Get it on Google Play
Download on the App Store

५१ अण्णा

माझ्या श्वशुराना अण्णा म्हणून सर्वजण म्हणत.त्यांच्या बद्दल काहीतरी लिहावे व त्यामार्फत त्यांना आदरांजली वहावी असे मला खूप दिवस वाटत होते परंतु नक्की काय लिहावे हे कळत नव्हते .एखाद्या माणसाबद्दलचे आपले मत म्हणजे  ,त्याच्याशी असलेले आपले संबंध , आपल्या जवळच्या व्यक्तींकडून त्यांच्याबद्दल ऐकलेल्या गोष्टी,  परकीयांकडून त्यांच्याबद्दल  माहीत झालेल्या गोष्टी. या सर्वांचा एकत्रित गुच्छ असतो.अण्णांबदल एकच शब्द वापरावयाचा झाला तर "देव माणूस" असे म्हणावे लागेल .

आम्ही नाशिकला रहात होतो. ते पेशाने वकील ,त्यांच्या नाशिकला कामानिमित्त वारंवार खेपा होत असत .  ते नाशिकला आले की त्यांची  आमचेकडे एक खेप निश्चित होत असे .कारणपरत्वे  किंवा सहज  ते आमचेकडे येऊन एखादा दुसरा दिवस रहात असत .त्यामुळे त्यांचा सहवास जास्त मिळाला .

आई वडिलांचे आपल्या सर्व मुलांवर सारखेच प्रेम असते . मनुष्य स्वभावाप्रमाणे ,तर-तम असतेच .जे मूल, आर्थिक, बौद्धिक ,शारिरीक किंवा इतर काही कारणाने, थोडे कमी असेल, त्याच्याकडे त्यांचे स्वाभाविक जास्त लक्ष असते .तर एखाद्याकडे त्यांचे आंतरिक कारणाने जास्त  प्रेम असते .(हल्ली एक मूल पद्धतीमुळे सर्व प्रेमाचा भार एकाच मुलावर पडतो! )

माझ्या सौ.ला लहानपणी बेबी नंतर मग बेबीताई व नंतर ताई असे म्हणत असत .अण्णा तिला केव्हा केव्हा खुशीत असले की "बेब्या" म्हणून हाक मारीत असत .हल्ली तिचे भाऊ व वहिनी ,ताई म्हणून हाक मारतात .बाकी सर्व ताई मावशी ,ताई अात्या ,ताई आजी, वगैरे म्हणतात .सौ.मातृमुखी असल्यामुळे अण्णांचे तिच्यावर जरा जास्त प्रेम असावे.सौ.चे मामाही तिच्यामध्ये आपली गेलेली थोरली बहीण पाहात असावेत .तिच्या मामांना तिच्या बद्दल जास्त आपुलीक, प्रेम वाटत असे, हे मी पाहिले आहे .आम्ही परगावी असतो आणि इथे दुसरे कोणी भावंड असते तर स्वाभाविक  त्यांच्याकडे अण्णांचे जास्त येणे जाणे राहिले असते .ताईकडे अण्णा जास्त जातात असा एक समज भावंडांमध्ये होता . आम्ही नाशिकला राहात असल्यामुळे त्यांचे येणे जाणे जास्त असे .ताई आजारी असेल त्यावेळी ,प्रभंजन , स्वाती, यांच्या जन्माच्या वेळी ,अण्णांची होणारी घालमेल मी स्वतःपहाली आहे.त्यांच्या मांडीवर नातवंडे असताना त्यांच्यासोबत फोटो काढताना त्यांचा आनंद अवर्णनीय असे.

.अण्णांचे लहानपण कष्टात व त्रासात गेले .

