Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ७

उत्तर धृव पादाक्रांत करण्यात पेरीला यश आल्याच्या बातमीमुळे अ‍ॅमंडसेनच्या मोहीमेला मिळणारा पाठींबा आणि आर्थिक मदत ब-याच प्रमाणात कमी झाली. मोहीमेचा खर्चाच्या तयारीसाठी अ‍ॅमंडसेनने आपलं घरही गहाण टाकलं ! 

उत्तर धृवाऐवजी दक्षिण धृवावर जाण्याचा अ‍ॅमंडसेनने निश्चय केला असला तरी आपल्या बदललेल्या बेताची त्याने कोणालाही चाहूल लागू दिली नाही. आधीच रोडावलेली आर्थिक मदत पूर्णपणे बंद पडण्याची त्याला भीती वाटत होती ! नॉर्वेचा किनारा सोडेपर्यंत केवळ अ‍ॅमंडसेनचा भाऊ लिऑन आणि मोहीमेतील अ‍ॅमंडसनखालोखाल दुस-या क्रमांकाचा अधिकारी थॉर्वल्ड निल्सन यांनाच या बदललेल्या बेताची कल्पना होती !

नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर असताना अ‍ॅमंडसेनला बर्फाळ प्रदेशातील कुत्र्यांची उपयुक्तता ध्यानात आलेली होती. आपल्या धृवीय मोहीमेच्या दृष्टीने त्याने बर्फात वावरण्यास सरावलेले १०० ग्रीनलँड कुत्रे बरोबर नेण्याचा निर्णय घेतला होता. बर्फावर प्रवासाच्या बरोबरच इतर कुत्र्यांना आणि जरुर पडल्यास मोहीमेतील लोकांनाही ताजं मांस मिळण्यासाठी कुत्र्यांचा वापर करण्याचा त्याचा विचार होता !

अ‍ॅमंडसेनच्या उत्तर धृवाच्या मोहीमेबद्दल माहीती मिळाल्यावर कॅप्टन स्कॉटने त्याला इंग्लंडमधून काही उपकरणं पाठवली होती. अ‍ॅमंडसेनने उत्तर धृवावर आणि आपण दक्षिण धृवावर शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने एकाच वेळेस आवश्यक माहीती मिळवावी असा त्यामागे स्कॉटचा हेतू होता. 

ब-याच खटपटी करुन स्कॉटने टेरा नोव्हाला ब्रिटीश नौदलाचं जहाज म्हणून मान्यता मिळवली होती ! त्यासाठी त्याने रॉयल याच स्क्वॉड्रनची सदस्यता मिळवली होती. अन्यथा सामान्य व्यापारी जहाज म्हणून टेरा नोव्हाला अंटार्क्टीकाच्या मोहीमेवर जाण्याची परवानगीच मिळाली नसती ! 

७ जून १९१० ला अ‍ॅमंडसेनने नॉर्वेचा किनारा सोडला ! 

१५ जून १९१० ला टेरा नोव्हाने इंग्लंडचा किनारा सोडला. काही कामानिमीत्त मागे राहीलेल्या स्कॉटने काही दिवसांतच प्रस्थान ठेवलं.

दक्षिण धृवावर पोहोचण्यात कोण बाजी मारणार होतं ?

अ‍ॅमंडसनच्या मोहीमेत थॉमस निल्सन दुस-या क्रमांकाचा अधिकारी होता. फ्रेड्रीक जर्ट्सेन आणि क्रिस्टन प्रेस्टर्ड या दोन लेफ्टनंटचाही त्याच्या मोहीमेत सहभाग होता. प्रेस्टर्डच्या शिफारशीवरुन ऑस्कर विस्टींगची निवड करण्यात आली. स्कीईंगमध्ये तरबेज असणारा ओलाव्ह जालँड, कुत्र्यांचा प्रशिक्षक हेल्मर हॅन्सन, स्वेर हॅसल यांचाही अ‍ॅमंडसनच्या तुकडीत समावेश होता. नॅन्सनच्या शिफारशीवरुन जॅल्मर योहान्सनची निवड करण्यात आली. इतर दर्यावर्दींमध्ये अलेक्झांडर कुचीन, बिजॉर्न हेलँड-हॅन्सन यांचा समावेश होता.

