Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण १३

फ्रेडरीक कूक आणि रॉब पेरी यांच्या परस्परविरोधी दाव्यांमुळे उत्तर धृव पादाक्रांत करण्याबाबत असलेली संदिग्धता आणि झालेले आरोप-प्रत्यारोप यांची अ‍ॅमंडसेनला पूर्ण कल्पना होती. दक्षिण धृवाबाबत अशी कोणताही वाद होऊ न देण्याचां त्याने मनाशी पक्कं ठरवलं होतं. त्या हेतूने नॉर्वेच्या ध्वजाला केंद्रबिंदू धरुन भोवताली सुमारे साडेबारा मैल त्रिज्येच्या परिसरात खूण म्हणून झेंडे लावण्याची अ‍ॅमंडसेनची योजना होती. दक्षिण धृवावर आपल्या विजयाच्या निर्विवाद खुणा सोडण्याचा त्याचा निश्चय होता.

" आपण दक्षिण धृवावर निश्चितपणे येऊन पोहोचलो होतो हे स्कॉटला या दिशादर्शक झेंड्यांमुळे नक्की समजून येईल !" अ‍ॅमंडसेन आपल्या सहका-यांना म्हणाला.

जालांड, विस्टींग आणि हॅसेलची फार वेळ घालवण्याची तयारी नव्हती. थोड्या विश्रांतीनंतर १५ डिसेंबरच्या पहाटे त्यांनी नॉर्वेचा झेंडा मध्य धरुन आणि ते आलेली दिशा सोडून तीन दिशांना स्कीईंग करण्यास सुरवात केली. प्रत्येकाला आपापल्या दिशेने आता साडेबारा मैल अंतर पार करुन खुणेचे झेंडे उभारायचे होते.

अ‍ॅमंडसेन म्हणतो,
" त्या तिघांनी अंगावर घेतलेली कामगिरी सोपी वाटत असली तरी ती अतिशय अवघड होती.  आमचा लहानसा तंबू त्या बर्फाळ प्रदेशात दूर अंतरावरुन दिसणं हे अशक्यंच होतं. दिशा दर्शवण्यासाठी कंपास योग्य ठरला असता, परंतु आमचे कंपास स्लेजला जोडलेले होते. बर्फात दिशा भरकटणं अगदी सहज शक्यं होतं. हवामान अनुकूल असलं तरी कधीही बदलण्याची शक्यता होती. तसं झालं तर तंबूच्या दिशेने सुखरुप परतणं अशक्यप्राय झालं असतं ! परंतु त्या तिघांना त्याची कसलीच पर्वा नव्हती !"
सुदैवाने कोणतीही अडचण न येता तीन दिशांना गेलेले जालांड, विस्टींग आणि हॅसल सहा तासांनी जवळपास एकाच वेळेला येऊन पोहोचले. आपल्याबरोबर नेलेले खुणेचे झेंडे प्रत्येकाने उभारले होते.

" ब्रिटीशांची कोणतीही खूण दूर अंतरावरही आम्हांला आढळली नाही !" जालांड म्हणाला.

जालांड, हॅसल आणि विस्टींग या कामगिरीवर गेलेले असताना अ‍ॅमंडसेन आणि हॅन्सन यांनी अनेक निरीक्षणं आणि गणिताच्या सहाय्याने दक्षिण धृवाचं नेमकं स्थान अद्याप सात मैलांवर असल्याचं शोधून काढलं होतं ! तिघांनी झेंड्याच्या सहाय्याने खुणा केलेल्या प्रदेशाच्या केंद्रस्थानी हे स्थान होतं. अ‍ॅमंडसेनची मात्रं वादासाठी एवढीशीही संधी ठेवण्याची इच्छा नव्हती.

" उद्या सकाळी आपण या शेवटच्या सात मैलांच्या प्रवासाकरता कूच करणार आहोत !" अ‍ॅमंडसेन आपल्या सहका-यांना उद्देशून म्हणाला, " मला कोणालाही कोणताही वाद निर्माण करण्याची संधी देण्याची इच्छा नाही !"

१६ डिसेंबरच्या सकाळी लवकरच अ‍ॅमंडसेनच्या तुकडीने या शेवटच्या सात मैलांच्या प्रवासासाठी आपला कँप सोडला. शिल्लक असलेल्या सोळा कुत्र्यांना हॅन्सन आणि विस्टींगच्या स्लेजला जोडण्यात आलं. पूर्वी ठरल्याप्रमाणे जालांडची स्लेज तिथेच सोडून ते पुढे निघाले. अ‍ॅमंडसेनने जालांडला सर्वात पुढे जाण्याची सूचना केली. त्याच्यापाठोपाठ हॅसल, आपापल्या स्लेजसह हॅन्सन आणि विस्टींग आणि सर्वात शेवटी अ‍ॅमंडसेन या क्रमाने सकाळी ११.०० वाजता ते दक्षिण धृवाच्या नेमक्या बिंदूपाशी येऊन पोहोचले !

दिवसभरात अनेक निरीक्षणं आणि गणितं याच्या आधारे त्यांनी आपलं नेमकं स्थान निश्चित केलं.

९०' अंश दक्षिण अक्षवृत्त !

दक्षिण धृव !

त्या रात्री जालांडने आपल्या सहका-यांसमोर भाषण ठोकलं ! आपल्या मोहीमेचं नेमकं वर्णन त्याने यथार्थ शब्दांत केलं होतं. त्यानंतर जालांडने एका सिगरेट केसमधून सर्वांना सिगारेट्स दिल्या ! उरलेल्या सर्व सिगारेट्ससह ती केस त्याने दक्षिण धृवाची खास आठवण म्हणून अ‍ॅमंडसेनला दिली ! जालांड स्वतः धूम्रपान करत नसूनही पार फ्रामहेम पासून त्याने ती सिगारेट केस खास या प्रसंगासाठी म्हणून जवळ बाळगली होती !

