत अँजेलिना रडू लागते.

"झालं ते खूपच वाईट झालं. पण त्या राक्षसाचा हेतू काय असावा?" डॉ.एरिक शोकाकून होऊन म्हणतात.

"ते आता येणारा काळच सांगू शकेल." डॉ.अभिजीत समुद्राच्या लाटांकडे बघत म्हणतो.

(क्रमशः)