सांवतामाळीचरित्र - अभंग ३६६४ ते ३६७६
३६६४.
भक्ताचे मनोरथ पुरवी नारायण । अवतार म्हणोनी धरी स्वयें ॥१॥
नामदेवाप्रती जाहला अभिमान । लाडिकाचि पूर्ण मी तो भक्त ॥२॥
कौतुक दावावया माव देव करिती । नामदेवाप्रती काय बोले ॥३॥
एका जनार्दनीं परिसा सादर । देव भक्तांचा परिकर संवाद तो ॥४॥
३६६५.
देव म्हणे नाम्या जातो मी पळोनी । काढी पां धुंडोनी मजलागीं ॥१॥
ऐसें म्हणोनी देवें घातलीसे कास । निघे ह्रषीकेश पाहुनी नाम्या ॥२॥
क्षणीं होय गुप्त क्षणीं तो प्रगट । पाठीं लागे स्पष्ट नामदेव ॥३॥
दूर गेलिया देव माळा पुष्पें टाकी खूण । तीं तें ओळखून नामा येत ॥४॥
एका जनार्दनीं भक्ताचा कैवारी । अभिमान बोहरी करितसे ॥५॥
३६६६.
संसारीं असोनी जीनन्मुक्त भक्त । आलासे धांवत तया भेटी ॥१॥
समाधिसुखें तल्लीन वाचे नारायण । लाविले नयन उन्मळीत ॥२॥
माथां ठेवुनी हात केला सावधान । वदे नारायण सांवत्यासी ॥३॥
येतां तुझे भेटी चोर मागें आला । लपवी मजला लवलाही ॥४॥
एका जनार्दनीं ऐकोनियां बोल । सांवत्याने सखोल दृष्टी केली ॥५॥
३६६७.
त्रिभुवनामाजीं चाले ज्याची सत्ता । म्हणे तत्त्वतां चोर आला ॥१॥
तयाचिया भेणें पळोनियां आलों । बोलतां हे बोल नवल चोज ॥२॥
एका जनार्दनीं दावुनी लाघव । सांवत्याचें वैभव प्रगट करी ॥३॥
३६६८.
देव म्हणे सांवत्या लपवी मजला । उशीर बहु जाहला येईल चोर ॥१॥
लपावया स्थान नसे दुजें आन । उदर फ़ाडून लपविला ॥२॥
भक्ताचे उदरीं बैसे नारायण । कृपेचें सिंहासन घालूनियां ॥३॥
एका जनार्दनीं नामा तेथें आला । माग तो वहिला नाहीं कांही ॥४॥
३६६९.
पाहुनी दशदिशा नामा रडूं लागे । कां बा पांडुरंगे ऐसे केलें ॥१॥
चरणाचा माग येथवरी आला । येथें गुप्त जाहला करुं काय ॥२॥
का हो केशिराजा अवकृपा केली । माझी सांडी सांडिली देवराया ॥३॥
एका जनार्दनीं रडतां नामदेव । पाहिलेंसे तेव्हां सांवत्यानें ॥४॥
३६७०.
येवोनी जवळीं कुर्वाळिलें वदन । चालिले स्फ़ुंदन सदगदित ॥१॥
सांवता म्हणे नाम्या कां रे रडतोसी । काय जाहले तुजसी सांग मज ॥२॥
नामा म्हणे देव पळोनियां आले । येथें गुप्त जाहले न कळे कांहीं ॥३॥
एका जनार्दनीं करितसे खेद । कां हो तो गोविंद दुरी गेला ॥४॥
३६७१.
बैसोनी निकटीं सांवत्याजवळीं । कां हो वनमाळी न दिसे मज ॥१॥
कां हें कर्म आड आजी आलेंसें बाड । न दिसे उघड विठु माझा ॥२॥
कोणत्या लिगाडें पाडिलीसे तुटी । कां हो जगजेठी अंतरला ॥३॥
मजविण क्षण तयासी कंठेना । एका जनार्दनीं मना कठिण केलें ॥४॥
३६७२.
आजी मी तयाचे न पाहतां चरण । देईन आपुला प्राण याचिक्षणीं ॥१॥
जाणोनी निर्धार सांवता बोले त्यासी । ह्रदयनिवासी आत्माराम ॥२॥
अभिमानें नाडले प्रपंचीं भागलें । ते या श्रीविठ्ठलें उध्दरिले ॥३॥
नामदेव तुज तंव नाहीं अभिमान । मग कळली खूण अंतरांत ॥४॥
एका जनार्दनीं सदगद होउनी । मिठी घाली चरणीं सांवत्याच्या ॥५॥
३६७३.
सर्वभावें तुज आलों मी शरण । भेटवी निधान वैकुंठीचें ॥१॥
तयावीण प्राण कासावीस होती । भेटवी श्रीपती मजलागीं ॥२॥
तुम्ही संत उदार सोइरे निजाचे । दरुशन तयाचें मज करवा ॥३॥
एका जनार्दनीं ऐशी भाकी कींव । अभिमान सर्व दुरी गेला ॥४॥
३६७४.
निरभिमानें नामयासी देखिलें । सांवत्यानें वहिलें धरिलें पोटीं ॥१॥
सांवत्याचें अंतरीं झळके पीतांबर । नाम्यानें सत्वर वोळखिलें ॥२॥
धरुनियां दशी काढिला बाहेर । जाहला जयजयकार तया वेळीं ॥३॥
एका जनार्दनीं पाहूनियां देव । मिठी घाली नामदेव चरणासी ॥४॥
३६७५.
घालूनियां मिठी करीत स्फ़ुंदन । न सोडी चरण विठोबाचे ॥१॥
कां रे मायबापा लावियेली सवे । ऐशी वां कां माव केली आतां ॥२॥
नामयासी देवें करें उचलिलें । प्रीतीनें आलिंगिलें तये वेळीं ॥३॥
एका जनार्दनीं सज्जनांचा दास । म्हणोनी चरित्रास कथियेलें ॥४॥
३६७६.
माळियांचे वंशी सांवता जन्मला । पावन तो केला वंश त्याचा ॥१॥
त्यासवें हरी खुरुपूं लागे अंगें । धांउनी त्याच्या मागें काम करी ॥२॥
पीतांबर कास खोवोनी माघारी । सर्व काम करी निजसंगें ॥३॥
एका जनार्दनीं सांवता तो धन्य । तयाचें महिमान न कळे कांहीं ॥४॥