नॉर्वेचा किनारा सोडल्यावर अ‍ॅमंडसेनने उत्तर अटलांटीक मधील क्रिस्टीन्सँड गाठलं. दक्षिणेच्या मोहीमेच्या दृष्टीने त्याने कुत्र्यांचा वापर करण्याचं आधीच निश्चीत केलेलं होतं. क्रिस्टीन्सँडला अ‍ॅमंडसेनची पीटर क्रिस्तोफर्सनशी गाठ पडली. क्रिस्तोफर्सनचा भाऊ दक्षिण अमेरीकेत ब्युनॉस आयर्स इथे नॉर्वेचा अधिकारी होता. अ‍ॅमंडसनच्या मोहीमेला मदत म्हणून ब्यूनॉस आयर्स किंवा मॉन्टेव्हिडीओ इथे इंधन आणि इतर सामग्रीची मदत देण्याचं आश्वासन दिलं. आर्थिक मदतीसाठी धडपडणा-या अ‍ॅमंडसेनला हे वरदान वाटलं नसल्यासच नवंल ! 

९ ऑगस्टला अ‍ॅमंडसेनने क्रिस्टीन्सँड सोडलं आणि मॅडेरा बेटातील फूंचलच्या दिशेने प्रस्थान ठेवलं. क्रिस्टीन्सँड सोडण्यापूर्वी त्याने आपला बेत आपल्या अधिका-यांपैकी क्रिस्टन प्रेस्टर्ड आणि फ्रेड्रीक जर्ट्सेन यांच्या कानावर घातला. मोहीमेची चाललेली तयारी पाहून इतरांपैकी अनेकांचा गोंधळ उडाला होता, मात्रं फारशी कुरकुर कोणीही केली नव्हती.

६ सप्टेंबरला फ्रामने फूंचलच्या किना-यावर नांगर टाकला. ९ सप्टेंबरला फूंचल सोडण्यापूर्वी अ‍ॅमंडसेनने दक्षिण धृवाच्या मोहीमेवर जाण्याचा आपला विचार सर्वांसमोर मांडला. उत्तर धृव गाठण्याचा त्याचा विचार अद्यापही बदललेला नव्हता, परंतु प्रथम लक्ष्यं होतं ते दक्षिण धृव ! अ‍ॅमंडसेनच्या या बदललेल्या मोहीमेला सर्वांनी एकमुखाने पाठींबा दिला !

फूंचल सोडण्यापूर्वी अ‍ॅमंडसेनने स्कॉटला ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथे तार पाठवली.

" आमचा बेत बदलला आहे. आम्ही दक्षिणेला अंटार्क्टीकाच्या दिशेला जात आहोत - अ‍ॅमंडसेन !"

अ‍ॅमंडसेनने फ्रिट्झॉफ नॅन्सनलाही तपशीलवार पत्रं लिहून आपल्या योजनेची कल्पना दिली. पेरी आणि कूकने उत्तर धृव पादाक्रांत केल्याच्या आलेल्या बातम्यांमुळे उत्तर धृव गाठण्याच्या मूळ बेताला हादरा बसल्याचं त्याने नमूद केलं. इतक्या तयारीनंतर आता उत्तर धृवाऐवजी दक्षिण धृवाकडे जाण्याविषयी गत्यंतर नसल्याचं त्याने नॅन्सनला कळवलं. मूळ योजनेतील बदलाविषयी दिलगीरी व्यक्त करण्यासही तो विसरला नाही !

अ‍ॅमंडसेनच्या या बदललेल्या बेताची माहीती नॉर्वेला पोहोचताच एकच गोंधळ उडाला. अनेकांनी अ‍ॅमंडसेनवर टीकेची झोड उठवली, परंतु नॅन्सनने मात्रं त्याला संपूर्ण पाठींबा जाहीर केला. इंग्लंडमध्ये तर जनमत भलतंच प्रक्षुब्धं झालं होतं. अ‍ॅमंडसेनने स्कॉटला जाणिवपूर्वक फसवल्याची भावना सर्वत्र पसरली. रॉयल सोसायटीचा माजी अध्यक्ष क्लेमेंट्स मार्कहॅमने अ‍ॅमंडसेनच्या बदललेल्या योजनेची संपूर्ण माहीती स्कॉटला कळवली.

" मी स्कॉटच्या जागी असतो तर त्यांना अंटार्क्टीकाच्या प्रदेशात पाऊल ठेवू दिलं नसतं !" मर्कहॅम म्हणाला.

अ‍ॅमंडसेनने आपला बेत आयत्यावेळेस बदलला असला तरीही त्याच्यावर करण्यात आलेली टोकाची टीका अनाठायी होती. परंतु दक्षिण धृव ही आपलीच मक्तेदारी मानणा-या ब्रिटीशांना आपल्याला कोणी आव्हान देऊ शकतं हेच मुळात पचनी पडणारं नव्हतं !

