भाग २०
भारतीय वायुसेनेचं विशेष विमान जर्मनीमध्ये पोहोचतं. तिथे विमानतळावर भारतीय दुतावास एका भल्यामोठ्ठया गाडीसह डॉ.अभिजीत आणि त्याच्या टीमची वाट पाहत असतो.
“हॅल्लो, मी विरेंद्र साहा, भारतीय दुतावास आहे. तुम्ही जितका वेळ इथे आहात तितका वेळ मी तुमच्या बरोबर असणार आहे.” विरेंद्र डॉ.अभिजीतबरोबर हस्तांदोलन करत म्हणतो.
“आभारी आहोत. आम्हाला संयुक्त राष्ट्रसंघातील सदस्यांना भेटावयास जायचे आहे.” डॉ.अभिजीत म्हणतो.
“होय. शक्य तितक्या लवकर तुमची भेट व्हावयास हवी.” गाडीच्या दिशेने चालत विरेंद्र म्हणतो.
“म्हणजे?” अॅंजेलिना विचारते.
“तो भारत सोडून आता जर्मनीच्या दिशेने येत आहे.” विरेंद्रचे हे शब्द ऐकताच सर्वांच्या भुवया उंचावतात. विरेंद्र त्या सर्वांना लवकरात लवकर संयुक्त राष्ट्रसंघाच्या भव्य अशा कार्यालयामध्ये नेतो जे ८-१० टेनिस कोर्ट सामावतील इतके भव्य असते. सर्व प्रमुख देशांचे विशेष अधिकारी तिथे उपस्थित असतात.
“कोणतीही औपचारिकता न करता आम्ही मुळ विषयाकडे वळतो, आपणांकडे अशी कोणती माहिती आहे, ज्यामुळे त्या दानवाचा नाश होऊ शकतो?” संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्ष डॉ.अभिजीतला विचारतात. डॉ.अभिजीत आणि त्याची टीम त्यांच्यापासून जवळच एका व्ही.आय.पी. कक्षामध्ये बसलेले असतात. अध्यक्षांनी विचारताच डॉ.अभिजीत आपला माईक चेक करुन बोलायला सुरुवात करतो.
“नक्कीच ही वेळ कोणतीही औपचारिकता पार पाडण्याची नाही आहे. जगावर आता एक असं संकट आलं आहे ज्याला आम्ही कारणीभुत आहोत.” एवढं बोलून डॉ.अभिजीत गप्प बसतो.
“तुम्हाला कळतंय का? तुम्ही काय म्हणत आहात ते?” अध्यक्ष विचारतात.
“होय. संशोधनामध्ये आम्हाला काही विशेष पुरावे हाती लागत होते ज्यामुळे मानवजातीच्या इतिहासातील महत्वपुर्ण पैलु उलगडण्यासाठी मदत होणार होती. पण, ते पैलु उलगडता नकळतपणे अग्निपुत्र जागृत झाला.” डॉ.अभिजीत म्हणतो.
“डॉक्टर, तुम्हाला कल्पना आहे का? तुमच्या एका चुकीमूळे आज संपुर्ण जग विध्वंसाखाली आलं आहे.” अध्यक्ष म्हणतात.
“अध्यक्ष महोदय, सर्व राष्ट्रांच्या विकासामध्ये वैज्ञानिक आणि संशोधक यांनी महत्वपुर्ण भुमिका बजावली आहे. डॉ.मार्को आणि डॉ.एरिक यांचा संशोधनातील अनुभव ३० वर्षांपेक्षा मोठा आहे आणि संपुर्ण अमेरिका त्यांचा व त्यांच्या रचनांचा आदर करतो. डॉ.अभिजीत देखील अल्पावधील आपल्या कठोर परिश्रमामुळे पुढे आले आहेत. त्यामुळे उपस्थित संशोधकांनी जगाला जानिवपुर्वक विध्वंसाखाली आणले या विधानाशी मी पुर्णतः असहमत आहे.” अमेरिकेचे अधिकारी ताबडतोब बोलू लागतात. अध्यक्ष होकारार्थी मान हलवतात आणि डॉ.अभिजीतच्या दिशेने वळतात.
“डॉक्टर, आम्हाला सर्व गोष्टींचा खुलासा करुन द्याल अशी अपेक्षा करतो.” एवढं बोलून अध्यक्षांसह संपुर्ण सभागृह डॉ.अभिजीतकडे शांतपणे पाहू लागतं.
