निर्गुणाचा पाळणा
सुतार निर्गुणिचे तुजसाठीं आणविले । पाळणे रंगित बनविले ॥
चहुं बाजुंना चिमण्या मोर बसवीले । पाळण्यांत बाळ निजविले ॥
निज निज बाळा रे झोंके देतां हात दुखला । गाणे गाता कंठ हा सुकला ॥
जाई जुई चमेली पुष्पांनी पाळणा गुंफिला । न जाणो खडा बाळाला रुतला ॥१॥
केव्हाची मी हालविते न सुचे कामधाम आणि धंदा । निज रे बाळा गोविंदा ॥
रडे एकचि हा हरि मोठा बाजिंदा । कोणी घ्या मनमोहन मुकुंदा ।
काय सांगु सखे झाले बाळ मसि यंदा । घेत अलाबला या तीनदा।
घ्या घ्या बायांनो पाळण्यात हरि मुतला । न जाणो खडा बाळला रुतला ॥२॥
कोणॆ पापिणीची दृष्ट लागली ग बाई । बाळ अगदिंच स्तन घेत नाही ॥
काय सांगू सखे उपाय करु तरी काई । नेत्र झाकले उघडित नाही ॥
जिव झुरतो हा दु:खी बाळाचे पायी । कोठेचि मन लागत नाही ॥
कोण सवतीने भरला भिलावा उतला । न जाणॊ खडा बाळला रुतला ॥३॥
रुप बाळाचे काय सांगू तुजपाशी । जसे भानु आले उदयासी ॥
अहा रे भगवंता घडले काय अशा पुळ्यासी । तुझी कळा न कळे कोणासी ॥
जीव ध्यातो रे ध्यातो सदा तुजपाशी । चला वेगें वैकुंठासी ॥
मनि गडबडला जीव सेवेमधी गुन्तला । न जाणॊ खडा बाळाला रुतला ॥४॥