Get it on Google Play
Download on the App Store

गोराकुंभारचरित्र - अभंग ३६३३ ते ३६६३

३६३३.

सत्यपुरीं ऐसें म्हणती तेरेसी । हरि भक्तराशी कुंभार गोरा ॥१॥

नित्य वाचे नाम आठवी विठ्ठल । भक्तिभाव सबळ ह्रदयामाजीं ॥२॥

उभयतांचा प्रपंच चालवी व्यापार । भाजन अपार घडितसे ॥३॥

एका जनार्दनीं ऐका सविस्तर । पुढील प्रकार आनंदानें ॥४॥

३६३४.

प्रेमयुक्त भजन करी सर्वकाळ । विठ्ठल विठ्ठल बोले वाचे सदा ॥१॥

मृत्तिका भिजवी भाजनाकारणें । प्रेमयुक्त नाचणें नाममुखीं ॥२॥

एके दिनीं कांता ठेवुनी जवळी बाळ । उदकालागीं उताविळ जाती जाहली ॥३॥

एका जनार्दनीं मूल तें रांगत । आलें असे त्वरित मृत्तिकेजवळीं ॥४॥

३६३५.

लावूनियां नेत्र सदा समाधिस्थ । आठवी अनंत ह्रदयामाजीं ॥१॥

नाहीं देहावरी रुपीं जाहला मग्न । नाचे उडे पूर्ण विठ्ठलनामें ॥२॥

अज्ञान तें बाळ धरित तें पायां । चित्त देवराया समरसलें ॥३॥

एका जनार्दनीं नाचतां समरसें । बाळ पायांसरसें चिखलीं आलें ॥४॥

३६३६.

नेणवेची बाळ कीं हे मृत्तिका । मन गुंतलेंसे देखा पांडुरंगीं ॥१॥

मृत्तिकेसम जाहला असे गोळा । बाळ मिसळला मृत्तिकेंत ॥२॥

रक्त मांस तेणें जाहला गोळा लाल । नेणवे तात्काळ गोरोबासी ॥३॥

एका जनार्दनीं उदक आणुनी कांता । पाहे तंव तत्वतां बाळ न दिसे ॥४॥

३६३७.

येवोनियां जवळीं बोभाट तो केला । धरुनी हाताला पुसती जाहली ॥१॥

ठेवूनियां बाळ जीवनालागीं गेलें । तुम्हीं काय केलें बाळ माझें ॥२॥

परि तो समाधिस्थ नायकेचि बोल । वाचे गाय विठ्ठल प्रेमभरित ॥३॥

नाचे आनंदानें गाय नामावळी । एका जनार्दनीं बोली कोण मानी ॥४॥

३६३८.

अट्टाहास शब्द करुनि कांता रडे । आहा मज येवढें बाळ होतें ॥१॥

जळो तें भजन आपुलेनि हातें । बाळ मृत्तिकेंत तुडविलें ॥२॥

ऐकोनियां शब्द जाहला पैं सावध । एका जनार्दनीं क्रोध आला मनीं ॥३॥

३६३९.

अहा गे पापिष्टे भजन भंगिलें । ताडनालागीं घेतलें काष्ठ हातीं ॥१॥

नेणवेची बाळ आपण तुडविलें । भजनाचें वाटलें दु:ख मनीं ॥२॥

घेऊनियां काष्ठ तांतडी धांवला । कां गे त्वा भंगिला नेम माझा ॥३॥

एका जनार्दनीं मारुं जाता घाय । तेव्हां कांता बोले काय गोरोबासी ॥४॥

३६४०.

स्पर्श कराल मजसी तरी विठोबाची आण । ऐकतांचि वचन मागें फ़िरे ॥१॥

जनमुखें सर्व कळाला समाचार । परि अंतरी साचार व्यग्र नोहे ॥२॥

ह्रदयी ध्यातसे रखुमाईचा पती । निवारिली भ्रांती संसाराची ॥३॥

एका जनार्दनीं चालविला नेम । परि पुरुषोत्तम नवलपरी ॥४॥

३६४१.