लहानपणी त्यांची आई वारली . वडिलांनी दुसरे लग्न केले .सावत्र आई खाष्ट  स्वभावाची असल्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला .त्यांच्या मोठ्या बहिणीने त्यांना आपल्याकडे नेले परंतु तिथेही त्यांचे हालच होत होते .कारण त्यांच्या बहिणींचेच स्वत:च्या घरात काही विशेष चालत नसे.तिच्याकडे त्यांच्या शिक्षणाचा तर पत्ताच नव्हता .ही गोष्ट त्यांच्या मामांच्या लक्षात आल्यावर ते त्यांना नाशिकला घेऊन आले .बी.ए.पर्यंतचे सर्व शिक्षण मामांनी केले .नंतर ते त्यांच्या मावसभावाकडे मुंबईला गेले .तिथे ते रात्रीच्या शाळेत शिकवित असत .दिवसा कॉलेजमध्ये जाऊन ते एल.एल.बी . झाले.व नंतर  वकिली करण्यासाठी नाशिकला आले. दुसरी कोणती नोकरी न करता शिक्षक किंवा प्राध्यापक न होता ते वकिलीमध्ये का आले तेही कळत नाही .नाशिकला वकिली सुरू करणे फार खर्चाचे होते . इथे नामांकित वकील मोठे ऑफिस थाटून अगोदरच बसले होते .येथे वकिली सुरू करणे जास्त खर्चिक तर होतेच, पण त्याच  बरोबर , नामांकित सुस्थिर वकिलांपुढे , वकिली चालणेही कठीण होते .त्यांना खेडेगावात जिथे वकील नाही व अशील जास्त मिळण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जाण्याचा सल्ला कुणीतरी दिला असावा किंवा त्यांच्या मनात तसे आले असावे .नक्की काय ते माहित नाही .निफाड व जवळचा प्रदेश हा सुपीक व जमीनदारांचा आहे या ठिकाणी जमिनीच्या कलागती मुळे जास्त अशील मिळतील अशी एक कल्पना असावी .ते ज्यावेळी निफाडला आले त्या वेळी निफाडला कोर्ट नव्हते.जवळच असलेल्या पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरील पिंपळगाव येथे कोर्ट  होते.पिंपळगावचा प्रदेशही सुपीक आहे .ज्या कारणासाठी त्यांनी नाशिक सोडले त्याच कारणासाठी कदाचित पिंपळगाव सोडले असावे .कदाचित त्यांचे मूळगाव निफाड असावे .निफाड निवडण्यामागे त्यांचा उद्देश माहित नाही .

सावत्र आईकडून त्रास झालेला असूनही त्यांनी आपल्या आई वडिलांना वृद्धपणी सावत्र भावंडासह नाशिकला आणले .  त्यांची सर्व जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली .त्यांच्या सावत्र बहिणीचे लग्न तर त्यांनी व्यवस्थित  लावून दिलेच परंतु जेव्हा ती टीबीने आजारी पडली त्यावेळी तिला घरी आणले .त्या वेळी हल्लीसारखी टीबीवर औषधे नव्हती.व्हॅक्सीनेशनचीही सोय नव्हती .संसर्ग पटकन होत असे.असे असूनही त्यांनी सावत्र बहिणीला घरी आणून तिची शुश्रूषा करून ठणठणीत बरे करून परत पाठविले . यावरून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो .इतर कसेही वागले तरी ते आपला स्वाभाविक चांगुलपणा सोडू शकत नव्हते . सुरुवातीला मी देवमाणूस हा शब्द वापरला त्यामागे हेही एक महत्त्वाचे कारण आहे. 

त्यांची पहिली पत्नी(माझ्या सौ.ची  आई ) दहा बारा वर्षातच चार मुले मागे सोडून  दुर्दैवाने मृत्यू पावली .अण्णानी दुसरे लग्न केले .दुसरी पत्नी स्वभावाने चा्गली होती .तिने मुलांमध्ये सख्खे सावत्र केले नाही .ज्यावेळी सावत्र बहिणीला टीबीने आजारी म्हणून घरी आणले ,त्यावेळी तिची सर्व सुश्रुषा केली .घरी येणाऱ्या जाणार्‍या माणसांचा राबता सख्खी व सावत्र मुले या सर्वांचे तिने न कुरकुरता आनंदाने स्नेहभावाने सेवाभावाने केले.त्या काळच्या सावत्रपणाच्या छळाच्या कथा ऐकल्यावर अक्काचा(दुसरी पत्नी ) मोठेपणा आणखीच उठून दिसतो. पहिल्या पत्नीच्या चार मुलांकडे अण्णांचे जास्त लक्ष असे ,अशी दुसऱ्या पत्नीच्या मुलांची कदाचित तक्रार  असेल. परंतु अण्णाना एकाचवेळी आई व वडिलांचे दोघांचेही प्रेम त्या मुलांना द्यायचे असे ,हे लहान वयामुळे त्यांच्या  लक्षात येत नसावे .

