Get it on Google Play
Download on the App Store

४१ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ५

बीए यशस्वीरित्या सेकंड क्लास ऑनर्समध्ये पास झाल्यावर माझ्या  मनात MA ला जावे असे आले . पुण्याला दोन वर्षे जाऊन शिक्षण घ्यावयाचे म्हणजे पैशांची तजवीज होणे भाग होते .माझे एक काका पुण्याला राहत होते तेव्हा त्यांच्याकडे रहाण्याची  व्यवस्था होणार होती .त्यांचा बंगला मोठा होता बाहेर आऊट हाऊसही होते त्यामध्ये त्याच्याकडे काम करणारा एक नोकर राहत असे .आऊट हाऊसला एक मोठा हॉल होता त्यामध्ये कोणीच राहत नसे. काकांना आम्ही नाना म्हणत असू. नानांनी बंगल्यातच रहा व इथेच जेव म्हणून सांगितले .मी त्यांना नम्रपणे आऊट हाऊसमध्ये राहतो व बाहेर खानावळीत जेवतो असे सांगितले .त्याला त्यांनी अनुमती दिली .अश्या प्रकारे राहाण्याचा प्रश्न सुटला . हॉलमध्ये माझा एक आतेभाऊ राहत होता .समवयस्क असल्यामुळे आमची दोघांचे चांगले जुळत असे. त्याच्या जोडीने मी हॉलमध्ये राहू लागलो.तो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनीरिंगला होता . 

चांगल्या मार्कांनी बीए ऑनर्स झाल्यावर मला जवळच एक नोकरीची संधी आली होती .पावसला नुकतीच इंग्रजी शाळा सुरू झाली होती .आमच्या गावातून मुले त्या शाळेत रोज येऊन जाऊन करीत असत .साधारण पाऊण तास जाण्यासाठी लागे.त्या शाळेवर मुख्याध्यापक म्हणून काम करणार का असे मला अप्पानी विचारले.अप्पा(स्वामी स्वरूपानंद ) ज्यांच्याकडे राहात होते ते देसाई बंधू आंबेवाले त्या शाळेच्या व्यवस्थापक मंडळाचे प्रमुख होते  .बी.टी.साठी तुम्हाला आम्ही आमच्या खर्चाने पाठवू असेही मला सांगण्यात आले( त्या वेळी बीएड नव्हते बीटी होते आणि थोड्याच ठिकाणी त्यांच्या सोयी असत ).घरी राहता येईल. भाऊना आधार होईल. येऊन जाऊन काम करता येईल.घराकडेही पाहता येईल .सूचना चांगलीच आकर्षक होती.एमए करणे पुन्हा क्लास मिळणे न मिळणे सगळेच अधांतरी होते . मी विचार करून एम.ए.ला जाण्याचे ठरविले .भाऊंनी तू इथे राहिल्यास मला आनंद होईल .तू नीट विचार करून निर्णय घे असे सांगितले मी तुझ्या कोणत्याच निर्णयाच्या आड येणार नाही असेही सांगितले .

अशा प्रकारे मी शेवटी एमएसाठी पुणे येथे दाखल झालो .एमए एन्टायर इकॉनॉमिक्स असे करावयाचे ठरविले .यामध्ये आठही पेपर इकॉनॉमिक्सचे असत व जनरलमध्ये दोन विषयांचे चार चार पेपर असत .जनरल घेतले तर दोन्ही विषयांचा प्राध्यापक म्हणून नोकरी मिळण्याचे चान्सेस जास्त असत .सोशल सायन्सेसमधील कोणतेही दोन विषय जनरलसाठी घेता येत .मी एन्टायर इकॉनॉमिक्स करण्याचे ठरविले .त्या वेळी इकॉनॉमिक्सचे केंद्रीकरण युनिव्हर्सिटी वर झालेले होते  कॉलेजमधील प्राध्यापक व गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स ॲन्ड पॉलिटिक्स यामधील प्राध्यापक शिकविण्यासाठी येत व लेक्चर्स घेत .धनंजयराव गाडगीळ नामजोशी दांडेकर अशा धुरीणांची लेक्चर्स आम्हाला ऐकावयाला मिळाली .काकाचा बंगला पर्वतीच्या पायथ्याजवळ होता व युनिव्हर्सिटी दुसऱ्या टोकाला होती .१९५६मध्ये स्कूटर्स मोटारसायकल अभावानेच होत्या .सायकल हे वाहन सर्वांजवळ असे कितीही लांब अंतरावर लोक सायकलने जात .त्या वेळी पुणे  लहान होते. नानाचा बंगला टिळक रोडच्या पलीकडे होता जिथे एकेकाळी जंगल होते .नानानी एकोणीसशे त्रेपन्न साली बंगला बांधला त्यावेळी वीज येण्याला एक वर्ष लागले. युनिव्हर्सिटी वर बसने जाणे व येणे त्रास.दायक होते .पुण्यात कुठेही फिरण्यासाठी सायकल गरजेची होती .तेंव्हा सायकल अत्यावश्यक होती .उत्तम सायकल दीडशे रुपयात मिळाली. सर्व आठही पेपर्सना एकाच वेळी  दोन वर्षांनंतर बसावयाचे होते .रोज दोन लेक्चर्स प्रत्येकी एक तास सकाळी आठ ते दहा.त्यानंतर संपूर्ण दिवस सुटी .पहिले वर्ष थोड्या उनाडक्या करण्यात थोडा अभ्यास करण्यात गेेले. नाना राहत होते त्या विजयानगर कॉलनीमध्ये एका खानावळीमध्ये जेवावयास जाऊ लागलो 

