Get it on Google Play
Download on the App Store

भाग २८

मॅनहॅटनमध्ये पोहोचल्यावर आफ्रिकेच्या दिशेने जाणारे अमेरिकी वायुसेनेची विमानं त्यांच्यासाठी सज्ज होती. विचार करण्याएवढा वेळ कुणालाही नव्हता. जॉन आणि अभिजीत तीन व्यक्तींची आसनक्षमता असलेल्या विमानामध्ये बसतात. काही क्षणातच सर्व विमानं आफ्रिकेच्या दिशेने रवाना होतात.

समुद्रतटाजवळ पोहोचत असतानाच त्या विमानांसमोर चार पाय आणि पंख असलेले ड्रैगनसारखे दिसणारे महाकाय डायनोसोर येतात. सर्वात पुढे असलेले विमान त्याच्यावर मिसाईलचा मारा करतं आणि एक डायनोसोर जमिनीच्या दिशेने कोसळतं. हे पाहून इतर डायनोसोर मिसाईलचा अंदाज बांधून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. विमानांच्या गतिपुढे डायनोसोरची गती कमी पडते. ते डायनोसोर मागे राहतात. आता विमानात बसलेले सगळे निश्चिंत होतात. पण ही निश्चिंतता काही क्षणपुरताच होती. जमिनीवरुन विमानांच्या पात्यांवर भल्यांचा अचूक नेम टिपला गेला. सर्व विमानं समुद्रात कोसळतात.

"ताबडतोब समुद्रात जा... मला तो अभिजीत जिवंत किंवा मृत हवा आहे... आणि ती तलवार सुद्धा घेऊन या... जा लवकर..." मॅनहॅटनच्या किणाऱ्यावरून अग्निपुत्र आपल्या सैन्याला आदेश देतो. संपूर्ण सैन्य समुद्रात दाखल होतं. डायनोसोर विमान कोसळलेल्या ठिकाणी आकाशात घिरट्या घालत होते. कुणाचाही पत्ता दिसत नव्हता. सैनिक अजुनही दूर अंतरावर होते. २०-२५  मिनिटांनंतर सैन्य तिथे पोहोचते. विमानाचे काही भाग समुद्रावर तरंगत होते, काही समुद्राच्या तळाशी गेले होते. हजारच्या आसपास असलेले सैन्य समुद्रातला तो भाग पिंजून काढतात. मास्यांशिवाय तिथे काहीच नव्हतं. नंतर ही गोष्ट अग्निपुत्रापर्यंत जाते.


"जोपर्यंत मेलेला अभिजीत माझ्यासमोर येत नाही, तोपर्यंत मला तोंड दाखवू नका..." अग्निपुत्राला संताप अनावर झाला होता. कारण देखील तसंच होतं. उडणारे डायनोसोर, अर्धसर्पानुष्यांची भलीमोठी फौज तिथे असताना अभिजीत आणि त्याचे साथीदार कुठे गेले? अगदी समुद्राच्या तळाशी सुद्धा काही हाती लागत नव्हतं.
तो पूर्ण दिवस अभिजीत आणि त्याच्या साथीदारांना शोधण्यात जातो. चवताळलेला अग्निपुत्र अग्निसूर्याला बोलावतो.

"देवा, आम्ही त्या मनुष्याला शोधन्याचा खुप प्रयत्न केला. पण त्याचं अवशेष देखील कुठेही मिळाल नाही." अग्निसूर्य त्याला शांत करत म्हणतो.

"मी तुझ्यावर एक जबाबदारी टाकली आहे, आणि ती पूर्ण व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. मला तो अभिजीत कुठल्याही परिस्थितीत हवा आहे..." अग्निपुत्र म्हणतो.

आता अभिजीतला शोधायचं कसं हा प्रश्न अग्निसूर्याला पडतो. तो मिळाला नाही तर आपली काही खैर नाही हे त्याला माहीत होतं. बराच वेळ विचार केल्यावर त्याला एक युक्ती सुचते.

"देवा, त्या मनुष्याला शोधण्यासाठी आपण मनुष्याची मदत घेतली तर?" अग्निसूर्य म्हणतो.

"ते कसे शक्य आहे? मनुष्य त्यांच्या रक्षणकर्त्याला आपल्यासाठी का म्हणून शोधतील?" अग्निपुत्र विचारतो.
"मनुष्य हा खुप स्वार्थी प्राणी आहे. स्वतःला वाचवण्यासाठी तो काहीही करु शकतो. तुम्ही फक्त त्यांना  एवढंच आवाहन करा की, जो देश अभिजीतला आमच्या स्वाधीन करेल त्या देशातील एकाही मनुष्याला तुम्ही मारणार नाही. मग बघा ते लोक अभिजीतला कसा तुमच्यासमोर उभं करतात ते..." अग्निसूर्याने आपल्या कपटी बुद्धितून ही युक्ती काढली.

"वेडा आहेस का? एक पूर्ण देश मी जिवंत ठेवू?" अग्निपुत्र ओरडतो.

