Get it on Google Play
Download on the App Store

भाग २३

“डॉक्टर, तुम्ही आतमध्ये येऊ शकता.” जॉन डॉ.अभिजीतला म्हणतो.

आपला स्विमिंग सूट सांभाळत डॉ.अभिजीत पाणबूडीमध्ये येतो. जॉन, जॉर्डन यांच्याबरोबर अर्जेंटिना नौसेनेतील १० सैनिक, २ पाणबूडी चालक, १ रडार नियंत्रक आणि १ सुपरवायझर असा ताफा घेऊन डॉ.अभिजीत बम्र्युडा त्रिकोणाच्या दिशेने निघतो.

प्रचंड मोठ्या समुद्रातून त्यांची वाटचाल आता उथळ महासागरात होते. दुरवर पसरलेला महासागर आणि ५ ते ७ मीटर उंचीच्या प्रचंड लाटा असं ते भयान वातावरण होतं. वादळी वारा सुरु झाल्याने पाणबूडीचा पुढचा प्रवास पाण्याखालून होतो. वाटेत त्यांना अॅंजेलिनाकडून चीनने अग्निपुत्रविरोधात वापरलेल्या कल्पनेची माहिती मिळते. अग्निपुत्राने ते रॉकेट पृथ्वीच्या कक्षेबाहेर उद्ध्वस्त केले असते तर पृथ्वीला काही धोका नव्हता. आता सर्व मदार डॉ.अभिजीतवर होती.

“आपल्याला समुद्राच्या अगदी तळाशी जायचं आहे. तिथूनच आपण बम्र्युडाच्या केंद्राशी जाऊ शकू.” डॉ.अभिजीत म्हणतो.

“हे तुम्ही कसं सांगू शकता?” जॉन विचारतो.

“मला देखील नाही माहित. पण एक वेगळीच उर्जा मला हे सांगत आहे.” डॉ.अभिजीत म्हणतो. जॉनला भारतीय सैन्यदल अधिका-यांकडून रुद्रस्वामींची माहिती मिळालेली असते, त्यामुळे तो डॉ.अभिजीतच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो.

“पाणबूडी समुद्राच्या तळाशी न्या.” जॉन आदेश देतो.

“सर आपण बम्र्युडाच्या अगदी जवळ आलो आहोत. आणखी पुढे गेलो तर बाहेरील जगाशी आपला पुर्ण संपर्क तुटेल.” रडार नियंत्रक म्हणतो.

“ठिक आहे, आम्ही इथूनच पोहत जाऊ.”  अभिजीतकडे वळून, “डॉक्टर, आपल्याला इथूनच पोहत जावं लागणार आहे. ठिक ना!” जॉन विचारतो.

“माझी काहीच हरकत नाही. निघूया का?” डॉ.अभिजीत विचारतो.

“जरा थांबा.” आपल्या सैनिकांकडे वळून, “तर, तुम्हा सर्वांना कल्पना असेलच की अग्निपुत्र नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी एक तलवार इथे बम्र्युडा त्रिकोणाच्या केंद्राशी ठेवलेली आहे. केवळ डॉ.अभिजीत त्या तलवारीपर्यंत पोहोचू शकतात. परंतु त्यांनी याआधी कधीही अशा प्रकारची मोहीम केलेली नाही. म्हणूनच तुम्हा सर्वांचं पहिलं काम असेल डॉ.अभिजीत यांना कव्हर करणं. मी देखील तुमच्याबरोबर येणार आहे, महासागरातील दुर्गम ठिकाण असल्याने इथे मांसाहारी मासे असण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून प्रत्येकाकडे आपापली हत्यारं दिलेली आहेत. आपल्यापैकी दोन सैनिक जादा आॅक्सिजन सिलिंडर घेऊन सोबत येतील, तरीही त्यांचं देखील प्राथमिक काम हे डॉ.अभिजीत यांना कव्हर करणं हेच असेल. डॉ.अभिजीत आणि माझ्या शरीरावर जी.पी.एस. सिस्टम बसवलं असेल, ज्याद्वारे जॉर्डन पाणबूडीमधून आमच्या संपर्कात असेल...” जॉनचं बोलणं पूर्ण होत नाही तोच रडार नियंत्रक त्याला मध्येच अडवतो.

