Get it on Google Play
Download on the App Store

२२ आमची म्हैस

म्हैस म्हटल्यानंतर पुलंची म्हैस ही कथा आठवणे स्वाभाविक आहे. परंतु या म्हशीचा त्या म्हशीशी काहीही संबंध नाही .डोर्ले येथे आल्यावर स्वाभाविकपणे दूध कुठून घ्यायचे याचा प्रश्न पडला .त्या काळात म्हणजे ७५/८०वर्षापूर्वी खेडेगावात दूध उपलब्धतेचा व्यापारी तत्वावर  प्रश्नच नव्हता .गावात असलेले मास्तर तलाठी यासारख्या नोकरांसाठी दुधाचा प्रश्न निर्माण होई. त्याना कुठुनतरी दूध विकत घ्यावे लागे. प्रत्येक घर स्वयं पूर्ण असे. एक दोन म्हशी व कदाचित एक दोन गाई गोठ्यात असत .अर्थात शेतीसाठी बैल गोठ्यात असतच.

म्हैस काय किंवा गाय काय त्यांच्या वासरापुरते व थोडेबहुत  घरापुरते दूध जेमतेम मिळत असे.घरातील गरज भागून विक्री करण्यासाठी विशेष दूध उपलब्ध नसे.त्यामुळे म्हैस कोणाकडे आहे व कुणाकडे दूध उपलब्ध आहे त्याची चौकशी करावी लागे.तिथून दूध आणावे लागे.आम्ही राहात होतो त्या शेजारी एकच सारस्वतांचे घर होते.मुख्य गाव थोडा लांब होता. येऊन जाऊन साधारण पंधरा ते वीस मिनिटे लागत . सकाळची शाळा असल्यामुळे भाऊना जाऊन दूध आणणे कठीण होते  .दूध आणण्यासाठी गडी मिळेलच अशी खात्री नव्हती . आम्ही राहात होतो त्या शेजारी शांताक्का नावाच्या बाई व त्यांचे कुटुंबीय रहात असत .एक वर्षाआड त्यांच्याकडे ७/८ महिने दूध मिळे.एकूण दूध आणण्यासाठी होणारा त्रास पाहून भाऊंनी म्हैस विकत घ्यावी असे ठरविले .

ओळखीतून चौकशी करून नुकतीच व्यालेली एक चांगली म्हैस  भाऊंनी मिळवली .संन्याशाच्या शेंडीपासून जशी तयारी असते तशी म्हशीला गोठा बांधण्यापासून तयारी करावी लागली. गोठा चारा अशी सगळी तयारी झाली. भाऊंचे काम व्यवस्थित असल्यामुळे एक  पेंडीचे पोते आणून तिला  खुराक चालू झाला. म्हशीला आंबोण घालणे धुणे शेणगोठा करणे दूध काढणे इथपासून सगळी कामे आईवर पडली .घरातील कामे त्याशिवाय म्हशीची कामे असा व्याप आईच्या मागे लागला .पेंड भरपूर खाऊ घातल्यामुळे म्हैस खूप दूध देत असे .दूध विकावयाचे नाही व कोणी विकत घेतही नसे .म्हशीला पेंड कमी घालावयाची हे भाऊंना पटत नव्हते. त्यामुळे एवढ्या दुधाचे काय करायचे असाही प्रश्न निर्माण झाला .विरजण लावून चक्का करून श्रीखंड कर, दूध आटवून पेढे कर, रोज आम्हा मुलांना  दूध पिण्याला दे,ताक करून ते गडी माणसाना व शेजारी पाजारी वाट . तूप करून त्याचा काहीतरी विनियोग कर.असा व्याप आई मागे लागला .गोठा. चारा गवत पेंड इत्यादी खर्च लक्षात घेता म्हशीमुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली .आठ दहा महिने दुधाची चंगळ झाली. नंतर म्हैस दूध कमी कमी देऊ लागली .ही म्हैस विकणे किंवा राखायला धनगराकडे पाठवणे यांतील पर्याय निवडण्याची वेळ आली .त्या काळी भाकड म्हणजे दूध न देणारी म्हैस धनगराकडे पाठवून ती पुन्हा व्याल्यावर परत आणण्याची पद्धत होती .धनगरवाड्यावर गवत माळरान खूप असल्यामुळे जवळजवळ फुकट म्हशीची देखभाल होई.धनगराला उत्पन्न मिळे.नवीन म्हैस घेणे ,ही धनगराकडे पाठवणै इत्यादी सर्व व्यवहार लक्षात घेता ,जेनू काम तेनू थाय बिजा करे सो गोता खाय, या म्हणीप्रमाणे म्हैस गोठा  सर्व गुंडाळण्याचे ठरले .म्हैस विकून टाकली .गोठा मोडून टाकला .दहा महिन्यात दूध तूप लोणी पेढे श्रीखंड इ .खाऊन आम्ही सर्वांनी बाळसे धरले .

