Get it on Google Play
Download on the App Store

धर्मांतराची घोषणा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोट्यवधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटत होते. सवर्णाच्या मनात कधी तरी अस्पृश्यांबद्दल सद्भावना जागृत होईल या आशेवर ते सतत प्रयत्‍नशील होते. हिंदू धर्मात आपल्याला समतेची वागणूक देण्यात यावी यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. आधीच्या पाच वर्षापासून नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या जिकरीने लढा चालवीत होते. पण बहुतांश हिंदूना अस्पृश्य कधीच मानवाच्या बरोबरीचे वाटत नव्हते. त्यांना दलित वा अस्पृश्य जनता ही नेहमी कुत्र्यामांजरापेक्षाही खालच्या दर्जाची वाटे. याचा एकंदरीत परिणाम असा झाला की बाबासाहेबानी समतेसाठी केलेला लढा पाच वर्षात मातीला मिळाला. याच दरम्यान जेव्हा नाशिकचा लढा चालू होता तेव्हा बाबासाहेब गोलमेज परिषदेत गुंतून गेले होते, त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यंकर्त्यांमार्फत हा लढा सतत पाच वर्षे सुरू ठेवला. तिकडे गोलमेज परिषदेच्या माध्यमातून अस्पृश्यांसाठी मिळेल ते खेचून आणण्याचे काम तर चालूच होते व त्याला चांगले यशही आले. पण नाशिकच्या लढ्यात मात्र सनातनवाद्यांनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेशापासून रोखण्यासाठी मोठी ताकत लावून लढा दिला. शेवटी या सनात्यन्यांच्या अमानवी वृत्तीला कंटाळून बाबासाहेबांनी हिंदू धर्म त्यागाचा म्हणजेच धर्मांतराचा निर्णय घेतला. ज्या धर्मात आम्हाला कुत्र्याचीही किंमत नाही त्या धर्मात आता आपण राहायचे नाही असा निर्धार करून बाबासाहेब धर्मांतराचा विचार आपल्या कार्यकर्त्यांना बोलून दाखवू लागले, त्यांची मने चाचपून पाहू लागले. कार्यकर्त्यांकडून सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रतिक्रिया येऊ लागल्या. पण धर्मत्यागाच्या बाजूने आलेला कल प्रचंड व लक्षणीय होता. आपल्या समाजातील मोठा जनसमुदाय या हिंदू धर्माचा त्याग करण्यास तयार आहे हे कळल्यावर, बाबासाहेबांवर दुसरी जबाबदारी येऊन पडली. ती म्हणजे पर्यायी धर्म निवडायचा कुठला? जेथे परत जातवादाची पुनरावृत्ती होईल अशा दुसऱ्या धर्मात अजिबात जायचे नव्हते. प्राथमिक पातळीवर बाबासाहेब कार्यकर्त्यांशी संवाद साधून धर्मांतर करण्याच्या निर्णयावर येतात. आणि येत्या काही दिवसात येवल्यात भरणाऱ्या परिषदेत ही घोषणा करण्याचे ठरले.

१३ ऑक्टोबरइ.स. १९३५ रोजी येवला येथे परिषद भरली. भारताच्या कानाकोपऱ्यातून अस्पृश्य जनता येवले नगरी मोठ्या संख्येने येऊन धडकली. लोकांची अलोट गर्दी रस्त्यानी ओसंडू लागली. प्रचंड उत्साह व बाबासाहेबांच्या प्रती असलेली निष्ठा जमलेल्या लोकांच्या वर्तनातून, त्यांच्या शिस्तीतून दिसत होती. राहण्याची, खाण्यापिण्याची सोय करताना संयोजकांच्या नाकी नऊ आले. १०,००० वर जनसमुदाय येवले नगरी धडकला. बाबासाहेबांचे येवला परिषदेस आगमन होते. येवला परिषदेचे स्वागताध्यक्ष अमृत धोंडिबा रणखांबे होते. लोकांनी भरगच्च भरलेल्या सभामंडपात बाबासाहेबांची अत्यंत प्रभावी आणि हिंदू धर्माचा समाचार घेणारे तेजस्वी भाषण सुरू झाले. बाबासाहेब म्हणतात, "मागच्या पाच वर्षापासून आपण सर्वानी मोठ्या कष्टाने काळाराम मंदिराची चळवळ चालविली. पैसा आणि वेळ खर्ची घालून चालविलेला हा पाच वर्षाचा झगडा व्यर्थ गेला. हिंदूच्या पाषाणहृदयाला पाझर येणे अशक्यप्राय आहे, हे आता पक्के झाले आहे. काळारामाच्या निमित्ताने माणूसकीचे अधिकार मिळविण्यासाठी चालविलेली ही चळवळ निष्फळ ठरली. अशा या निर्दय व अमानुष धर्मापासून फारकत घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपण हिंदू आहोत केवळ याच कारणास्तव आपल्यावर हे अस्पृश्यत्व लादण्यात आले आहे. तेच जर आपण दुसऱ्या धर्माचे असतो तर हिंदू आपल्यावर अस्पृश्यत्व लादू शकले असते काय? हा धर्म सोडून एखाद्या दुसऱ्या धर्मात जावे असे तुम्हाला वाटत नाही काय?" बाबासाहेबांच्या या विधनांवर सभेतील लोकांनी मोठ्या उत्साहात टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. बाबासाहेब पुढे म्हणतात,

    मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही घोषणा येथील तत्कालीन समाजव्यवस्थेला दिलेला मोठा धक्का होता. जागतिक पातळीवर या घटनेची नोंद झाली. धर्मसंस्थाने हादरली. परिवर्तनवादी विचारवंतांनी बाबासाहेबांच्या या घोषणेचे स्वागत केले.[२९] ही भीमगर्जना ऐकून अस्पृश्य लोकांमध्ये एक उत्साहाची लाट उसळली. जो अस्पृश्य काल या परिषदेस येताना हिंदूचा गुलाम होता, लादलेल्या द्रारिद्‌र्‍याचा बळी होता, तो आता या घोषणेने मनोमनी या सर्व गुलामीतून मुक्त झाला होता. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या भीमगर्जनेतून एक निर्णायक संदेश अस्पृश्यांपर्यंत पोहचला.

भाषणाच्या शेवटी बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्याना आदेश देतात की, आता हा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह बंद करा. पाच वर्ष आपण खूप खटाटोप केली. हिंदूंच्या हृदयात आपल्यासाठी अजिबात स्थान नाही तेव्हा आता हा धर्म सोडून आपण नव्या धर्मात जाणार आहोत. एक नवे पर्व सुरू होत आहे. आम्हांला देवाच्या दर्शनासाठी वा भक्तिभावासाठी म्हणून हा प्रवेश पाहिजे होता असे नव्हे तर समानतेचा अधिकार म्हणून हा प्रवेश हवा होता. जेव्हा यांचा देव आणि हे आम्हांला प्रवेश देऊन समान मानण्यास मागच्या पाच वर्षात मोठ्या एकीने आमच्या विरोधात लढले, तेव्हा आता आम्हीही निर्णायक वळणावर आलोत. मानवी मूल्ये नाकारणार्‍यांना नाकारण्याच्या निर्णयावर आलोत. जातिभेद मानणारा असा हा यांचा देवही नको व त्याचा धर्मही नको. आपल्या वाटा आपणच शोधू या. अन आता नव्या धर्मात जाण्याच्या तयारीला लागू या. आणि अशा प्रकारे अस्पृश्यांच्या आयुष्यात एका नव्या पहाटेच्या भीमगर्जनेनी ही येवले परिषद संपन्न होते. कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात व उत्साहात परतीला निघतात.

बाबासाहेब अांबेडकर

अमित
Chapters
बाबासाहेब अांबेडकर सुरुवातीचे जीवन उच्च शिक्षण कोलंबिया विद्यापीठ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन जातिसंस्था विषयक सिद्धान्त वकिली अस्पृश्यतेचा विरोध महाडचा सत्याग्रह बहिष्कृत हितकारिणी सभा मनुस्मृतीचे दहन मनुस्मृती दहन अंबादेवी मंदिर सत्याग्रह पर्वती मंदिर सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह कृषी व शेती संबंधीचे विचार शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभाग व खोती पद्धतीवर बंदी गोलमेज परिषद पुणे करार स्वतंत्र मजूर पक्ष 'बाबासाहेब' उपाधी राजकीय कार्य बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना दलित शिक्षणसंस्थेची स्थापना पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना स्त्रियांसाठी कार्य स्वातंत्र्य लढा धर्मांतराची घोषणा धर्मविषयक दृष्टिकोन व धर्मचिकित्सा हिंदू कोड बिल भारतीय स्वातंत्र्याविषयी विचार दुसरा विवाह संविधानाची निर्मिती आर्थिक नियोजन रिझर्व बँक ऑफ इंडिया बुद्ध जयंतीचे प्रणेते बौद्ध धम्मात धर्मांतर महापरिनिर्वाण पत्रकारिता मानध पदव्या वारसा प्रेरणादायी आंबेडकर प्रत्येक भाषेत आंबेडकरवादी भारतीय समाजावरील प्रभाव लोकप्रिय संस्कृतीमध्ये