संसाराचा हेत राहिला मागें । अंगसंग वेगें नोहे कांते ॥१॥

एकांती राहाती परि न लिंपे कर्मा । वाउगाचि प्रेमा वरी दावी ॥२॥

माझ्या विठोबाची घातलीसे आण । नहोचि संतान वंशासी या ॥३॥

एका जनार्दनीं ऐसें चालत आलें । परि स्त्रियेनें केलें नवल देखा ॥४॥

३६४२.

आपुल्या पित्यासी तिणें बोलाविलें । जाहलें तें कथिलें वर्तमान ॥१॥

पतीचा संकल्प नोहे अंगसंग । राहिला उद्योग प्रपंचाचा ॥२॥

महाजन शेटे सर्व मेळविले । विचारी बैसले कुल्लाळ सर्व ॥३॥

धाकुटी ती मूल आपण पैं द्यावी । संतती चालवावी गोरोबाची ॥४॥

एका जनार्दनीं करुनी विचार । विवाह प्रकार केला दुजा ॥५॥

३६४३.

विधियुक्त पाणिग्रहण पैं जाहलें । जामातालागीं वहिलें काय बोले ॥१॥

तुम्ही हरिभक्त दुजा नाहीं भाव । चालवा गौरव उभयतां ॥२॥

एक एकपणें न धरावें भिन्न । पाळावें वचन वडिलांचें ॥३॥

एका जनार्दनीं सांगूनियां मात । घातली शपथ विठोबाची ॥४॥

३६४४.

गोरियानें केला मनासीं विचार । हाचि एक निर्धार बरा जाहला ॥१॥

लिगाड तें आपोआप मावळलें । विषयांचे जाहलें तोंड काळें ॥२॥

विठ्ठलें करुणा केली सर्वपरी । तारियेलें भवपुरीं संसाराचें ॥३॥

एका जनार्दनीं खुंटला वेव्हार । नाहीं आन विचार प्रपंचाचा ॥४॥

३६४५.

उपवर ती कांता जाहली असे जाण । गोर्‍याची वासना नाहीं कामीं ॥१॥

विठोबाची आण घालोनि निरविलें । उभयतां ते वहिलें पाळा तुम्ही ॥२॥

सांगूनियां बध्द आपुल्या ग्रामा गेला । पुढें काय विचार जाहला परियेसा ॥३॥

एका जनार्दनीं सुखरुप तिघें । कामधाम वेगें करिताती ॥४॥

३६४६.

ऐसे बहुत दिन तयांसी लोटले । उभयतां कळलें गुज त्याचें ॥१॥

स्त्रियेचें चरित्र न कळे ब्रम्हादिकां । उभयतां विचार देखा करिताती ॥२॥

दोघी दो बाजूंस करिती शयन । कर उचलोनि धरती ह्रदयीं ॥३॥

सावध होउनी पाहे कर चोरी गेला । एका जनार्दनीं त्याला शिक्षा करुं ॥४॥

३६४७.

चोरासी खंडन करावें हाचि धर्म । आणीक नाहीं वर्म दुजें कांहीं ॥१॥

माझ्या विठोबाची आज्ञा पैं मोडिली । शपथ पाळिलीं नाहीं दुष्टे ॥२॥

घेऊनियां शस्त्र केलें पैं ताडन । खंडिले कर जाण उभयतां ॥३॥

एका जनार्दनीं करितां सुपरीत । तों घडलें विपरीत स्त्रियेसीं हें ॥४॥

३६४८.

कामाचिया आशें घडला प्रकार । राहिला वेव्हार प्रपंचाचा ॥१॥

भाजन घडणें राहिलें सर्वथा । पडियेली चिंता अन्नवस्त्रा ॥२॥

उदरानिमित्त कष्ट बहु करिती । निर्भय तो चित्तीं असे गोरा ॥३॥

एका जनार्दनीं न सोडीच भजन । पाहूनि नारायण काय करी ॥४॥

३६४९.