अण्णांना वडिलोपार्जित काहीही इस्टेट मिळाली नव्हती .त्यांनी सर्व शून्यातून  उभे केले .आई वडील भावंडे नंतर मुले असा त्यांचा मोठा बारदाना होता .लहान खेडेगावात राहून त्यांनी तो समर्थपणे सांभाळला .जेवढा जो शिकेल त्याला तेवढे शिकवायचे असा त्यांचा बाणा होता .शिक्षण देताना मुलगा आणि मुलगी असा भेद त्यांनी मुळीच केला नाही .तुलनात्मक तुटपुंजे उत्पन्न असूनही त्यांनी मुलाना व मुलीना शिक्षणासाठी नाशिकला ठेवले.एवढेच काय बी.टी.साठी मुलीला( माझ्या सौ.ला)पुण्याला ठेवले.त्या जुन्या काळाप्रमाणे त्यांना एकूण आठ मुले होती .मुलांमध्ये स्वाभाविकपणे बुद्धी रूप स्वभाव यांमध्ये भेद असणारच .त्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे, कुवतीप्रमाणे , शिक्षण दिले .

आयुष्यामध्ये ती स्थिर होतील या दृष्टीने त्यांनी सर्व यशस्वी प्रयत्न केले .

त्यांना क्रिकेटची खूप आवड होती .जर योग्य वातावरण परिस्थिती असती तर कदाचित  ते एक नामांकित क्रिकेटियर   झाले असते .त्यांची क्रिकेटची आवड बघण्यापुरती का होईना माझ्या मुलामध्ये उतरली आहे  .गहू वर्ण, सडपातळ  बांधा , देखणे पणाकडे झुकणारा उभट  चेहरा, बर्‍यापैकी उंची व चटकन छाप पडेल असे त्यांचे सौम्य व्यक्तिमत्त्व  होते .त्या वेळी टीव्ही नव्हते .प्रत्यक्ष मॅचचे दर्शन क्रिकेट ग्राऊंडवर गेल्याशिवाय  शक्य नव्हते. फक्त रेडिओवर कॉमेंट्री ऐकता येत असे . ती ते अतिशय लक्ष देऊन ऐकत असत.त्यांना होणारे समाधान व आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असे. त्या वेळी एफ.एम.बॅंड नसल्यामुळे कॉमेंट्री सुस्पष्ट ऐकता येत नसे .ते बडोद्याला असताना सयाजीराव गायकवाड यांच्या टीममध्ये खेळत होते . आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना क्रिकेट सोडावे लागले. 

