Get it on Google Play
Download on the App Store

१२ बेस्ट (बॉम्बे इलेट्रिकल सप्लाय ॲन्ड ट्रॅम कंपनी)

ट्रॅम बंद होऊन चाळीस पन्नास वर्षे झाली तरीही अजून तेच नाव कायम आहे .

मुंबईतील ट्रॅम व मुंबईतील परंतु मध्य रेल्वेसंबंधी(लोकल नव्हे) मला आलेला चांगला अनुभव सांगण्याचा विचार आहे .या सेवांमधील अनेक त्रुटी व आलेले वाईट अनुभव बरेच जण सांगताना दिसतात .माझ्या मनात दोघां संबंधीचे चांगले  अनुभव घर करून राहिलेले आहेत..

सन--१९५३ मध्ये मी मुंबईला शिक्षणासाठी एक वर्ष होतो.दिवाळीमध्ये माझे आई वडील , आते ,आतेबहिण,व आतेभाऊ आले होते. कोकणातील कोणाही माणसाचे मुंबईत कितीतरी नातेवाईक असतात .अंधेरी ते ठाकूरद्वार अनेक ठिकाणी नातेवाईक पसरलेले होते .शक्यतो सगळ्यांना भेटण्याची आई वडील आते यांची इच्छा होती .या सगळ्यांना रेल्वे बस ट्रॅम टॅक्सी यातून सुरक्षितपणे फिरवण्याची जबाबदारी माझ्यावर होती .त्याचबरोबर मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे दाखवण्याची जबाबदारी माझ्यावर होती .बस व रेल्वेमधून या पाच सहा जणांना घेऊन सुरक्षित व्यवस्थित प्रवास जरा धोकादायकच .त्यामुळे माझा भर ट्रॅममधून फिरण्यावर होता .टॅक्सीने फिरणे खर्चिक व ट्रॅमने फिरणे सर्वात स्वस्त .ट्रॅममधून मुंबईचा नजारा बघत बघत सावकाश फिरता येत असे.वेळ जाई परंतु  तो आमच्याजवळ खूप  होता .त्या वेळी मुंबईत सर्वत्र ट्रॅम होत्या .किंग्ज सर्कलपासून कुलाब्यापर्यंत ट्रॅमचे छानपैकी जाळे होते. हे जाळे मुख्यत्वे पूर्व बाजूला होते.ऑपेरा हाऊस पासून किंग्ज सर्कलवरून येणारी ट्रॅम परळ गिरगाव वरून कुलाबा हाऊसपर्यंत जात असे . पश्चिमेला गिरगाव ठाकुरद्वार ते कुलाब्यापर्यंत ट्रॅम  उपलब्ध होत्या  .मला स्मरते त्याप्रमाणे .ट्रॅम्सचे त्यावेळी फक्त एक आणा भाडे होते. त्यामध्ये कुठूनही कुठेही जाता येत असे.ही  सुरुवातीला उल्लेख केल्या प्रमाणे १९५३ची गोष्ट आहे .

