कॉलेज जीवन
डेक्कन कॉलेजमध्ये असतांना त्यांना अनेक मान्यवंत शिक्षकांच्या हाताखाली शिकता आले. प्रोफेसर वर्ड्सवर्थ आणि प्रोफेसर शूट यांनी त्यांची अभिजात इंग्रजी साहित्यातील रूची वाढवली तर गणित शिकवणार्या प्रोफेसर केरूअण्णा छत्रे यांनी त्यांच्यावर विशेष छाप टाकली. कॉलेजच्या दिवसात त्यांचे वाचनपण प्रचंड होते. त्यांनी संस्कृत धर्मग्रंथे, इंग्रजीमधील राजनीती आणि अतिभौतिकी (मेटा-फिजिक्स) वरील पुस्तके (विशेषतः हेगेल, कांट, स्पेंसर, मिल, बेंथम, व्हॉल्तेअर आणि रूसो) तसेच मराठीमधील संतसाहित्याचे वाचन केले. कॉलेजमधील मित्रांमध्ये ते स्पष्टवक्ते आणि बेधडक म्हणून प्रसिद्ध होते. १८७७ मध्ये, गणितामध्ये प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन ते बी.ए. झाले. बी.ए.ची पदवी मिळाल्यावर त्यांनी एल.एल.बी. करण्याचे ठरवले. त्यांची गणितातील रूची आणि संशोधनाची आवड पाहता एल.एल.बी. करण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या मित्रांसाठी धक्कादायक होता. त्यांनी टिळकांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले, " ज्या अर्थी, मी माझे आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण करण्याचे ठरवले आहे, त्या अर्थी मला असे वाटते की, कायद्याचे ज्ञान मला उपयोगीच पडेल. मला वाटत नाही की माझे आयुष्य ब्रिटिश साम्राज्याविरोधात संघर्षाशिवाय व्यतित होईल."