दोन वर्षांमध्ये विशेष काही घटना घडल्या नाहीत उन्हाळ्याची सुट्टी भरपूर असल्यामुळे घरी जाऊन धंद्या  साठी भाऊंना मदत होत होती .पहिला पेपर पब्लिक फायनॅन्सचा होता अगोदरच्या  रात्री मुळीच झोप लागली नाही .पेपर फारच कठीण गेला या वर्षी ड्रॉप घ्यावा की काय असे वाटू लागले .शेवटी सर्व पेपर्सना बसलो आणी चांगल्या मार्कांनी सेकंडक्लामध्ये उत्तीर्ण झालो .प्राध्यापक होण्याचा मार्ग मोकळा झाला अर्थात योग्य कॉलेजमध्ये नोकरी मिळणे आवश्यक होते.अशा प्रकारे अनेक वळणे चढउतारआणि धोके स्वीकारीत गाडी एकूण योग्य मुक्कामाला पोचली.

२६/७/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com
(लेखक अर्थशास्त्राचे प्राध्यापक  होते)

स्मृतिचित्रे

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
०१ यात्रा (डोर्ले ते शेटफळे) ०२ यात्रा (होडीतून) ०३ यात्रा (नाशिक ते गुळे व्हाया महाबळेश्वर) ०४ यात्रा (नाशिक ते गुळे व्हाया रनपार) ०५ यात्रा (नाशिक ते गुळे) ०६ यात्रा--- दुर्गम----- खडतर ०७ डोळे ०८ दहाचा आकडा ०९ कातकरी १० गणपतीपुळे पहिले दर्शन ११ चमत्कार १२ बेस्ट (बॉम्बे इलेट्रिकल सप्लाय ॲन्ड ट्रॅम कंपनी) १३ पावस १ १४ पावस २ १५ पोत एक अजब उपचार १६ ऐशी वर्षांपूर्वीचा कोकणातील दुर्गम प्रवास १७ नाशिकचे पहिले दर्शन १८ देव तारी त्याला कोण मारी १९ अनुभव-तो (मृत्यू) २० आमचॊ गांव २१ आमचे घर २२ आमची म्हैस २३ आमचा ग्रामोफोन २४ आणखी काही दिव्यौषधी २५ जे कृष्णमूर्ती व मी २६ कोर्टाची पायरी २७ दंतकथा २८ दिव्यौषधी २९ मी व योग ३० मन्या ३१ मला साप चावतो ३२ मुंज ३३ मी सौ.ला स्कूटरवरून पाडतो ३४ मी ड्रायव्हिंग लायसन्स काढतो ३५ मामा ३६ माझ्या स्कुटर्स ३७ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा १ ३८ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा २ ३९ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ३ ४० माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ४ ४१ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ५ ४२ माझा धाकटा भाऊ ४३ माझा शाळेतील पहिला दिवस ४४ माझी आई ४५ माझी पाकिटमारी ४६ माझे आजोळ ४७ माझे डोर्लॅ ४८ भाऊ ४९ लक्ष्मण ५० विठ्ठल ५१ अण्णा ५२ अप्पा ५३ मी लेखक कसा झालो ५४ राम हमारा जप करे ५५ मी दादा कसा झालो