आम्ही एका नातेवाईकांकडे ऑपेरा हाऊसजवळ गेलो होतो .ऑपेरा हाऊस पासून ट्रॅमस् ठाकूरद्वार धोबीतलाव फ्लोरा फाऊंटन ते कुलाबा हाऊसपर्यंत जात असे .                                  आम्ही अॉपेरा हाऊसला ट्रॅमध्ये बसलो .आई जवळ एक पिशवी होती . त्याला चेन वगेरे काहीही नव्हते. पिशवीमध्ये चांदीचे भांडे खाऊचे पुडे पिशव्या काही खण(ब्लाऊज पीसेस ) पैशाचे पाकीट देवाला ठेवण्यासाठी तांदूळ सुपारी खोबरे  इत्यादी होते .ट्रॅममध्ये पाठ टेकण्यासाठी व्यवस्था असे.आम्ही ट्रॅममध्ये बसल्यावर आईने तिच्या हातातील पिशवी पुढच्या  सीटच्या पाठीवर अडकवली .आम्ही ठाकूरद्वारला उतरताना आई ती पिशवी घेण्याचे विसरली. ट्रॅम पुढे निघून गेली आणि आईला ती पिशवी घेण्याचे आपण विसरलो हे लक्षात आले .ट्रॅममधील पिशवी आता मिळणे अशक्य आहे अशी आमची समजूत झाली .आई अतिशय नर्व्हस झाली. आम्ही काळाराम गोराराम यांचे दर्शन घेऊन ठाकूरद्वारला नातेवाईकांकडे गेलो . पिशवी कशी हरवली त्याची चर्चा तेथे झालीच .आमची पिशवी राहिली ती ट्रॅम फ्लोरा फाऊंटन पर्यंतच जाणार होती .तिथे जावून कंट्रोल रूममध्ये चौकशी करावी असे मला काकानी (ज्यांच्याकडे उतरलो होतो ) सुचविले.मुंबईत माणूस हरवले तरी सापडणे कठीण तिथे पिशवी काय सापडते असा  आमचा सर्वांचा समज होता .तरीही प्रयत्न करून बघावा म्हणून मी दुसऱ्या दिवशी एकटाच फ्लोरा फाऊंटनला गेलो .तिथे कंट्रोल रूममध्ये मला सांगण्यात आले की येथे जे काही ट्रॅममध्ये  सापडलेले सामान कंडक्टर जमा  करतो, ते कुलाब्याला इलेक्ट्रिक हाऊसमध्ये, लॉस्ट अँड फाऊंड सेक्शनमध्ये जमा केले जाते  .काल येथे जमा झाले असल्यास ते कुलाबा हाऊसला मिळेल . मी दुसरी ट्रॅम पकडून  कुलाबा हाऊसला गेलो .तिथे मी वेळ ट्रॅम व वस्तूंची सर्व माहिती दिल्यावर मला पिशवीचा रंग विचारला आणि एक पिशवी आणून दाखविली . पिशवीतील सामानाचे वर्णन विचारले त्याप्रमाणे वस्तू आहेत की नाहीत ते चेक केले.माझी सही घेऊन पिशवी माझ्या ताब्यात दिली .चांदीचे भांडे, खाऊच्या पिशव्या ,ब्लाऊज पीसेस ,तांदूळ, इत्यादी  सर्व सामान जसेच्या तसे होते पिशवी उघडी असूनही त्यातून कुणीही काहीही काढून  घेतले नव्हते .ती पिशवी कुणीही उतारू घेऊन जाऊ शकला असता .त्यातील सामानाची अफरातफर कंडक्टर करू शकला असता .परंतु यातील काहीही झाले नाही .वस्तू हरवण्याचा जसा योग तसाच तो परत मिळण्याचाही असावा .पॅसेंजर पासून सर्वांचा प्रामाणिकपणा पाहून आम्हाला खरेच गहिवरून आले. मुंबईकरांपासून आम्ही सर्व आश्चर्यचकित झालो .असे काही अनुभवास आले की अजूनही चांगली माणसे जगात आहेत यावरचा विश्वास दृढ होतो .

