Get it on Google Play
Download on the App Store

श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३५७०

३५५१.

पूर्वी हिरण्यकश्यपाचे कुळीं । नामा जन्मे भूमंडळीं ॥१॥

तेथें हरिभक्ति करी । तेणें तोषला नरहरी ॥२॥

घेउनी अवतार । राखी भक्तासी सादर ॥३॥

भक्ताचा अंकित । एका जनार्दनीं शरणागत ॥४॥

३५५२.

पुढलीये जन्मीं नामा तो अंगद । भक्तिभावें तोषविला राम सदगद ॥१॥

परंपरा भक्ति हेचि असे भाक । देऊनियां देवें केलें कौतुक ॥२॥

एका जनार्दनीं भक्ताचे मनोरथ । स्वयें रमानाथ पुरवितसे ॥३॥

३५५३.

तिसरे अवतारीं नामा उध्दव जन्मला । करुनी कृष्ण दास्यत्व मान्य पैं जाहला ॥१॥

ज्ञान वैराग्य भक्ति कृष्ण सांगे तयासी । तेणें चुकविलें शापबंधासी ॥२॥

भागवत मथितार्थ स्वयें सांगे आपण । कृष्णावेगळा न जाय अर्धक्षण ॥३॥

यापरी दास्यत्व तेथें निकट केलें । एका जनार्दनीं म्हणे वंदूं त्यांचीं पाउलें ॥४॥

३५५४.

द्वारकेहुनी विठु पंढरीये आला । नामयाचा पूर्वज दामशेटी वहिला ॥१॥

दामा आणि गोणाई नवसी विठूसी । पुत्र देईं आम्हां देवा भक्तराशी ॥२॥

तोचि नामदेव जन्म शिंपियाचे कुळीं । भक्तातें पाहुनी वेधला वनमाळी ॥३॥

एका जनार्दनीं परंपरा कथियेली । धन्य धन्य विठु अनाथाची माउली ॥४॥

३५५५.

पंच वरुषी नामा जाहला । छंद विठूचा लागला ॥१॥

जाऊनियां राउळांत । तेथें सावकाश बैसत ॥२॥

विठ्ठल हरि वाचे छंद । विठ्ठलें लाविलासे वेध ॥३॥

एका जनार्दनीं सार । मंत्र जपे त्रिअक्षर ॥४॥

३५५६.

ऐसे बहु दिन लोटले । दामा नामयासी बोले ॥१॥

जाउनी बैसशी राउळीं । सुखें सदा सर्वकाळीं ॥२॥

नाहीं प्रपंचाचा घोर । पुढें कैसा रे विचार ॥३॥

नको धरुं छंद मनीं । विनवी एका जनार्दनीं ॥४॥

३५५७.

विठुच्या छंदासी । पडतां आहे रे विवसी ॥१॥

संसाराची वाताहात । नामया होसी तूं निवांत ॥२॥

वडिलाची गोष्टी । नामा सांगे जगजेठी ॥३॥

एका जनार्दनीं वेधलें मन । ध्यानीं मनीं विठ्ठल पूर्ण ॥४॥

३५५८.

नावडे़चि आन । एका विठ्ठलावांचून ॥१॥

नावडे संसार सर्वथा । आवड बैसली पंढरीनाथा ॥२॥

नायके शिकविलें कोणाचें । विठ्ठल विठ्ठल साचें ॥३॥

एका जनार्दनीं मन । विठ्ठलीं लागलेसें ध्यान ॥४॥

३५५९.

दामा सांगे गोणाईसी । पोरें धरिलीसे विवसी ॥१॥

न पाहे संसाराचा छंद । मनीं धरिला तो गोविंद ॥२॥

एका जनार्दनीं सांगे । पुत्र जन्मोजन्मीं न फिटे पांग ॥३॥

३५६०.

उभयतां काकुलती येती । नाम्या नको करुं फजिती ॥१॥

आम्हां आलें वृध्दपण । कोण चालवी दुकान ॥२॥

व्यापाराचा नाहीं धाक । सुखें बैसशी तूं देख ॥३॥

अन्नवस्त्र नाहीं घरीं । एका जनार्दनीं निर्धारीं ॥४॥

३५६१.