सुरुवातीला कोर्ट निफाडला नव्हते .त्यावेळी त्यांना रोज पिंपळगाव ते  निफाड येरझारा कराव्या लागत .निफाडला कोर्ट आल्यावर ती त्यांची धावपळ कमी झाली .नाशिकच्या कोर्टमध्ये केस असली कि नाशिक व हायकोर्टात केस असली तर मुंबई ,अशी त्यांची नेहमी  धावपळ चालू असे.त्यांची तब्बेत चांगली असल्यामुळेच हे सर्व शक्य झाले . ते क्वचितच आजारी पडत असत. त्यांचे अशील ज्यावेळी मला भेटत त्यावेळी ते अण्णांची तारीफ करीत असत . पैशासाठी अशिलाला त्यांनी कधी नाडले नाही .अशील प्रामाणिक व  खरोखरच गरीब आहे असे वाटले, तर ते त्याची केस कमी पैश्यामध्येही लढत असत.वेळप्रसंगी त्याच्या जवळ असतील तेवढे पैसे घेऊन किंवा फुकट सुद्धा काम करीत असत.या त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा काही जणांनी घेतला नसेलच असे नाही . एक दोन आठवड्यांपूर्वीच ,त्यांचा एक जुना एकोणीसशे ऐशी सालचा अशील आमच्या घरी आला होता. सहज बोलताना त्याने ,अण्णानी त्यांची केस प्राथमिक स्तरावर मजबूत केल्यामुळे, पुढे  हायकोर्ट पर्यंत तो जिंकला व ती जमीन त्याला मिळाली असे सांगितले.निफाडच्या पक्षी अभयारण्याजवळ त्यांची जमीन आहे.त्यांनी पक्षी दर्शनासाठी अवश्य या असे आग्रहाचे निमंत्रणही दिले .यावरून त्यांचे वकिली कौशल्य दिसून तर येतेच .त्याचप्रमाणे माणसे जोडण्याचे, राखण्याचे ,प्रेम बंध निर्माण करण्याचे, कौशल्य दिसून येते .अर्थात वकिली म्हटल्यावर काही मागे पुढे खरे खोटे उलटसुलट होणारच त्याला इलाज नाही .तो त्या व्यवसायाचा एक न टाळता  येणारा भाग म्हणावे लागेल .निफाडला सर्वत्र व नाशिकला वकील मंडळींमध्ये त्या काळात अण्णांचे नाव अण्णासाहेब म्हणून  आदराने घेतले जात असे .त्यांचा स्वभाव अतिशय शांत व मृदू होता . ते कधीही रागावलेले किंवा उद्विग्न झालेले दिसले नाहीत.ते कदाचित आपल्या भावना आतल्या आत दाबून टाकीत असावेत .नातवंडांमध्ये ते अतिशय रमून जात असत.मुलांमध्ये ते मूल होत असत.त्यांचे सर्व ताण तणाव ते विसरून जात असत.नातवंडे मांडीवर असताना ,त्यांच्या सोबत फोटो काढताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणे हाच एक आनंद असे. मला ज्या वेळेला नात झाली .ती त्यांची पहिलीच पणती होय .त्यांना अतिशय आनंद व समाधान  झाले .त्यांची प्रकृती बरी नसूनही ते धरून धरून दोन मजले चढून आमच्याकडे आले. मिथिलेला मांडीवर घेऊन त्यांचा फोटो आहे .गॅलरीत बसून मिथिलीचे बारसे त्यांनी डोळे भरून पाहिले .

त्यांना शिक्षण क्षेत्राचे का कोण जाणे पण प्रचंड आकर्षण व आवड होती .मोजके काम सुट्ट्या व आराम यांचे त्यांना बहुधा आकर्षण असावे .मिसेसला बी .कॉम. कडे जाण्याची इच्छा होती.पण त्यांनी बीए बीटी शिक्षिका हो ,चांगली सुखाची  नोकरी ,कमी पैसे मिळाले तरी चालेल, असे सुचविले.मुलींची लग्ने करताना प्राध्यापक  बघून दिले कारण त्यामुळे ते जास्त घरी असतील , मुलींना संसार सुख जास्त मिळेल,त्यांच्यावर जास्त कामाचा भार पडणार नाही , असा विचार  असावा !सकाळी अशिलांशी  चर्चा व  दुपारी चार पांचपर्यंत कोर्ट ,परगावच्या चकरा, त्यामुळे ते घरी जास्त उपलब्ध होत नसत . स्वतःच्या अनुभवावरून व इतरांच्या उदाहरणावरून, शिक्षण क्षेत्रा बाहेरील व्यवसायातील माणसे ,जास्त व्यस्त असतात असे त्यांचे मत असावे . आपल्या मुलींना जास्त घरगुती आयुष्य जगता यावे ,संसाराचा भार आपल्या मुलींवर  कमी पडावा , असाही विचार त्या मागे असावा .पैसे कमी मिळाले तरी चालेल परंतु प्रापंचिक सुख महत्त्वाचे असा त्यांचा विचार असावा .वयाच्या पंचाहत्तरी नंतर त्यांनी आपला व्यवसाय हळूहळू कमी केला .दुसऱ्या एका तरुण मित्र  वकिलांकडे आपली कामे हळू हळू  सोपविली .वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी ते पूर्णपणे निवृत्त झाले .