"देवा, त्या देशाला तुम्ही मारु शकणार नाही, पण आम्ही तर मारु शकतो न!" असे म्हणत अग्निसूर्य विद्रूपपणे हसू लागतो. अग्निपुत्राला त्याची योजना समजते. तो देखील विद्रूपपणे हसतो.

लगेचच प्रेस कॉन्फरन्स घेतली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पत्रकारांना बोलावले जाते. सर्व मनुष्यांपर्यंत पोहोचण्याचे बातम्या हे एकच साधन आहे हे आता अग्निपुत्राला कळले होते. एका भल्यामोठ्या लढाऊ विमानातून सैनिकांच्या कडेकोट सुरक्षेत पत्रकार अग्निपुत्राने बोलावलेल्या ठिकाणी येतात, गम्मत म्हणजे अँजेलिना आणि लिसा देखील पत्रकारांच्या ताफ्यामध्ये आलेल्या असतात.

"मी अग्निपुत्र आहे... दुर्दैवाने माझा जन्म मनुष्याचा संहार करण्यासाठी झाला आहे. मनुष्याला मारून टाकणे मला आवडत नाही, पण कर्म म्हणून मला ते करणे भाग आहे. पण आपल्यापैकी अनेकांची यातून सुटका होऊ शकते... हो, हे खरं आहे... आपल्यापैकी काही मनुष्यांचा जीव मी घेणार नाही... त्यासाठी त्यांनी फक्त एक गोष्ट करायची आहे... आणि ती म्हणजे, मला अभिजीत जिवंत किंवा मृत अवस्थेत माझ्यासमोर हवा आहे. जो कोणी हे काम करेल, त्याच्या देशाला आणि देशातील लोकांना माझ्याकडून कसलीही हानी पोहोचणार नाही..." एवढं बोलून अग्निपुत्र गप्प बसतो. त्याच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

"कुणाला काही प्रश्न विचारायचा आहे का?" अग्निसुर्य धुर्ताप्रमाणे बोलतो.

"मी आपल्याला प्रश्न करू शकते का?" एक पत्रकार म्हणेजच पत्रकारांमध्ये असलेली लिसा उभी राहून अग्निपुत्राला प्रश्न करते.

"विचार." अग्निपुत्र म्हणतो.

"अभिजीत तुम्हाला मिळाल्यावर कशावरून तुम्ही एक संपूर्ण देश तुमच्या मोहिमेतून वर्ज्य कराल?" लिसा विचारते.

"मी माझा शब्द कधी मोडत नाही." अग्निपुत्र म्हणतो.

"माफ करा, पण आम्हाला तुमच्यावर विश्वास नाही. अभिजीत मिळून सुद्धा तुम्ही सर्व मनुष्य जातीला मारून टाकाल." लिसाचे शब्द ऐकून अग्निपुत्राला काय बोलावे हे सुचत नव्हते. मग अग्निसुर्य पुढे येतो.

"मनुष्य आम्हाला मदत करत असेल तर त्याच्यासाठी काही करण्याची आमची सुद्धा जबाबदारी असेल." अग्निसुर्य म्हणतो.

"एका अटीवर आम्ही तुम्हाला मदत करू. जोपर्यंत अभिजीत सापडत नाही, तुम्ही एकही मनुष्य प्राण्याला मारणार नाहीत. अन्यथा आमच्यापैकी कुणीही तुम्हाला मदत करणार नाही." अँजेलिना देखील लिसाच्या बाजूला उभी राहत म्हणते.

अचानकपणे दोन स्त्रिया उभ्या राहिल्याने थोड्या वेळात सगळे पत्रकार उभे राहतील अग्निसुर्याला वाटते, तो अग्निपुत्राकडे बघतो. अग्निपुत्र होकारार्थी मान हलवतो.

"ठीक आहे. जोपर्यंत अभिजीत सापडत नाही, तोपर्यंत पृथ्वीवरील माणूस सुरक्षीत आहे... पण आम्ही जास्त काळ थांबणार नाही, एक आठवड्याच्या आत अभिजीत आमच्यासमोर नाही आला तर मनुष्याच्या रक्ताच्या नद्या वाहतील आणि त्यात मी स्नान करेन..." अग्निसुर्य गंभीर चेहरा करत म्हणतो, "चला निघा आता आणि ताबडतोब कामाला लागा..." सर्व पत्रकार महाकाय लढाऊ विमानामध्ये बसून तिथून लगेच निघून जातात.

विमानाच्या आतमध्ये जॉन आणि जॉर्डन असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताफ्यामध्ये फक्त ६ पत्रकार होते, बाकी सर्व अभिजीतच्या टीममधले होते.

"सर, अग्निसुर्याशी बोलत असताना आम्ही त्याने घातलेल्या कवचावर एका सैनिकाकडून त्याच्या नकळत सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे. सोबतच आपले चार अतिसूक्ष्म रोबो त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहेत. सर्व गोष्टी आपल्या योजनेप्रमाणे झाल्या आहेत." अँजेलिना आणि लिसा, दोघीही जॉनला रिपोर्ट करतात.