पाळणा - जो जो जो जा रे मधुसुदना ।...
जो जो जो जा रे मधुसुदना । बाळा जगजीवना ।
हालवी यशोदा पाळणा । निज नारायणा ॥ध्रु०॥
प्रथम अवतारीं क्षीराब्धीं । स्तवन करितां विधी ।
करुणा परिसूनी गुणनिधी । शंखासुरासि वधी ॥जो०॥
द्वितीय संकटीं इंद्रासी । कूर्मरुप तूं होसी ।
सिंधू मंथुनियां श्रमलासी । सौख्य सकळां देसी ॥जो०॥
तिसरा वराह हिरण्याक्षी । धरणी घालुनि कुक्षीं ।
पळतां धरियेला अनुलक्षी । फोडुनि त्याच्या कुक्षीं ॥जो०॥
चतुर्थ नरसिंह विशाळ । अग्नीचा कल्लोळ ।
निवटुनि असुरासी समूळ । काढी अंतरमाळ ॥जो०॥
पंचम वामन सुंदर । खुजट द्विजवर ॥
तेजें भुलवील दिनकर । धरिला दानासुर ॥जो०॥
षड्रिपु भार्गव विंदानीं । पिता तो जमदग्नी ।
पृथ्वी निःक्षत्रीं तिहिं बाणीं । दिधली विप्रां दानीं ॥जो०॥
सप्तम अयोध्यापुरवासी । राजाराम होसी ।
पितृवचनातें पाळीसी । राहुनियां वनवासी ॥जो०॥
अष्टम अवतारीं गोंकुळीं । झालासी वनमाळी ।
चाणुरकंसादि मंडळी । निवडुनि केली होळी ॥जो०॥
पूतना कपटार्थी कुटमंत्रीं । शोधुनि पाहें धरित्री ।
प्रचंड मेघांत दशसूत्रीं । लक्षुनि धरिली धात्री ॥जो०॥
बौद्ध कलंकी होणार । पुढील युगांतर ।
करुं नये अव्हेर दातार । दासा चरणीं थोर ॥जो०॥