Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ४

१८९२ च्या नॉर्वेजीयन मोहीमेत कार्ल लार्सनने लार्सन आईस शेल्फचा शोध लावला. अंटार्क्टीकवर स्कीईंग करणारा तो पहिला दर्यावर्दी ! किंग ऑस्कर लँड आणि रॉबर्टसन बेटाचाही लार्सनला शोध लागला.

१८९४ मध्ये हेन्रीक बुल, कार्स्टन्स बॉर्चग्रेविन्क आणि अलेक्झांडर वॉन टन्झील्मन यांनी अंटार्क्टीकवर पाय ठेवला.

१८९७ च्या ऑगस्टमध्ये पहिल्या बेल्जीयन मोहीमेने अंटार्क्टीकाच्या मोहीमेवर जाणासाठी अँटवर्प सोडलं. अनेक आंतरराष्ट्रीय दर्यावर्दींचा सहभाग असलेल्या या मोहीमेत पुढे दक्षिण धृवाशी ज्याचं नाव कायमचं निगडीत झालं असा एक दर्यावर्दीही होता.

रोनाल्ड ऐंजल्बर्ट ग्रॅव्हनींग अ‍ॅमंडसेन !


१८९८ च्या जानेवारीत ते ग्रॅहम लँडच्या किना-यावर पोहोचले. ग्रॅहम लँडच्या किना-याने गेरलॅच सामुद्रधुनीतून मार्गक्रमणा करत त्यांनी अनेक बेटांना भेटी दिल्या. त्यांचे नकाशे तयार केले. १५ फेब्रुवारी १८९८ ला त्यांनी आर्क्टीक सर्कल ( ६६ १/२ अंश दक्षिण ) ओलांडलं. परंतु वेडेल सागरात शिरण्याचा मार्ग त्यांना सापडला नाही. २८ फेब्रुवारीला त्यांचं जहाच बर्फात अडकलं ! अंटार्क्टीकाच्या गोठवणा-या हिवाळ्याला तोंड देण्याला आता पर्याय नव्हता !

१७ मे रोजी काळोखाचं साम्राज्यं सुरू झालं, ते २३ जुलै पर्यंत टिकलं ! त्यातच स्कर्व्ही रोगाने अनेकांना ग्रासलं. ५ जूनला लेफ्टनंट डॅन्कोला मृत्यूने गाठलं. अखेर फ्रेडरीक कूक आणि रोनाल्ड अ‍ॅमंडसेन यांनी मोहीमेचा ताबा घेतला. रॉब पेरीबरोबर उत्तर धृवाच्या मोहीमेवर गेलेल्या कूकला स्कर्व्हीवर असलेला एकमेव उतार माहीत होता तो म्हणजे पेंग्वीन आणि सीलचं ताजं मांस ! ( त्यावेळेस व्हिटॅमीन सी चा शोध लागला नव्हता ). हळूहळू सर्वांची परिस्थीती सुधारली.

१८९९ च्या जानेवारीपर्यंत त्यांचं जहाज बर्फातच अडकलेलं होतं ! तातडीने हालचाल न केल्यास आणखीन एक हिवाळा अंटार्क्टीक मध्ये अडकून पडण्याची भीती होती. जहाज अडकलेल्या ठिकाणापासून जेमतेम अर्धा मैलावर खुला समुद्र होता. फ्रेडरीक कूकने जहाजापर्यंत पाणी आणण्यासाठी चर खोदण्याची मांडलेली कल्पना सर्वांनी उचलून धरली. अखेरीस १५ फेब्रुवारी १८९९ ला त्यांना जहाज बाहेर काढण्यात यश आलं ! परंतु बर्फाळलेल्या प्रदेशातून अवघ्या सात मैलाचं अंतर पार करण्यास त्यांना तब्बल एक महिना लागला ! ५ नोव्हेंबर १८९९ ला ते बेल्जीयमला परतले.

१८९८ मध्ये सर जॉर्ज न्यूवेन्सच्या पाठींब्याने बिटीश दर्यावर्दीं कार्स्टन बॉर्चग्रेवीन्कने लेडी सदर्न क्रॉस या नावाने अंटार्क्टीकावर मोहीम आखली. यापूर्वीच्या सर्व मोहीमांच्या तुलनेत ही मोहीम वैशीष्ट्यपूर्ण होती. या मोहीमेत बॉर्चग्रेवीन्कने प्रथमच अंटार्क्टीकावर स्लेज ( घसरगाड्या ) आणि ते ओढण्यासाठी कुत्रे आणण्याचा निर्णय घेतला होता ! २३ ऑगस्ट १९९८ रोजी त्यांनी लंडनहून मोहीमेवर कूच केलं. १९ डिसेंबरला ऑस्ट्रेलियातून जास्तीची सामग्री घेऊन त्यांनी अंटार्क्टीकाच्या दिशेने प्रस्थान केलं.