रुक्माईसी सांगे एकांतासी गोठी । गोर्‍याची कसवटी पांडुरंग ॥१॥

माझियाकारणें कर तोडियेले । सांकडें पडिलें मज त्याचें ॥२॥

माझिया भक्ताची मज राखणें लाज । म्हणोनियां गुज तुज सांगितलें ॥३॥

एका जनार्दनीं उभयतां निघाले । सांगाते घेतलें गरुडासी ॥४॥

३६५०.

वेष पालटोनी देव कुंभार पैं जाहले । गरुडासी केलें गाढव तेव्हां ॥१॥

येऊनियां तेरें पुसतसे लोकां । कुल्लाळ तो देखा गोरा कोठें ॥२॥

आम्ही परदेशी जातीचे कुंभार । नाम विठु साचार मज म्हणती ॥३॥

एका जनार्दनीं गोरियाचिया वाडां । आलासे उघडा देवराव ॥४॥

३६५१.

पाहूनियां गोरा दंडवत घाली । म्हणे कोण स्थळीं वस्ती तुम्हां ॥१॥

पंढरीसी राहतों परदेशी आम्ही । नाम तरी स्वामीं विठु माझें ॥२॥

सांगतो कांता आहे बरोबरी । परिवार तरी एवढाचि ॥३॥

ऐकोनियां मात गोरा संतोषला । रहावें कामाला माझे घरीं ॥४॥

विठु म्हणे हाचि हेतु धरुनी आलों । एका जनार्दनीं जाहलों निर्भय आतां ॥५॥

३६५२.

राहिला हरि लक्ष्मीसहित घरीं । दैन्य सहपरिवारीं पळोनी गेलें ॥१॥

उठोनी पहाटे गरुडा खोगीर घाली । मृत्तिका वहिली वरी आणी ॥२॥

भाजनें तीं नानापरी करी । नाटकी मुरारी चाळक जो ॥३॥

ऐसे सुखरुप राहिलें निर्धारे । न कळे विचार गोरोबासी ॥४॥

एका जनार्दनीं पुढें काय जाहलें । सर्व दैन्य गेलें गोरोबाचें ॥५॥

३६५३.

आषाढीची यात्रा आला पर्वकाळ । निघाला संतमेळ पंढरीसी ॥१॥

निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताई । आणिकही अनुभवी संत बहु ॥२॥

येतां त्याची मार्गे तेरेसी ते आले । तिहीं पुशियेलें गोरोबासी ॥३॥

गावांतील जन सांगती प्रकार । गोरियाचा विचार जाहला सर्व ॥४॥

परदेशी कुंभार पंढरीचा विठा । राहिलासे वांटा करुनियां ॥५॥

ज्ञानदेव खूण आणितलीं मनीं । एका जनार्दनीं पाहूं त्यातें ॥६॥

३६५४.

इकडे रुक्माईसी सांगे करुणाकर । चला पैं सत्वर पंढरीये ॥१॥

गरुडासहित वेगें पैं निघाले । पूर्ववत आले पंढरीये ॥२॥

एका जनार्दनीं भक्ताचा कैवारी । ऐसे करुनी हरी उभा विटे ॥३॥

३६५५.

गोरियाच्या वाडा संत प्रवेशले । गोरियाने देखिले दृष्टीं सर्व ॥१॥

देउनी आसन बैसविलें संतां । तंव ज्ञानदेव पुढतां होउनी बोले ॥२॥

कर ते तुटले प्रपंच चाले कवणे परी । येरु म्हणे वांटेकरी पंढरीचा ॥३॥

ज्ञानदेव म्हणती तयासी बोलवा । तंव ते लगबगा धांवे कांता ॥४॥

स्त्रियेसहित नाहीं तेथें कुंभकार विठा । एका जनार्दनीं वांटा गेला कवणें ॥५॥

३६५६.

