Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ६

शॅकल्टनने या ग्लेशीयरला बिअर्डमूरचं नाव दिलं. हे ग्लेशीयर अप्रतिम सुंदर दिसत असलं, तरी त्यातून वाटचाल करणं मात्रं अत्यंत जिकीरीचं होतं. त्यातच ७ डिसेंबरला त्यांच्याजवळ असलेला एकमेव घोडा एक प्रचंड मोठ्या बर्फाच्या कपारीत ( क्रिव्हाईस ) कोसळून दिसेनासा झाला ! त्याच्यापाठोपाठ विल्डही खेचला जायचा, परंतु सुदैवाने हार्नेसची दोरी तुटल्याने तो बचावला ! मात्रं एकुलत्या एका घोड्याचा आधार संपल्याने आता सामान वाहण्याचं काम चौघांवर येऊन पडलं. चौघांतील मतभेदही आता उघडपणे समोर येऊ लागले होते.

२५ डिसेंबरला, ख्रिसमसच्या दिवशी ते ८५'५१'' अंश दक्षिण अक्षवृत्तावर होते. दक्षिण धृव अद्यापही २८७ मैल अंतरावर होता !

चौघांजवळ आता जेमतेम महिनाभर पुरेल इतकाच अन्नसाठा शिल्लक होता. बाकीची अन्नसामग्री त्यांनी परतीच्या वाटेवर उपयोगात आणण्यासाठी ठिकठिकाणच्या कँपमध्ये ठेवली होती. परंतु या परिस्थीतीतही शॅकल्टनची हार मानण्यास तयारी नव्हती. आधीच कमी असलेल्या रोजचा अन्नपुरवठा त्याने निम्म्यावर आणला ! अनावश्यक असलेल्या सर्व वस्तू त्याने तिथेच सोडून दिल्या आणि पुन्हा दक्षिणेची वाट धरली.

२६ डिसेंबरला ग्लेशीयरवरची चढाई अखेरीस संपली. आता धृवीय पठारी प्रदेशाला सुरवात झाली. परंतु थंडीचा कडाका मात्रं वाढतच चालला होता. शॅकल्टन म्हणतो,

" हाडं गोठवणारी थंडी काय असू शकते याचा आम्ही पुरेपूर अनुभव घेत होतो. ३१ डिसेंबर इतकी भयानक थंडी मी जन्मात कधी अनुभवली नव्हती !"

१ जानेवारी १९०९ ला त्यांनी ८७ अंश अक्षवृत्त ओलांडलं. धृवीय प्रदेशातील जास्तीत जास्त अक्षवृत्त गाठण्याचा त्यांनी विक्रम केला होता ! ४ जानेवरीला शॅकल्टनने मनातून पराभव मान्य केला होता, परंतु तरीही तो पुढे जातच राहीला होता ! दक्षिण धृवापासून १०० मैल अंतराच्या आत पोहोचण्याचा त्याने मनाशी निश्चय केला होता. अख्रेरीस ९ जानेवारीला ८८'२३'' अंश दक्षिण अक्षवृत्तावरुन त्यांनी परतीचा निर्णय घेतला.


अ‍ॅडम्स, विल्ड, मार्शल - ८८'२३'' अंश दक्षिण - ( शॅकल्टनने काढलेला फोटो )

दक्षिण धृव अद्याप ९७ मैल अंतरावर होता !

७३ दिवसांच्या प्रवासानंतर अखेरीस त्यांनी परतीची वाट धरली. अपुरा अन्नसाठा असूनही ते १९ जानेवारीला बिअर्डमूर ग्लेशीयरवर पोहोचले. २८ जानेवारीला त्यांनी अन्नसाठा ठेवलेला शेवटचा कँप गाठला ! मात्रं तिथेही अन्नसाठा मर्यादीतच होता. शॅकल्टन म्हणतो,

" अन्नाच्या अभावी आम्ही आता इतके रोडावलो होतो, की बर्फावर आडवं झाल्यावर थंडीमुळे आमची हाडं जवळजवळ गोठून जात ! आमच्या देहावर मांस असं अगदीच थोडंस शिल्लक होतं !"