दुसरा अनुभव रेल्वे संबंधी आहे याचा उल्लेख मी अगोदर एका पोस्टमध्ये केला आहे .तरीही ते पुन्हा सांगितल्याशिवाय राहवत नाही                                            .कोकणातून सुटी घालवून आल्यानंतर आम्ही मुंबईला दादर स्टेशनवर नाशिकला  जाण्यासाठी आलो .गाडी आल्यावर सर्वत्र चिक्कार गर्दी असल्यामुळे मी सौ व तीन वर्षांची लहान मुलगी रिझर्वेशनच्या डब्यामध्ये चढलो .आम्हाला नाशिकला जावयाचे आहे .आम्ही दहा अकरापर्यंत उतरून जाऊ .असल्यास बसण्यासाठी जागा द्यावी अन्यथा आम्ही दरवाजाजवळ उभे राहू असे कंडक्टरला सांगितले .तोपर्यंत हमालाने व आतेभावाने आमचे सामान रॅकवर ठेवून दिले होते .कंडक्टर काहीही ऐकून घेण्याच्या  मनस्थितीत नव्हता . त्याने आम्हाला उतरून घ्या म्हणून सांगितले.मी उगीचच वादावादी न करता खाली उतरण्याचे ठरविले . सर्व सामानासहित चालत्या गाडीतून आम्ही उतरलो .दुर्दैवाने एक महत्त्वाचे बेडिंग गाडीत राहून गेले .त्यामध्ये सुटीत तपासण्यासाठी गावी नेलेले पेपर्स होते .गाडी तर निघून गेली आता काय करावयाचे असा प्रश्न पडला .पेपर्स(बेडिंग) निघून गेल्यामुळे वरिष्ठांना उत्तर काय द्यावयाचे हाही प्रश्न होताच .माझ्या आतेभावाने व मी आपण स्टेशन मास्तरना भेटून सर्व हकीगत सांगू कल्याणला त्या डब्यातून बेडिंग काढून घेण्यास सांगू असे ठरविले .आम्ही दोघानी त्याप्रमाणे दादरच्या स्टेशनमास्तरकडे जाऊन सर्व हकीकत सांगितली . त्यांनी आमच्या समोरच कल्याणच्या स्टेशन मास्तरांना फोन करून गाडी डबा व सामानाचे वर्णन दिले .आम्ही बेडिंग मिळेल  यांची आशा सोडली होती.एवढी कार्यक्षमता तत्परता दाखवून डब्यातून ते बेडिंग उतरवून घेतले  जाईल असे आम्हाला वाटत नव्हते . त्यानंतर आलेल्या दुसऱ्या गाडीतून आम्ही कल्याणला गेलो . तिथे सर्व सामान उतरवले .घाई घाईने स्टेशन मास्तरच्या केबिनमध्ये गेलो व सर्व हकीगत सांगितली .आम्ही तेच याची खात्री पटवून घेतल्यानंतर स्टेशन मास्तरने आमचे बेडिंगआम्हाला परत दिले .एवढ्या गाड्या येत जात असताना व इतर कामाचा रगाडा असताना आमची गाडी आल्यावर त्यातून हमालाला पाठवून ते सामान बरोबर आणले गेले याचे आम्हाला आश्चर्य वाटले .आम्ही स्टेशन मास्तरचे पुन्हा पुन्हा आभार मानले कौतुक केले व  आलेल्या गाडीत बसून नाशिकला आलो. माझे वडील नेहमी म्हणत असत की जे आपले आहे ते कुणीही कधीही नेऊ शकत नाही व जे आपले नाही त्याचे तुम्ही कितीही संरक्षण केले तरी ते जाणारच.

३१/८/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

स्मृतिचित्रे

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
०१ यात्रा (डोर्ले ते शेटफळे) ०२ यात्रा (होडीतून) ०३ यात्रा (नाशिक ते गुळे व्हाया महाबळेश्वर) ०४ यात्रा (नाशिक ते गुळे व्हाया रनपार) ०५ यात्रा (नाशिक ते गुळे) ०६ यात्रा--- दुर्गम----- खडतर ०७ डोळे ०८ दहाचा आकडा ०९ कातकरी १० गणपतीपुळे पहिले दर्शन ११ चमत्कार १२ बेस्ट (बॉम्बे इलेट्रिकल सप्लाय ॲन्ड ट्रॅम कंपनी) १३ पावस १ १४ पावस २ १५ पोत एक अजब उपचार १६ ऐशी वर्षांपूर्वीचा कोकणातील दुर्गम प्रवास १७ नाशिकचे पहिले दर्शन १८ देव तारी त्याला कोण मारी १९ अनुभव-तो (मृत्यू) २० आमचॊ गांव २१ आमचे घर २२ आमची म्हैस २३ आमचा ग्रामोफोन २४ आणखी काही दिव्यौषधी २५ जे कृष्णमूर्ती व मी २६ कोर्टाची पायरी २७ दंतकथा २८ दिव्यौषधी २९ मी व योग ३० मन्या ३१ मला साप चावतो ३२ मुंज ३३ मी सौ.ला स्कूटरवरून पाडतो ३४ मी ड्रायव्हिंग लायसन्स काढतो ३५ मामा ३६ माझ्या स्कुटर्स ३७ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा १ ३८ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा २ ३९ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ३ ४० माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ४ ४१ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ५ ४२ माझा धाकटा भाऊ ४३ माझा शाळेतील पहिला दिवस ४४ माझी आई ४५ माझी पाकिटमारी ४६ माझे आजोळ ४७ माझे डोर्लॅ ४८ भाऊ ४९ लक्ष्मण ५० विठ्ठल ५१ अण्णा ५२ अप्पा ५३ मी लेखक कसा झालो ५४ राम हमारा जप करे ५५ मी दादा कसा झालो