दोन मिनिटं शांत राहिल्यावर डॉ.अभिजीत बोलू लागतो, “भारत आणि चीन यांच्यामध्ये रेल्वेसेवा सुरु करण्याचा प्रस्ताव आला तेव्हा प्राथमिक काम करत असताना तिथल्या कर्मचा-यांना हिमालयाजवळ अर्धा माणूस आणि अर्धा साप असलेल्या प्राण्याचं अवशेष सापडलं.” संपुर्ण सभागृह कान देऊन ऐकत होतं. “ही गोष्ट इतक्यात बाहेर जाऊ नये म्हणून भारत सरकारने आम्हाला गुप्त मोहिमेवर तिथे पाठवलं. आम्ही जॉर्डनच्या नेतृत्वाखाली तिथे गेलो होतो. पुढे अनेक विचित्र गोष्टींचा आम्हाला प्रत्यय आला...” असं म्हणत डॉ.अभिजीत सभागृहाला संपुर्ण घटनाक्रम सांगतो.
“म्हणजे तो दानव म्हणजे अग्निपुत्र आहे?” आॅस्ट्रेलियाचे अधिकारी विचारतात.
“होय.” डॉ.अभिजीत म्हणतो.
“आणि तुमचं असं म्हणणं आहे की, हे महाशय एकट्यानेच त्या अग्निपुत्राचा नाश करतील?” रशियाचे अधिकारी विचारतात.
“विश्वास नाही, पुर्ण खात्री आहे.” डॉ.अभिजीतच्या खांद्यावर हात ठेवत डॉ.मार्को म्हणतात.
सभागृहामध्ये शांतता पसरते. सभागृहाचे अध्यक्ष निर्णय घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी घेतात. दरम्यान सभागृहातील सर्व सदस्यांना मतदान करण्याचे सुचविले जाते. डॉ.अभिजीत यांना मदत करायची की अनुविस्फोट करायचा यावर सर्व सदस्यांना मत द्यावयाचे असते.
अवधी संपल्यानंतर,
“डॉ.अभिजीत यांचं बोलणं ऐकल्यानंतर आणि सर्व राष्ट्रांच्या प्रतिनिधींचे मत विचारात घेतल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघातर्फे अनुविस्फोटाचा निर्णय मागे घेत आहे. तसेच अग्निपुत्र नावाच्या दानवाचा विनाश करण्यासाठी डॉ.अभिजीत आणि त्याच्या टीमला सर्वोतपरी सहकार्य करण्याचं आम्ही वचन देतो.” संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्ष बोलतात. संपुर्ण सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो. त्याचवेळी एक व्यक्ती सभागृहामध्ये उभी राहते.
“माफ करा, पण आम्ही आपल्या निर्णयाशी असहमत आहोत. तुम्ही एका संशोधकावर इतका विश्वास नाही ठेवू शकत. कशावरुन तो संशोधक खरं बोलत आहे?” रशियाचे अधिकारी म्हणतात.
“याचं उत्तर मी देतो.” संपुर्ण सभागृहाचं लक्ष त्या आवाजाच्या दिशेने जातं. प्रवेशद्वारातून एक व्यक्ती हातामध्ये काही पेपर्स घेत तावातावाने चालत तिथे येत असते. “अध्यक्ष महोदय, माझं नाव जॉर्डन आहे आणि जो काही प्रकार घडला त्याला मी स्वतः पुर्णपणे जबाबदार आहे. या संपुर्ण मोहिमेचं नेतृत्व माझ्याकडेच होतं. भारतीय सैन्यदल आणि जपान लष्करप्रमुखांशी माझं बोलणं झालं आहे. त्याची डिटेल रिपोर्ट माझ्या हातात आहे. ज्या कुणाला डॉ.अभिजीतच्या बोलण्यावर शंका आहे त्याने ही रिपोर्ट अवश्य वाचावी. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी मी स्वतः या मोहिमेतून हात झटकले होते आणि अनेक सहकारी मोहिम अध्र्यावर सोडून गेले होते तेव्हा, डॉ.अभिजीतने या सर्व संकटांवर मात करत फक्त जगाला वाचवायचं म्हणून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अग्निपुत्राशी दोन हात करण्याची तयारी दाखवली. यासाठी खुप हिंमत लागते आणि अशा माणसावर तुम्ही संशय घेता?” जॉर्डन म्हणतो.
रशियाचे अधिकारी शरमेने मान खाली घालतात. संपुर्ण सभागृह उभं राहून डॉ.अभिजीतसाठी जोरजोरात टाळ्या वाजवत कौतुकाचा वर्षाव करतं. अचानकपणे जॉर्डन परतल्याने डॉ.अभिजीतला सुखद धक्का बसतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं.
सभागृहामध्ये सुचना होते, ‘दानव जर्मनीमध्ये दाखल झाला आहे. सैन्यदलाकडून त्याला अडवण्याचे भरपुर प्रयत्न करुन देखील त्याची वाटचाल कायम आहे.’
“डॉ.अभिजीत, आता काय करायचं?” अध्यक्ष विचारतात.
“आता? आता काहीही करुन अर्जेंटिनाला पोहोचायचंय, तिथूनच बम्र्युडा त्रिकोणमध्ये प्रवेश...” डॉ.अभिजीत म्हणतो.
(क्रमशः)