बालपण
केशव गंगाधर टिळक उर्फ लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. ते जातीने चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण होते. टिळकांचे पूर्वज सात-आठ पिढ्यांपासून रत्नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते.गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत. त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती.वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पु्ण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यात एका ऍंग्लो-व्हर्न्याक्युलर शाळेत प्रवेश घेतला.तेथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली. पुण्याला आल्यावर लवकरच त्यांच्या आई मरण पावल्या आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचा पण स्वर्गवास झाला. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्याचे काका गोविंदपंत यांनी केला. गोविंदपंत स्वतः अशिक्षित असले तरी त्यांनी टिळकांना नेहमी प्रोत्साहन दिले. मृत्युपूर्वी गंगाधरपंतानी त्यांचा विवाह दहा वर्षाच्या तापीबाई बरोबर करून दिला.