कां रे नाम्या नायकशी । म्हणोनी ताडित तयासी ॥१॥

नको जाऊं राउळास । म्हणोनी कोंडिती तयास ॥२॥

अन्न उदकाविण पीडिती । परी तो विठू ध्याय चित्तीं ॥३॥

मनीं करीतसे खेद । एका जनार्दनीं गोविंद ॥४॥

३५६२.

नामा न जातां राउळासी । विठु जातसे घरासी ॥१॥

अरे नाम्या म्हणोनि बाहे । शिव्या देती बापमाय ॥२॥

आमुच्या पोरासी सवे । येणें लावियेली पाहें ॥३॥

करुं नेदी संसारकाम । एका जनार्दनीं हा निष्काम ॥४॥

३५६३.

येणें आमुच्या पोरा लाविलासे चाळा । तो हा वेगळा उपाधीसी ॥१॥

प्रपंचाचा धाक नाहीं याचे मागें । फ़िरतसे अंगे घरोघरीं ॥२॥

घरीं कोंडोनियां ठेवितां नामयासी ।A आपण त्यापाशीं बैसतसे ॥३॥

जातो येतो कैसा न पडेचि दृष्टी । एका जनार्दनीं नाही विठु ऐसा ॥४॥

३५६४.

याचिया छंदा जें पैं लागलें । निर्मूलन केलें त्यांचे येणें ॥१॥

बापुडा नारदु लाविला लंगोटी । हिंडे दाटोदाटि त्रैलोक्यांत ॥२॥

हरिश्चंद्र शिबी कोण यांची गती । आपण निवांत चित्तीं पाहतसे ॥३॥

एका जनार्दनीं याचा छंद नाहीं बरा । मैंद खरा वाळुवंटीं ॥४॥

३५६५.

घालूनियां फ़ांसा वोढी आपणाकडे । न येतां सांकडें घाली बहु ॥१॥

भजातियाचे निवारी आघात आपण । न भजतिया अकल्याण करी स्वयें ॥२॥

ऐशी याची सवे मागाहुनी आली । एका जनार्दनीं बोली काय बोलों ॥३॥

३५६६.

याचिये संगतीं दु:खाची विश्रांती । संसार वाताहाती होत असे ॥१॥

आम्ही प्रंपचीक करावा प्रंपच । हा तो निष्प्रपंच होउनी असे ॥२॥

येणें आमुच्या पोरा लावियेला चाळा । आपण निराळा राहुतसे ॥३॥

एका जनार्दनीं ऐशियाची माव । न येतां नामदेव कींव भाकी ॥४॥

३५६७.

म्हणे नामयासी क्षण एक न पाहातां । होय माझ्या चित्ता कासाविशी ॥१॥

तुमचा पुत्र तुम्हांसी जैसा प्रिय । तैसा मज होय नामदेव ॥२॥

क्षणोक्षणीं येणें पुरविली पाठी । लाविली लंगोटी आम्हांलागीं ॥३॥

एका जनार्दनीं वारितां नायके । येऊनियां सुखें बैसतो घरीं ॥४॥

३५६८.

शिव्या देतां यासी हांसतसे सुखें । न मानी कांहीं दु:खें नाम्यासाठीं ॥१॥

ऐसें येणें मोहिलें आमुचिया बाळा । हा कोठोनि काळा आला येथें ॥२॥

एका जनार्दनीं पुरविली पाठी । काय याची गोठी सांगावी ते ॥३॥

३५६९.

आम्ही यासी नवस केला । शेखीं कामा बराच आला ॥१॥

आम्ही पाहुं पुत्रसुख । हा तो दावितसे दु:ख ॥२॥

आमुचें जाईल दारिद्र्य जन्मांचें । ऐसें मनीं होतें साचें ॥३॥

एका जनार्दनीं कष्टी । येणें पुरविली पाठी ॥४॥

३५७०.

आमुचिया पोरा । नाहीं बैसावया थारा ॥१॥

ऐसा याचा पायगुण । न मिळे खावयासी अन्न ॥२॥

हाटा बाजारासी जातां । जाऊं नेदी पैं सर्वथा ॥३॥

माझा नामा कोठें आहे । नामा नामा म्हणोनी वाहे ॥४॥

एका जनार्दनीं सवे । येणें लावियेली देवें ॥५॥