Get it on Google Play
Download on the App Store

पार्श्वभूमी

दुसर्या महायुद्धापर्यंत अणुशक्ति हा फक्त शास्त्रज्ञांचा विषय होता. अणुस्फोटातून ऊर्जा प्रचंड प्रमाणात बाहेर पडत असल्यामुळे बॉंब बनवण्यात तिचा उपयोग करण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्नशील होते. अखेरच्या पर्वांत जर्मनीचे लक्ष रॉकेटच्या विकासाकडे लागले आणि नाझीवादाच्या उदयानंतर अनेक आघाडीचे जर्मन शास्त्रज्ञ देश सोडून गेले होते. या दोन गोष्टींमुळे जर्मनीने अणुशक्तिकडे पुरेसे लक्ष दिले नव्हते. अर्थात हे प्रचंड खर्चाचेहि काम होते. जपानलाहि त्यांचे प्रयत्न सोडावे लागले होते. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अनेक देशांचे शास्त्र्ज्ञ एकत्रितपणे अणुशक्तीवर संशोधन करीत होते. युरेनियमच्या खाणी सुरू करण्यापासून तयारी होती. निसर्गात मिळणार्या युरेनियममध्ये U235 चे प्रमाण अत्यल्प असते. ते वाढवणे, enrichment, हे एक किचकट व खूप खर्चाचे काम असते. ०.७२ % वरून हे प्रमाण ८०% पर्यंत वाढवावे लागते तेव्हां अणुबॉंब बनतो. किरणोत्सर्गामुळे हे अतिशय धोकादायकही असते.
मात्र ३-४% पर्यंत प्रमाण झाले तर त्याचा वापर करून Nuclear Reactor चालवतां येतो. त्यांत निसर्गातील U235 बरोबर जो U238 हा युरेनिअमचा दुसरा प्रकार मिसळलेला असतो त्याचे रूपांतर PU239, PU240 वगैरे प्लुटोनियम च्या प्रकारांत होते. प्लुटोनियम हा अतिशय घातकी प्रकारचा धातु असून त्याच्या विघटनापासून दुसर्या प्रकारचा व अधिक शक्तिशाली अणुबॉंब बनतो.  (सुदैवाने प्लुटोनिअम नैसर्गिकपणे मिळत नाही!) युद्धाच्या शेवटच्य़ा पर्वांत या दोन्ही प्रकारचे बॉंब अमेरिकेने बनवले व जपानविरुद्ध त्यांचा वापर केला. हिरोशिमावर टाकलेला अणुबॉंब हा युरेनिअमचा होता तर दुसरा नागासाकीवर टाकलेला प्लुटोनिअमचा होता व त्याची घातकता फार मोठी होती. अमेरिकेने प्लुटोनिअम बनवले आहे हे दिसल्यावर जपानचा धीर खचला व त्यानी शरणागति पत्करली. त्यावेळी दर आठवड्याला एक असे हवे तेवढे प्लुटोनियम बॉंब टाकण्याची अमेरिकेची तयारी झालेली होती. युद्धानंतर अमेरिका, रशिया व इतर अनेक राष्ट्रांनी या सर्व पायर्या ओलांडून Hydrogen Bomb हि बनवले व अनेक Tests केल्या हे आपणाला माहीत आहेच.