२३ जानेवारी १८९९ ला लेडी सदर्न क्रॉसने आर्क्टीक वृत्त ओलांडलं. पुढचे तीन आठवडे जहाज बर्फात अडकून पडलं होतं ! १६ फेब्रुवारीला ते केप आंद्रे इथे पोहोचले. अंटार्क्टीकवर मुक्काम करण्याच्या दृष्टीने ही जागा आदर्श होती. इथे बर्फाचा जाड थर होता आणि जवळच प्रचंड संख्येने पेंग्वीनची वस्ती होती.

१७ फेब्रुवारीला सर्वप्रथम ७६ सैबेरियन कुत्रे अंटार्क्टीकावर उतरले. त्यांच्याबरोबर त्यांचे दोन प्रशिक्षकही होते. त्या रात्री त्यांनी किना-यावरच मुक्काम केला. अंटार्क्टीकावर रात्र घालवणारे ते पहीले मानव !

( बेल्जीयन मोहीमेतील दर्यावर्दींनी एक वर्षांपेक्षा जास्तं काळ अंटार्क्टीकामध्ये घालवला असला तरीही रात्री बर्फावर मुक्काम केला नव्हता.)

पुढच्या बारा दिवसात बरचंस सामान उतरवण्यात आलं. मुक्कामाच्या दृष्टीने दोन आटोपशीर लाकडी झोपड्या उभारण्यात आल्या. अंटार्क्टीकावरील हे पहिलं बांधकाम होतं ! १४ ऑक्टॉबर १८९९ रोजी प्राणीशास्त्रज्ञ निकोलाई हॅन्सन मरण पावला. अंटार्क्टीकावर पुरण्यात आलेला तो पहीला मनुष्य !

वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर त्यांनी स्लेज आणि कुत्र्यांच्या सहाय्याने अंतर्गत भूभागात जाण्याचा बेत आखला होता, परंतु किनारपट्टीपासून काही अंतरावर असणा-या उंच पर्वतराजीने त्यांचा मार्ग रोखून धरला होता. २ फेब्रुवारीला त्यांनी रॉस समुद्रात जाण्यासाठी किनारा सोडला.

रॉस समुद्रात शिरल्यावर त्यांनी दक्षिणेची वाट धरली. रॉस बेटावर पोहोचल्यावर त्यांना प्रथम माऊंट इरेबसचं दर्शन झालं. माऊंट टेररच्या पायथ्याशी असलेल्या केप क्रॉझीयर इथे किना-यवर उतरण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. ६० वर्षांपूर्वीच्या जेम्स रॉसच्या मार्गावरुन त्यांनी रॉसने गाठलेला दक्षिणेकडील सर्वात शेवटचा टप्पा गाठला. मात्रं त्यावर समाधान न मानता, स्लेज आणि कुत्र्यांच्या सहाय्याने बॉर्चग्रेवीन्क, कॉल्बेक आणि सॅव्हीओ यांनी ग्रेट आईस बॅरीअरवर यशस्वी चढाई केली. द्क्षिणेला ७८'५०'' अंशांपर्यंत त्यांनी विक्रमी मजल मारली होती !

जून १९०० मध्ये सदर्न क्रॉस लंडनला परतलं. मात्रं कोणीही त्यांची फारशी दखल घेतली नाही. शास्त्रज्ञांचं बॉर्चग्रेवीन्कबद्द्ल मत प्रतिकूलच होतं. तसंच ब्रिटीश नौदलाच्या डिस्कव्हरी मोहीमेच्या पूर्वप्रसिध्दीमुळे बॉर्चग्रेवीन्कच्या मोहीमेच्या निष्कर्षात कोणालाही स्वारस्य उरलं नव्हतं.

रोनाल्ड अ‍ॅमंडसेनने मात्रं बॉर्चग्रेवीन्कच्या मोहीमेची मुक्तकंठाने प्रशंसा केली. तो म्हणतो,

" बॉर्चग्रेवीन्कने ग्रेट आईस बॅरीअरवर केलेल्या यशस्वी चढाईमुळेच दक्षिणेच्या मार्गातील एक मोठा अडथळा दूर झाला होता !"

ब्रिटीश नौदलाच्या डिस्कव्हरी मोहीमेने अधिकारी आणि शास्त्रज्ञ यांच्यासह ६ ऑगस्ट १९०१ रोजी इंग्लंडहून प्रस्थान ठेवलं. दक्षिण धृवाच्या इतिहासात अजरामर झालेले दोन धुरंधर दर्यावर्दी या मोहीमेवर होते.

एर्नेस्ट शॅकल्टन !