“सर, आपल्या पाणबूडीच्या दिशेने ८ पाणबुड्या येत आहेत.” रडार नियंत्रक म्हणतो.

“८ पाणबुड्या?” सर्वजन एकदम ओरडतात. जॉन आणि जॉर्डन लगेचच नियंत्रण कक्षामध्ये जातात. सर्व सैनिक आपापली हत्यरं तयार ठेवतात.

“त्यांना सिग्नल देऊन बघ.” जॉन रडार नियंत्रकाला सांगतो आणि समोरुन त्यांना सिग्नल मिळतो. त्या सिग्नलनुसार त्या पाणबुड्या डॉ.अभिजीतला मदत करण्यासाठी आलेल्या असतात. जॉन त्यांच्याशी व्हॉकी-टॉकी ने बोलतो, “कृपया आपली ओळख सांगा.”

“आम्ही अमेरिकी नौसेना आहोत. सोबत कॅनडा, भारत, चीन, जपान, श्रीलंका, पाकिस्तान आणि आॅस्ट्रेलिया देशाचे नौसैनिक आपल्या मदतीसाठी आले आहेत. आपल्या सहकार्यासाठी आम्हाला आज्ञा करावी.” अमेरिकी नौसेना अधिकारी म्हणतो आणि दुसरीकडे डॉ.अभिजीत, जॉर्डन आणि जॉनला त्यांच्या कानांवर विश्वास बसत नाही. जे देश मदत करण्यासाठी आले होते, त्यांपैकी अनेक देश एकमेकांचे शत्रु होते. आपापसांतील वैर विसरुन ते डॉ.अभिजीतला मदत करण्यासाठी आले होते. जॉन त्या सर्वांना एकूण मोहिमेची कल्पना देतो आणि जी मोहिम १२ जन पार पाडणार होते, ती मोहिम आता तब्बल ९२ जन पार पाडणार आहेत.

सर्व पाणबुड्या बम्र्युडापासून 300 मीटर अंतरावर समुद्राच्या तळाशी थांबलेल्या असतात. प्रत्येक पाणबुडीमधून १० सैनिक हत्यार आणि जादा आॅक्सिजन साठ्यासह बाहेर येतात. जॉन त्या सर्वांचं नेतृत्व करत सर्वात पुढे असतो. त्याच्या पाठीमागे ४५ सैनिक मधोमध डॉ.अभिजीत आणि त्याला पाठीमागून कव्हर करण्यासाठी ४५ सैनिक अशा पद्ध्दतीने सगळे बम्र्युडाच्या आत जातात. आतमध्ये गेल्यावर पाण्याचा प्रवाह मंद होतो, जनूकाही आपण जमिनीवर आहोत आणि सहजच हालचाल करु शकतो. सर्वांना पाण्यात नसल्यासारखं वाटत होतं. पण आत जाताच जॉन आणि डॉ.अभिजीत यांचा जॉर्डनबरोबरचा संपर्क तुटतो.

“जॉन, आपला जॉर्डनसोबतचा संपर्क तुटला आहे. मला त्याचा आवाज येत नाहीये.” डॉ.अभिजीत जॉनला सांगण्याचा प्रयत्न करतो, पण पाण्यात बोलता येत नाही. डॉ.अभिजीत हातवारे करतो, पण कुणाला काही अंदाज येत नाही आणि त्याच पाण्यात थोडा वेळ पुढे गेल्यानंतर समोरुन मोठ्या प्रमाणात शार्क मासे त्यांच्या दिशेने येतात. सर्व सैनिक डॉ.अभिजीतला कव्हर करत आपल्याजवळ असलेली हत्यारं काढतात. एक शार्क जवळ येताच जॉन आपल्याजवळ असलेल्या लांबसडक टोकदार बाणाने त्या शार्क माशाच्या पोटात वार करतो, त्यामुळे इतर मासे थोडं पाठीमागे जातात. नंतर ते सैनिकांपासून वरच्या दिशेने थोड्या अंतरावर घिरट्या घालतात. मासे पुन्हा वार करतील याची सैनिकांना कल्पना असते, म्हणून ५ सैनिक थोड्या वरच्या दिशेने डॉ.अभिजीतला कव्हर करतात. पुढे गेल्यावर स्टींग रे, ह्युज आॅक्टोपस, समुद्री साप यांच्याकडून त्यांच्यावर हल्ले होतात. बम्र्युडाच्या केंद्राशी पोहोचता पोहोचता त्यांच्या बरोबर असलेले ७० पेक्षा जास्त सैनिक मृत्यूमूखी पडतात.