" आमच्या व्यतिरिक्त तिथे कोणाच्याही अस्तित्वाची कोणतीही खूण आढळली नाही !" अ‍ॅमंडसेन.

दक्षिण धृवाच्या नेमक्या बिंदूवर पोहोचल्यावरही अ‍ॅमंडसेन समाधानी नव्हता ! त्याने आपल्या सहका-यांना तीन मैलाच्या परिघात खुणेचे झेंडे लावण्याच्या कामगिरीवर पाठवलं. दुपारी ती कामगिरी आटपताच अ‍ॅमंडसेनने दक्षिण धृवावर खास निशाणीसाठी आणलेला तंबू उभारला ! या तंबूवर दोन लेबलं शिवण्यात आली होती. एकावर लिहीलं होतं 'बॉन व्हॉयेज' तर दुस-यावर मजकूर होता, ' वेलकम टू ९० डिग्रीज् !'. या तंबूच्या वर बांबूची सऱळसोट काठी उभारण्यात आली आणि त्यावर नॉर्वेचा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. खेरीज फ्राम जहाचाचाही खास झेंडा त्यावर होता ! अ‍ॅमंडसेनने या तंबूला नाव दिलं -

पोलहेम !

धृवावरील घर !


अ‍ॅमंडसेन, हॅन्सन, हॅसल आणि विस्टींग - पोलहेम - ९० अंश दक्षिण - जालांडने काढलेला फोटो

अ‍ॅमंडसेनने पोलहेम मध्ये कागदावर नोंद करुन ठेवली.

रोनाल्ड अ‍ॅमंडसेन
ओलाव्ह ओलाव्हसन जालांड
हेल्मर हॅन्सन
स्वेर हॅसल
ऑस्कर विस्टींग
- १५ डिसेंबर १९११

आपल्या तंबूमध्ये नॉर्वेचा राजा ७ वा हकून याच्या नावाने त्याने पत्रं लिहून ठेवलं होतं.

" महाराज, आम्ही ग्रेट आईस बॅरीअरच्या दक्षिणेच्या बिंदूवर जिथे व्हिक्टोरीया लँड आणि किंग एडवर्ड लँड एकत्र येतात त्या दक्षिण धृवावर पोहोचण्यात यशस्वी झालो आहोत ! वाटेत आढळलेल्या समुद्रसपाटीपासून सुमारे २२००० फूट उंचीच्या पर्वतरांगेचं आपल्या परवानगीने आम्ही क्वीन मॉड पर्वतश्रेणी असं नामकरण केलं आहे. ८९ अंश दक्षिण अक्षवृत्तापासून दक्षिण धृवावर पोहोचेपर्यंत आढळलेल्या मोठ्या पठाराला आम्ही आपलं - किंग हकून ७ वा असं नाव दिलं आहे ! - रोनाल्ड अ‍ॅमंडसेन, पोलहेम, ९० अंश दक्षिण - १७ डिसेंबर १९११."
आपल्या पाठोपाठ दक्षिण धृवावर पोहोचणारा पहिला माणूस कॅप्टन स्कॉट असेल याची अ‍ॅमंडसेनला खात्री होती. नॉर्वेच्या राजाच्या नावाने लिहीलेलं हे पत्रं पोहोचवण्याची विनंती करणारी चिठी त्याने स्कॉटच्या नावाने लिहीली.

अ‍ॅमंडसेन म्हणतो,
" ज्या मार्गाने आम्ही दक्षिण धृवावर पोहोचलो होतो, त्याचा विचार करता फ्रामहेमकडे परतताना वाटेत काहीही घडण्याची शक्यता होती ! दुर्दैवाने आमच्यापैकी कोणीही जिवंत परत गेला नाही तर आम्ही दक्षिण धृव गाठल्याची बातमी नॉर्वेपर्यंत पोहोचवण्यासाठी ते पत्रं कामी येणार होतं !"
राजाच्या नावने लिहीलेलं पत्रं आणि स्कॉटला लिहीलेल्या चिठीव्यतिरिक्त अ‍ॅमंडसेनने स्कॉटच्या तुकडीसाठी काही साधनसामग्री मागे ठेवली होती. उत्तर धृवाच्या मोहीमेकरता स्कॉटने पाठवलेल्या उपकरणांचा त्यात समावेश होता. त्याचबरोबर रेनडीयरच्या कातड्यापासून बनवलेले उबदार कपडे, एक सेक्स्टंट आणि इतर काही उपकरणं होती.

संध्याकाळी साडेसातच्या सुमाराला अ‍ॅमंडसेनने दक्षिण धृवाचा निरोप घेतला आणि उत्तरेकडे मोहरा वळवला.

" गुडबाय डियर पोल !" अ‍ॅमंडसेन उद्गारला, " पुन्हा आपली भेट होईल असं वाटत नाही !"

विस्टींगने आपल्या डायरीत स्कॉटविषयी सहानुभूती व्यक्तं केली,
" बिचारा कॅप्टन स्कॉट ! इतक्या मेहनतीनंतर इथे पोहोचल्यावर इथे नॉर्वेजीयन झेंडा आणि पोलहेम पाहून काय वाटेल याची कल्पनाही करवत नाही !"
अ‍ॅमंडसेन दक्षिण धृवावर विजयी झेंडा रोवून परत फिरत असताना कॅप्टन स्कॉट कुठे होता ?

अ‍ॅमंडसेनचा मार्ग :-