तशाही परिस्थीत पुढे वाटचाल सुरुच होती. २३ फेब्रुवारीला त्यांनी पुढचा कँप गाठला. सुदैवाने मागे राहीलेल्या जॉईसने या कँपवर भरपूर खाद्यपदार्थांचा साठा करुन ठेवला होता !

खाण्याची चिंता आता दूर झाली होती, परंतु तरीही १ मार्चपर्यंत हट पॉईंटला पोहोचणं त्यांच्यासाठी अत्यावश्यंक होतं. १ मार्चला तिथे निम्रॉड जहाज त्यांना घेण्यासाठी येणार होतं ! मात्रं कँपमधून निघण्यापूर्वी त्यांच्यापुढे एक वेगळीच समस्या उभी ठाकली.

ब्लिझर्ड !

जोरदार हिमवादळाला सुरवात झाली ! या वादळामुळे त्यांना आख्खा एक दिवस कँपमधे वाट पाहवी लागली ! अखेर रात्री उशीरा हिमवादळाचा जोर ओसरला.

२७ फेब्रुवारीला ते हट पॉईंटपासून ३८ मैल अंतरावर असताना मार्शल बर्फात कोसळला ! शॅकल्टनने अ‍ॅडम्सला मार्शलच्या जोडीला ठेवलं आणि जहाजाला गाठण्यासाठी विल्डच्या साथीने तो हट पॉईंटच्या दिशेने निघाला. २८ फेब्रुवारीला शॅकल्टन आणि विल्ड हट पॉईंटला पोहोचण्यात यशस्वी झाले. १ मार्चला निम्रॉड आल्यावर त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मागे अडकलेले मार्शल आणि अ‍ॅडम्स जहाजावर पोहोचेपर्यंत ४ मार्च उजाडला होता. ते दोघंही येऊन पोहोचताच शॅकल्टनने उत्तरेचा मार्ग पत्करला.

उत्तर दिशेला गेलेल्या तुकडीत एजवर्थ डेव्हीड, मॉसन आणि मॅक्केचा समावेश होता. चुंबकीय दक्षिण धृव गाठण्याची आणि इतर निरीक्षणं नोंदवण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. ५ ऑक्टोबर १९०८ मध्ये त्यांनी आपल्या मोहीमेवर जाण्यासाठी केप रॉयडहून कूच केलं.

अनेक संकटांना तोंड देत डेव्हीड, मॉसन आणि मॅक्के १७ जानेवारी १९०९ ला ७२'१५'' अंश दक्षिण अक्षांश आणि १५५'१५'' अंश पूर्व रेखांशावर असलेल्या चुंबकीय धृवावर पोहोचण्यात यशस्वी झाले. २ फ्रेब्रुवारीला तिघं निम्रॉडवर परतले !

२३ मार्च १९०९ ला निम्रॉड न्यूझीलंडला पोहोचलं. १४ जूनला त्यांनी इंग्लंडचा किनारा गाठला !

रॉयल जॉग्रॉफीक सोसायटीचा भूतपूर्व अध्यक्ष क्लेमेंट्स मार्कहॅम याने शॅकल्टनने ८८ अंश अक्षवृत्त पार केल्याविषयी शंका व्यक्त केली, परंतु उपलब्ध सर्व माहीती आणि मोहीमेतील सर्वांच्या वृत्तांतामुळे ते खरोखरच ८८ अंशावर पोहोचले यावर शिक्कामोर्तब झालं !

रोनाल्ड अ‍ॅमंडसेनने शॅकल्टनची मुक्तकंठाने तारीफ केली. तो म्हणतो,

" उत्तर धृवीय संशोधनात जे स्थान फ्रिट्झॉफ नॅन्सनचं आहे तेच दक्षिण धृवाच्या बाबतीत शॅकल्टनचं !"

खुद्द नॅन्सननेही शॅकल्टनची तारीफ केली. तो म्हणतो,

" शॅकल्टन दक्षिण धृवावर पोहोचला नाही हा केवळ नशिबाचा भाग होता ! दक्षिण धृवाच्या इतिहासात त्याचं नाव कायमचं लिहीलं जाईल !"