गेल्या अनेक वर्षांत हरवलेली जहाजं, विमानं, पाणबुड्या त्या केंद्राच्या वर तरंगताना दिसतात. जॉन आणि अभिजीतला त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तळाशी त्यांना मंदिराप्रमाणे एक वास्तु दिसते. डॉ.अभिजीत, जॉन आणि केवळ ६ सैनिक त्या वास्तुच्या आतमध्ये जातात. तिथे मधोमध एक संदुक ठेवलेली असते. त्याभोवती एक विशिष्ट आवरण असतं, मासेदेखील त्या आवरणाच्या आत जाऊ शकत नव्हते. जॉन आणि डॉ.अभिजीत गोंधळून एकमेकांकडे पाहतात. डॉ.अभिजीत थोडा पुढे जातो आणि त्या आवरणाला हात लावताच एक मासा आतमधून बाहेर येतो आणि डॉ.अभिजीतसंपुर्ण शरीराला चिकटतो. जॉन पुढे येणार तोच अभिजीत त्याला थांबायला सांगतो. मासा डॉ.अभिजीतला त्या संदुकजवळ नेताच ती संदुक उघडली जाते. लख्ख प्रकाश होतो आणि ती तेजोमय तलवार डॉ.अभिजीत आपल्या हातात घेतो.

तलवार संदुकबाहेर घेताच जमीन हलून समुद्राखाली भुकंप होऊ लागतो. अचानकपणे डॉ.अभिजीत आणि जॉन यांचा जॉर्डनशी संपर्क होतो.

“हॅलो, हॅलो अभिजीत? जॉन? तुम्ही दोघे जी.पी.एस.वर दिसत आहात. आम्ही पाणबुड्या बम्र्युडाच्या दिशेने आणत आहोत. अग्निपुत्र वेगाने तुमच्या दिशेने येत आहे.” जॉर्डनचा आवाज येतो. डॉ.अभिजीतच्या अंगाचा थरकाप उडतो. सर्व पाणबुड्या बम्र्युडाच्या आत येतात, त्यांना त्या ठिकाणी सैनिकांची शवं दिसतात. जी.पी.एस.ने पाणबुडी बम्र्युडाच्या केंद्राशी पोहोचते. जॉन, डॉ.अभिजीत आणि उरलेले सर्व सैनिक तलवारीसह पाणबुडीमध्ये बसतात.

संपुर्ण जग आश्चर्यचकित होतं, कारण बम्र्युडामधून पहिल्यांदाच कुणीतरी बाहेर आलं असतं. तिथे हरवलेली विमानं, जहाजं आणि पाणबुड्या देखील दिसु लागल्या होत्या. डॉ.अभिजीतला तलवार मिळताच अग्निपुत्र अंटाक्र्टिकाच्या दिशेने पळून जातो.

तलवार मिळाल्याने सर्वांच्या मनातून डॉ.अभिजीत आणि भारतीय सैन्यदलाविषयीची शंका दुर होते. तलवार घेऊन डॉ.अभिजीत, जॉर्डन आणि जॉन अमेरिकेमध्ये जातात. पुढचे दोन आठवडे अग्निपुत्राची कोणतीही हालचाल होत नाही. तलवार मिळाल्याने त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज अनेक  जन व्यक्त करतात तर कुणाच्या मते त्याचा मृत्यू झालेला असतो. पण ही वादळापुर्वीची शांतता असते.

(क्रमशः)