माणूस...
पोटासाठी माणूस येथे
लाचार किती झाला,
फाटलेली लक्तरे त्याची
माघे ठेवून गेला..
सदैव हात वरती
तोंडी असे मायबाप,
ताई अक्का ही म्हणे
जेव्हा पाठीत असे पोट ..
सण-वार नव्हते माहीत कधी
रोजचं असायची होळी,
मिळालं कधी थोडं तर
व्हायची साजरी दिवाळी..
अंघोळीची गरज कधी
त्याला भासली नाही,
पोटातला वणवाच
कधी मिटला नाही...
स्मशानात नेतांना
कुणीही रडला नाही,
जळाल्यावर पिंडाला
कावळाही शिवला नाही...
मरतांनाही मुक्या वेदना
सोडून येथे गेला,
जन सामान्यांच्या मनातुन
भिकारी एक मेला...
संजय सावळे