महापरिनिर्वाण
नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे कार्यक्रम उरकून आणि आता धम्मचक्र पुन्हा एकदा गतिमान झालेले पाहून बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला 'वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट'च्या चौथ्या परिषदेस हजर राहले आणि आणि तेथिल प्रतिनिधींसमोर 'बुद्ध की कार्ल मार्क्स' या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा कसा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये दोन भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभात भाग घेतला, राज्यसभेच्या अधिवेशनात सहभागी झाले आणि आपल्या 'भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स' या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथाच्या प्रस्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता ६ डिसेंबर इ.स. १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण (निधन) झाले. तेव्हा त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध बनून केवळ सातच आठवडे झाले होते, तरीसुद्धा त्या अल्पशा काळात बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी सम्राट अशोकनंतर त्यांनी अन्य कोणाही भारतीयापेक्षा सर्वात अधिक कार्य केले होते.
डॉ. आंबेडकरांची अंत्ययात्रा राजगृह (हिंदू कॉलनी), दादरवरून १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, परळ, एलफिन्स्टन ब्रिज, सयाी रोड, गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आता चैत्यभूमी) सायकांळी ६ वाजता पोहोचली. अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक दु:खित अंत:करणाने सामील झाले होते. ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर मुंबई मध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई हे त्यांच्या जीवनकार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते. चार मैल लांबीच्या यात्रेत लाखो लोक सहभागी झाले होते आणि तिला दादरमधील 'राजगृह'या डॉ. आंबेडकरांच्या निवास्थानापासून स्थानिक स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यास चार तास लागले. मुंबई शहराने पाहिलेली ती सर्वात मोठी अत्यंयात्रा होती. त्यानंतर दहनसंस्कारास उपस्थित राहिलेल्यापैंकी एक लाख लोक त्यांच्या अस्थींबरोबर तैनातीने राजगृहापर्यंत गेले. परंतु दहनभूमी सोडण्यापूर्वी त्यांनी बाबासाहेबांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार तत्क्षणी दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होऊन तेथे उपस्थित असलेल्या बौद्ध भिक्खूंपैकी महापंडित डॉ. आनंद कौशल्यायन यांनी त्रिशरण व पंचशील देऊन त्याच ठिकाणी १० लाख लोकांना बौद्धधम्माची दीक्षा दिली.