कफन..
अंधारमय पाऊल वाट
माझी मीच चालत आलो,
उन्हातला सूर्य मी
डोईवर झेलीत आलो...
काट्यांच्या कुरणावरती
सदा रक्तबंबाळ झालो,
तळहाताच्या बघून रेषा
माझं रक्त मीच प्यालो..
माळरान सारं दुःखाचं
उगीच उसवीत आलो,
बघून चंद्र पुनवेचा
अंधारात हरवून आलो...
बालपणीचा देह उघडा
डोळ्यांनी पाहत आलो,
सरणावरती माझा मीच
कफन घेऊन विझून गेलो....
संजय सावळे