आठ दहा महिने रोज सकाळी शाळेत जातांची वेळ व आईची दूध काढण्याची वेळ एक असे, त्यावेळी गोठ्यात जाऊन धारोष्ण दुधाचा ग्लास पिउन आम्ही शाळेत जात होतो. त्याची चव व ऊब अजूनही जिभेवर आहे . 

त्यानंतर अजूनही धारोष्ण दूध मी प्यालेलो नाही . त्यानंतर भाऊंनी कधीही कुठेही म्हैस  बाळगण्याचा उद्योग केला नाही !!! नेहमीच रतीबाचे दूध घेतले .

१९/५/२०१८ © प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com 

स्मृतिचित्रे

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
०१ यात्रा (डोर्ले ते शेटफळे) ०२ यात्रा (होडीतून) ०३ यात्रा (नाशिक ते गुळे व्हाया महाबळेश्वर) ०४ यात्रा (नाशिक ते गुळे व्हाया रनपार) ०५ यात्रा (नाशिक ते गुळे) ०६ यात्रा--- दुर्गम----- खडतर ०७ डोळे ०८ दहाचा आकडा ०९ कातकरी १० गणपतीपुळे पहिले दर्शन ११ चमत्कार १२ बेस्ट (बॉम्बे इलेट्रिकल सप्लाय ॲन्ड ट्रॅम कंपनी) १३ पावस १ १४ पावस २ १५ पोत एक अजब उपचार १६ ऐशी वर्षांपूर्वीचा कोकणातील दुर्गम प्रवास १७ नाशिकचे पहिले दर्शन १८ देव तारी त्याला कोण मारी १९ अनुभव-तो (मृत्यू) २० आमचॊ गांव २१ आमचे घर २२ आमची म्हैस २३ आमचा ग्रामोफोन २४ आणखी काही दिव्यौषधी २५ जे कृष्णमूर्ती व मी २६ कोर्टाची पायरी २७ दंतकथा २८ दिव्यौषधी २९ मी व योग ३० मन्या ३१ मला साप चावतो ३२ मुंज ३३ मी सौ.ला स्कूटरवरून पाडतो ३४ मी ड्रायव्हिंग लायसन्स काढतो ३५ मामा ३६ माझ्या स्कुटर्स ३७ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा १ ३८ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा २ ३९ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ३ ४० माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ४ ४१ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ५ ४२ माझा धाकटा भाऊ ४३ माझा शाळेतील पहिला दिवस ४४ माझी आई ४५ माझी पाकिटमारी ४६ माझे आजोळ ४७ माझे डोर्लॅ ४८ भाऊ ४९ लक्ष्मण ५० विठ्ठल ५१ अण्णा ५२ अप्पा ५३ मी लेखक कसा झालो ५४ राम हमारा जप करे ५५ मी दादा कसा झालो