पाळणा - जो जो जो जो रे व्यापका । ...
जो जो जो जो रे व्यापका । सृष्टीच्या पालका ।
निज निज निज बा तूं बालका । तान्हुल्या सात्त्विका ॥ध्रु०॥
धांवसि दासाच्या धांवणिया । म्हणवुनि श्रमली काया ॥
श्रम सांडुनियां निज ध्येया । हालवितें पाळणिया ॥जो०१॥
शीतें व्यापिलें तुज भारी । निजतां सागरजठरीं ॥
आला काळीमा शरीरीं । फणिवर धुधुःकारीं ॥जो जो०२॥
अद्भुत तव महिमा श्रुतिनिगमा । नकळे तुझी सीमा ।
तो तूं स्त्रीकामा घनश्यामा । अंतरी धरुनी कामा ॥जो जो०३॥
तुजला कैसी बा लाज नसे । कैसें झालें पिसें ।
त्र्यंबक प्रभु विनवी तुज बहुसें । येत असे रे हांसें ॥जो०४॥