Get it on Google Play
Download on the App Store

न्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्यूकेशन सोसायटी

समाजपरिवर्तन शिक्षणाशिवाय अशक्य आहे असे टिळक व आगरकर दोघांचेही मत होते. त्या काळात विष्णुशास्त्री चिपळूणकर,जे सरकारी शाळेत शिक्षक होते, यांचाही स्वतःची शाळा काढण्याचा मानस होता. कॉलेज संपल्यावर टिळक, आगरकर तसेच त्यांचे मित्र नामजोशी, करंदीकर यांनी चिपळूणकरांना मदत करण्याचे ठरवले व १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. शालेय शिक्षण जितके स्वस्त करता येईल तितके स्वस्त करण्याचा संस्थापकांचा उद्देश होता. पण तसे करतांना शाळेचा दर्जा ढासळणार नाही याचीपण काळजी त्यांनी घेतली. न्यू इंग्लिश स्कूल तात्काळ प्रसिद्ध झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पालक आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवू लागले. १८८०-१८८६ दरम्यानची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळाली.

त्यांच्या कामाला भक्कम पाया आणि सातत्य देण्यासाठी त्यांनी डेक्कन एज्यूकेशन सोसायटी या नावाची सार्वजनिक संस्था उभारण्याचे ठरविले. १८८३ च्या सुमारस त्यांनी या कामाला सु्रुवात केली. संस्थेच्या विश्वस्त समितीमध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. यामध्ये सर. विल्यम वेडरबर्न, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या संस्थापकांपैकी एक असे महादेव गोविंद रानडे, इतिहासकार रामकृष्ण गोपाळ भांडारकर, शिक्षणतज्ञ एम. एम. कुंटे तसेच प्रख्यात वकील के. पी. गाडगीळ यांचा समावेश होता. तेव्हाचे मुंबईचे गव्हर्नर सर जेम्स फर्गसन हे संस्थेचे पहिले देणगीदार होते. त्यांनी संस्थेसाठी १२५० रूपयांची देणगी दिली. सर जेम्स फर्गसन यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी संस्थेच्या कॉलेजचे नाव फर्गसन महाविद्यालय ठेवण्याचे एकमताने ठरवण्यात आले. यामागे एक व्यवहारिक उद्देशपण होता. गव्हर्नरचे नाव कॉलेजला दिल्यामुळे अनेक भारतीय संस्थाने स्वतःहून देणगी देण्यासाठी पुढे आले आणि २ जानेवारी १८८५ ला फर्गसन कॉलेज अस्तित्वात आले. फर्गसन कॉलेजच्या संस्थापकांचे स्पष्ट मत होते की पाश्विमात्य शिक्षणाचा भारतात प्रसार होणे अत्यंत निकडीचे आहे. चिपळूणकर आणि टिळक तर इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हणत. संस्थेच्या कामाने प्रभावित होऊन सरकारने डेक्कन कॉलेजचे व्यवस्थापन संस्थेला सुपुर्त करण्याचा प्रस्ताव मांडला. पण संस्थेच्या आजीवन सदस्यांनी याला नकार दिला. याला अनेक कारणे असली तरी मूळ कारण सरकारची दोन युरोपियन शिक्षक ठेवण्याची अट हे होते.

पण संस्थेच्या अन्य सभासदांसमवेत बाह्य-उत्पन्नाच्या विषयावरून झालेल्या वादामुळे डिसेंबर १८९० मध्ये टिळकांनी संस्थेचा राजीनामा दिला आणि स्वतः पूर्णवेळ केसरी व मराठा या वृत्तपत्रांमध्ये संपादन करू लागले.