शॅकल्टनवर कौतुकाचा वर्षाव होत असताना एक माणूस मात्र मनातून खवळला होता तो म्हणजे रॉबर्ट फॅल्कन स्कॉट ! मॅकमुर्डो साऊंड आणि व्हिक्टोरीया लँडवर न जाण्याचं आपण बजावूनही शॅकल्टनने तिकडे काणाडोळा केला याचा स्कॉटला राग आला होता. आपल्या सहका-यांशी बोलताना शॅकल्टनची त्याने गद्दार, दगाबाज या शब्दात संभावना केली !

दक्षिण धृवावर पाऊल ठेवण्यात अद्याप कोणालाही यश आलं नव्हतं !

१९०८ मध्ये जीन बाप्टीस्ट चार्कोटच्या फ्रेंच मोहीमेने अंटार्क्टीकमधील अनेक प्रदेशांचा शोध घेतला. रेनॉड बेटं, मिकेल्सन उपसागर, मार्गारेट उपसागर, जेनी बेट, मिलरँड बेटं अशा अनेक प्रदेशांचे नकाशे फ्रेंचांनी तयार केले. परंतु दक्षिण धृवाच्या दिशेने मजल मारण्यात मात्रं त्यांना अपयशच आलं.

१९०४ मध्ये डिस्कव्हरी मोहीमेवरुन परतल्यावर कॅप्टन रॉबर्ट फाल्कन स्कॉटने पुन्हा आपल्या नौदलातील कारकिर्दीला पुन्हा सुरवात केली. ८२ अंश दक्षिण अक्षवृत्तावरुन परत फिरावं लागलेलं असलं, तरीही पुन्हा अंटार्क्टीकाच्या मोहीमेवर जाण्याचा विचार त्याने सोडला नव्हता. एर्नेस्ट शॅकल्टन निम्रॉड मोहीमेत ८८ अंश दक्षिण अक्षवृतापर्यंत पोहोचून परत फिरल्यावर तर स्कॉटचा निश्चय आणखीनच पक्का झाला. त्यातच मॅकमुर्डो साऊंड आणि व्हिक्टरी लँडच्या आपल्या हक्काच्या प्रदेशातून शॅकल्टनने वाटचाल केल्यामुळे स्कॉट चांगलाच खवळला होता. रॉयल जॉग्रॉफीक सोसायटीच्या पाठींब्याने स्कॉटने पुन्हा अंटार्क्टीकाच्या मोहीमेची जुळवाजुळव केली. या मोहीमेला नाव देण्यात आलं टेरा नोव्हा !

स्कॉटने शॅकल्टनवर प्रखर टीका केली असली, तरीही त्याने शॅकल्टनच्या मोहीमेचा बारकाईने अभ्यास केला होता. शॅकल्टनने डिझेल मोटरवर चालणा-या स्लेजसारख्या गाडीचा वापर केला होता. स्कॉटनेही आपल्या मोहीमेत अशा गाड्यांचा तसेच शॅकल्टनप्रमाणेच घोड्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. मात्रं कुत्र्यांच्या वापराबाबत स्कॉटचं मत फारसं अनुकूल नसलं, तरी योग्य प्रशिक्षणाअंती त्यांचा योग्य वापर करुन घेता येईल याची त्याला कल्पना होती. मात्रं त्याचा मुख्य भर पदयात्रेवरच होता.

मोहीमेची जुळवाजुळव सुरू झाल्यावर स्कॉटने दक्षिण धृवावर जाण्याचा इरादा जाहीर केला.

" ही शास्त्रीय संशोधनमोहीम असली तरीही आमचं मुख्यं लक्ष्यं असेल ते ब्रिटीश साम्राज्याच्या वतीने सर्वप्रथम दक्षिण धृव पादाक्रांत करणं !"
स्कॉटच्या टेरा नोव्हा मोहीमेचा अर्धा खर्च ब्रिटीश सरकारने उचलला असला तरी उरलेल्या खर्चाची तरतूद करण्याच्या दृष्टीने स्कॉटने अनेकांकडून मदत मिळवली होती. प्रत्यक्ष मोहीमेवर निघाल्यावरही त्याला दक्षिण आफ्रीक, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड इथे आर्थिक मदत मिळवण्यात यश आलं होतं.

स्कॉटच्या मोहीमेची जुळवाजुळव सुरू असताना इतरत्रं काय हालचाली सुरू होत्या ?