निफाडला त्यांचे संपूर्ण आयुष्य गेलेले असल्यामुळे , तेथे मित्रमंडळी असल्यामुळे, निफाडची हवा चांगली व सवयीची असल्यामुळे ,मोठ्या घरात राहण्याची सवय असल्यामुळे ,ते  निफाडला रहातील असा माझा अंदाज होता .परंतू त्यांनी डोंबविलीला त्यांच्या दुसऱ्या मुलाकडे(बापू)जाऊन राहण्याचे ठरविले. असा निर्णय मला जरा बुचकळ्यात पाडणारा होता. त्याच्या (बापूच्या )ब्लॉकच्या समोरच त्यांच्या दुसऱ्या मुलीचा(माई) ब्लॉक होता .मुलगा मुलगी व नातवंडे यांच्याबरोबर आनंदाने उरलेले आयुष्य घालवावे असा त्यांचा विचार असावा.

मुला मुलींना उत्तमपैकी शिक्षण, मुलींचे सुस्थळी विवाह ,आर्थिक परिस्थिती कमी असलेल्या मुलांना छोटेसे का होईना परंतु निफाडला ब्लॉक घेऊन देणे ,यामध्ये त्यांचे प्रेम व कौशल्य दिसून येते . त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात अापुलीक प्रेम व आदर आहे.सर्व प्रापंचिक जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडून ,कृतार्थ आयुष्य घालवून त्यांनी आपल्या वयाच्या श्यायशीव्या वर्षीआपला देह ठेवला .आपल्या नातवंडानी आपल्या शेवटच्या यात्रेमध्ये खांदा द्यावा ही त्यांची इच्छाही पूर्ण झाली .

२४/९/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

स्मृतिचित्रे

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
०१ यात्रा (डोर्ले ते शेटफळे) ०२ यात्रा (होडीतून) ०३ यात्रा (नाशिक ते गुळे व्हाया महाबळेश्वर) ०४ यात्रा (नाशिक ते गुळे व्हाया रनपार) ०५ यात्रा (नाशिक ते गुळे) ०६ यात्रा--- दुर्गम----- खडतर ०७ डोळे ०८ दहाचा आकडा ०९ कातकरी १० गणपतीपुळे पहिले दर्शन ११ चमत्कार १२ बेस्ट (बॉम्बे इलेट्रिकल सप्लाय ॲन्ड ट्रॅम कंपनी) १३ पावस १ १४ पावस २ १५ पोत एक अजब उपचार १६ ऐशी वर्षांपूर्वीचा कोकणातील दुर्गम प्रवास १७ नाशिकचे पहिले दर्शन १८ देव तारी त्याला कोण मारी १९ अनुभव-तो (मृत्यू) २० आमचॊ गांव २१ आमचे घर २२ आमची म्हैस २३ आमचा ग्रामोफोन २४ आणखी काही दिव्यौषधी २५ जे कृष्णमूर्ती व मी २६ कोर्टाची पायरी २७ दंतकथा २८ दिव्यौषधी २९ मी व योग ३० मन्या ३१ मला साप चावतो ३२ मुंज ३३ मी सौ.ला स्कूटरवरून पाडतो ३४ मी ड्रायव्हिंग लायसन्स काढतो ३५ मामा ३६ माझ्या स्कुटर्स ३७ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा १ ३८ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा २ ३९ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ३ ४० माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ४ ४१ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ५ ४२ माझा धाकटा भाऊ ४३ माझा शाळेतील पहिला दिवस ४४ माझी आई ४५ माझी पाकिटमारी ४६ माझे आजोळ ४७ माझे डोर्लॅ ४८ भाऊ ४९ लक्ष्मण ५० विठ्ठल ५१ अण्णा ५२ अप्पा ५३ मी लेखक कसा झालो ५४ राम हमारा जप करे ५५ मी दादा कसा झालो