येऊनियां कांता सांगे गोरियासी । सहकुटुंबेंसी विठा नाहीं ॥१॥

मृत्तिका आणावयाची नाहीं जाहली वेळ । गेलासे समूळ न पडे दृष्टीं ॥२॥

ऐकतांचि ऐसी ज्ञानदेवें गोठी । गोरियासी कंठी धरियेलें ॥३॥

परदेशी नोहे पंढरीपणा । केलेंसे कारणा कार्य तुझें ॥४॥

आमुतें न भेटे जाहला असे गुप्त । एका जनार्दनीं मात प्रगटली ॥५॥

३६५७.

ज्ञानदेव म्हणे भाजनें आणावीं । तंव तीं देखिलीं अवघीं दिव्यरुप ॥१॥

उचलोनी करीं घेतलें भाजन । विठ्ठल विठ्ठल जाण शब्द निघे ॥२॥

सकळ ते संत गोरियासी म्हणती । धन्य तुझी भक्ति त्रैलोक्यांत ॥३॥

एका जनार्दनीं पाक सिध्द जाहला । बैसलासे मेळा भोजनासी ॥४॥

३६५८.

सारुनी भोजनें कीर्तनीं बैसले । थोरीव वर्णिले विठोबाचे ॥१॥

प्रात:काळीं स्त्रियांसहित तो गोरा । निघालासे त्वरा पंढरीये ॥२॥

संतसमुदाय सवें पैं असती । पावलें त्वरित भीमातीरीं ॥३॥

एका जनार्दनीं करुनियां स्नान । घेतिलें दरुशन पुंडलिकाचें ॥४॥

३६५९.

संत ती मंडळी महाद्वारां आली । मूर्ति देखियेली विटेवरी ॥१॥

चरणावरी माथां ठेविती भक्तजन । आनंदले लोचन पाहुनी भक्त ॥२॥

महाद्वारी नामा कीर्तनीं उभा ठेला । मिळालासे मेळा सकळ संत ॥३॥

सद्रदित कंठ कीर्तन करतां । एका जनार्दनीं सर्वथा भक्त होती ॥४॥

३६६०.

कीर्तनाचा गजर होत आनंदाने । तंव नामा म्हणे उच्चारा नाम ॥१॥

टाळी बाहुनी होतें मुखीं वदा नाम । ऐकतां सकाम भक्त जाहले ॥२॥

गोरियाचे मना संकोच वाटला । कर नाहीं आपुल्याला टाळी वाहतां ॥३॥

वाटलेंसे दु:ख नयनीं नीर आलें । एका जनार्दनीं बोले नाम मुखीं ॥४॥

३६६१.

मुखीं नाम वदे करें वाहे टाळी । कीर्तनाचे मेळीं सद्रदित ॥१॥

भक्ताचा महिमा वाढवी श्रीपती । कीर्तनीं गोरियाप्रती कर आले ॥२॥

टाळी पिटूनियां नामाचा उच्चार । करीत साचार गोरा तेव्हां ॥३॥

एका जनार्दनीं पुरला मनोरथ । मूलही कीर्तनांत देखियेलें ॥४॥

३६६२.

गोरियाचे कांता आनंदली चित्तीं । वंदिली माता ती रुक्मादेवी ॥१॥

रुक्मादेवी म्हणे न करा काहीं चिंता । शपथ सर्वथा मुक्त होय ॥२॥

ऐसें भक्तचरित्र ऐकतां कान । होतसे नाशन महापापा ॥३॥

एका जनार्दनीं पुरले मनोरथ । रामनाम गर्जत आनंदेसी ॥४॥

३६६३.

कुल्लाळ वंशांत गोरा कुंभार । कीर्ति चराचर भरियेलें ॥१॥

प्रतिज्ञा करुनी करकमळ तोडी । भाजनेंही घडी श्रीविठ्ठल ॥२॥

नाम निरंतर वदतसे वाचे । प्रेम मी तयाचें काय वानूं ॥३॥

एका जनार्दनीं भक्ताचा कैवारी । भाजनें तीं करीं घरीं त्याच्या ॥४॥