Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण २१

अ‍ॅमंडसेन आणि स्कॉट - एक तुलनात्मक दृष्टीक्षेप

अ‍ॅमंडसेनची दक्षिण धृवावरील मोहीम आणि स्कॉटची टेरा नोव्हा मोहीम दोन्ही एकाच वेळेस एकमेकांपासून सुमारे ३५० मैल अंतरावर एकंच लक्ष्यं असलेल्या दक्षिण धृवाच्या दिशेने मार्गक्रमणा करत होत्या. त्यामुळेच या दोन्ही मोहीमांतील सापेक्ष तुलना ही अपरिहार्य ठरते. अ‍ॅमंडसेनची तुकडी यशस्वीपणे फ्रामहेमवर परतली, तर स्कॉटच्या तुकडीतील स्वतः स्कॉट, विल्सन, बॉवर्स, ओएट्स आणि इव्हान्स यांना मृत्यूने गाठलं.

स्कॉट आणि त्याच्या पाठीराख्यांच्या मते टेरा नोव्हा मोहीम ही मुख्यतः शास्त्रीय संशोधन मोहीम होती. मात्रं शास्त्रीय संशोधनाची मोहीम असली, तरीही दक्षिण धृवावर पोहोचणं हे त्याचं मुख्य उद्दीष्टं होतं याची स्कॉटच्या सहका-यांना पूर्ण कल्पना होती. त्या दृष्टीने साधनसामग्रीतील सर्वोत्कृष्ट घोडे, मोटरस्लेज आणि सर्व कुत्रे, महत्वाची उपकरणं आणि जास्तीत जास्त खाद्यपदार्थ दक्षिण धृवाच्या मोहीमेसाठी राखून ठेवण्यात आले होते.

" लोकांच्या दृष्टीने दक्षिण धृवावर पोहोचण्यात आम्ही कितपत यशस्वी होतो या एकमेव निकषावरच मोहीमेतील शास्त्रीय संशोधनाचं महत्वं अवलंबून असेल !" स्कॉटने नमूद केलं होतं.

दक्षिण धृवावर पोहोचण्यात १९११-१२ च्या पहिल्या प्रयत्नात अपयश आलंच तर १९१२-१३ मध्ये दुसरा प्रयत्नं करण्याची स्कॉटची तयारी होती. त्या दृष्टीने स्कॉटने खेचरं मागवली होती. दुर्दैवाने स्कॉट, विल्सन आणि बॉवर्सचे मृतदेह शोधण्याच्या मोहीमेवर या खेचरांचा वापर करण्याची पाळी अ‍ॅटकिन्सनच्या तुकडीवर आली. अनुभवाअंती बर्फात वावरण्याच्या दृष्टीने खेचर हे घोड्यापेक्षाही कमी सक्षम असल्याचं दिसून आलं !

अ‍ॅमंडसेनने मात्रं आपली मोहीम दक्षिण धृव हे एकमेव उद्दीष्टं समोर ठेवूनच आखलेली होती ! त्याच्या मोहीमेतील प्रेस्टर्डच्या तुकडीने किंग एडवर्ड ५ लँडवर शास्त्रीय संशोधनाचं कार्य केलं असलं तरी अ‍ॅमंडसेनच्य दृष्टीने त्याला दुय्यम स्थान होतं !

अ‍ॅमंडसेनने अंटार्क्टीकावरील आपला मुख्य कँप - फ्रामहेम रॉस आईस शेल्फवर व्हेल्सच्या उपसागराच्या किना-यावर उभारला होता. स्कॉट डिस्कव्हरी मोहीमेतील मॅकमुर्डो साऊंडमधील आपल्या पूर्वीच्या बेस कँपवरच उतरुन शॅकल्टनच्या मार्गाने दक्षिण धृव गाठण्याचा प्रयत्न करणार हे उघड होतं. स्कॉटचा तळ ३५० मैल पश्चिमेला मॅकमुर्डो साऊंडमध्ये असलेल्या रॉस बेटावरील केप इव्हान्स इथे होता. व्हेल्सच्या उपसागरातून सुरवात केल्याने अ‍ॅमंडसेनला दक्षिण धृव गाठण्यासाठी स्कॉटच्या तुलनेत ६० मैल अंतर कमी पडणार होतं !


स्कॉट आणि अ‍ॅमंडसेन यांचा दक्षिण धृवावरील मार्ग

ट्रान्स अंटार्क्टीक पर्वतराजी ही वायव्य-ईशान्य अशी जात असल्याने दक्षिण धृवाच्या वाटेवर असताना आपल्याला स्कॉटपेक्षा कमी काळ समुद्रसपाटीपासून जास्त उंचीवर व्यतित करावा लागेल असा अ‍ॅमंडसेनचा अंदाज होता. हा अंदाज अचूक होता. स्कॉटचा मॅकमुर्डो साऊंड इथला तळ हा शास्त्रीय संशोधनासाठी जास्तं उपयुक्त होता. दक्षिण धृवावर जाणारा हा मार्ग जिकीरीचा असल्याची स्कॉटला पूर्ण कल्पना होती. त्याने शॅकल्टनच्या मोहीमेचा बारकाईने अभ्यास केला होता. रॉस बेटाभोवती बर्फ गोठल्याविना त्याला मोहीमेला सुरवात करता येणार नव्हती. तसंच बेटाभोवती असलेल्या कपारींच्या जाळ्यामुळे त्याला हट पॉईंट गाठण्यासाठीही मोठा वळसा घालून जावं लागत होतं. अर्थातच प्रवासासाठी लागणारा वेळ वाढणार होता.

स्कॉट आणि अ‍ॅमंडसेन यांच्या मोहीमेतील मुख्य फरक होता तो म्हणजे वाहतुकीच्या साधनांचा !

स्कॉटने आपल्या मोहीमेसाठी तीन मोटरस्लेज घेतल्या होत्या. त्याशिवाय घोडे आणि कुत्र्यांचाही त्याच्या मोहीमेत समावेश होता. घोडे आणि कुत्र्यांच्या तुलनेत स्कॉटने मोटरस्लेजवर सात पटीने जास्त पैसे खर्च केले होते ! लेफ्टनंट कमांडर रेजिनाल्ड विल्यम स्केल्टन याने स्कॉटच्या अपेक्षेनुसार मोटरस्लेज तयार करुन नॉर्वेतील बर्फाळ प्रदेशात त्याच्या चाचण्या घेतल्या होत्या. मात्रं टेरा नोव्हा मोहीमेतून स्केल्टनचा पत्ता कट करण्यात आला होता. लेफ्टनंट टेडी इव्हान्सची स्कॉटनंतर दुस-या क्रमांकाचा अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आल्यावर त्याने आपल्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या स्केल्टनला मोहीमेवर नेण्यासाठी विरोध दर्शवला ! स्कॉटने आपला जुना सहकारी असलेल्या इव्हान्सची मागणी मान्य केली !