अ‍ॅमंडसेनची अंटार्क्टीकाला जात असल्याची तार स्कॉटला मेलबर्नला मिळाली, परंतु अ‍ॅमंडसेनचं अंतिम लक्ष्यं दक्षिण धृव असेल याची स्कॉटला कल्पना आली नाही. स्कॉटच्या मोहीमेच्या तयारीत कोणताही फरक पडला नव्हता. 

टेरा नोव्हा मोहीमेत एकून ६५ माणसांचा सहभाग होता. स्कॉटने आपल्या मोहीमेची नौदलातील अधिकारी आणि सामान्य दर्यावर्दी अशी विभागणी केली होती. स्कॉटच्या डिस्कव्हरी मोहीमेतील सात आणि शॅकल्टनच्या निम्रॉड मोहीमेतील पाचजणांचा त्यात समावेश होता. स्कॉटच्या खालोखाल दुस-या क्रमांकाचा अधिकारी म्हणून लेफ्टनंट टेडी इव्हान्सची नेमणूक करण्यात आली. लेफ्टनंट हॅरी पेनेल, सार्जंट लेफ्टनंट जॉर्ज मरे लेव्हीक आणि एडवर्ड अ‍ॅटकिन्सन आणि ऑफीसर व्हिक्टर कँपबेल टेरा नोव्हाच्या तुकडीत होते. लेफ्टनंट हेनरी बॉवर्स आणि लॅरी ओएट्स यांचाही अधिकारीवर्गात समावेश होता. सामान्य दर्यावर्दींमध्ये अंटार्क्टीकाच्या मोहीमेचा पूर्वानुभव असलेले एडगर इव्हान्स, टॉम क्रेन आणि विल्यम लॅशी यांचा समावेह होता. पॅट्रीक कोहेन, थॉमस क्लिसॉल्ड, डिमीट्री गेरॉव्ह हा कुत्र्यांचा प्रशिक्षक हे देखील टेरा नोव्हाचा हिस्सा होते. त्यांच्या व्यतिरिक्त एडवर्ड विल्सनच्या शास्त्रीय संशोधन पथकात जॉर्ज सिम्प्सन, चार्ल्स राईट, फ्रँक डेबन्हॅम, रेमंड प्रिस्ट्ले, ग्रिफीथ टेलर, अ‍ॅप्सली चेरी-गॅराड यांचा समावेश होता. हर्बर्ट पाँटींग हा फोटोग्राफर होता. नॅन्सनच्या सूचनेवरुन स्कॉटने नॉर्वेजियन स्कीईंग प्रशिक्षक ट्रेगेव्ह ग्रानचाही समावेश केला होता.

२९ नोव्हेंबर १९१० ला स्कॉटने न्यूझीलंडमधील पोर्ट शॅम्लर्सहून अंटार्क्टीकाकडे कूच केलं. वाटेत त्यांना जोरदार वादळाचा मुकाबला करावा लागला. १० डिसेंबरला टेरा नोव्हा बर्फात अडकलं ! तब्बल वीस दिवसांनी त्यांची बर्फातून सुटका झाली. ४ जानेवारी १९११ ला ते रॉस बेटाच्या जवळ पोहोचले. मात्रं केप क्रॉझीयरवर नांगर टाकण्यासाठी त्यांना योग्य जागा आढळली नाही. अखेर हट पॉईंटच्या १५ मैल उत्तरेला असलेल्या केप इव्हान्स इथे ते बर्फावर उतरले. जहाजावरुन सामान उतरवत असताना स्कॉटने आणलेल्या तीनपैकी एका मोटर स्लेजची पूर्ण वाट लागली. १८ फेब्रुवारी पर्यंत त्यांनी राहण्यास योग्यं असं लाकडी घर उभारलं.


केप इव्हान्स, मॅक॑मुर्डो साऊंड मधील स्कॉटची झोपडी

दरम्यान फूंचल सोडल्यावर मध्ये कुठेही न थांबता दक्षिणेचा मार्ग धरलेल्या फ्रामचं १४ जानेवारीला व्हेल्सच्या उपसागरात आगमन झालं ! किना-यापासून सुमारे चार मैल अंतरावर त्यांना योग्यं जागा सापडली. २१ फेब्रुवारीला त्यांनी लाकडी घराची बांधणी पूर्ण केली. अ‍ॅमंडसेनने या घराला नाव दिलं ' फ्रामहेम ( फ्रामचं घर ) !'


फ्रामहेम