Get it on Google Play
Download on the App Store

१८ देव तारी त्याला कोण मारी

पंच्याऐशी वर्षांच्या आयुष्यात काही ना काही अपघात हे होणारच .त्यातील काही आठवणीत राहण्याजोगे असणेहि स्वाभाविक आहे .सायकल टॅक्सी होडी बोट स्टीमर बैलगाडी मोटार बस रेल्वे विमान इत्यादी वाहनातून हजारो किलोमीटर प्रवास झाला परंतु लक्षात राहण्यासारखा कोणताही अपघात सुदैवाने झाला नाही.

१९६७मध्ये मी स्कूटर घेतली आणि जवळजवळ २०११पर्यंत ती चालवित होतो .माझे ड्रायव्हिंग फास्ट होते असे सर्वजण म्हणतात .मला मात्र ते तसे कधीच वाटले नाही .माझे ड्रायव्हिंग सेफ होते अशी माझी प्रामाणिक कल्पना आहे . नोकरीच्या निमित्ताने रोज नाशिकरोडला अपडाऊन करावे लागे.त्याशिवाय गावातहि फिरावे लागे.पूर्वी नाशिक नाशिकरोड या वेगळ्या मुनिसिपालिटी होत्या  . द्वारका हॉटेलसमोर अॅक्ट्राय नाका होता  .रस्ता अरुंद असला तरी नाशिकरोड पर्यंत वस्ती नव्हती.वाहनेही विशेष नव्हती . स्वाभाविक पुढे फास्ट  स्कूटर चालवणे सहज शक्य असे .आणि मी चालवीतही असे .त्या वेळच्या स्कूटर्स पिकअप पटकन घेत नसत व त्याचप्रमाणे त्या फार फास्टही जात नसत.पन्नास किलोमीटरला गाडी व्हायब्रेट होऊ लागे.  या संदर्भात एक गमतीदार गोष्ट आठवली. माझ्याबरोबर पहिल्यांदाच एक माझे सहअध्यापक मागे बसून नाशिकरोडला येत होते .नाशिक रोडला कॉलेजजवळ उतरताना ते म्हणाले की "पटवर्धन तुम्ही किती फास्ट गाडी चालवता मी डोळे मिटून घेतले होते " त्यावर मी त्यांना म्हटले हो मीसुद्धा डोळे मिटून घेतले होते ! काही अॅक्सिडेंट नाशिक नाशिक रोड रस्त्यावर झाले तर काही गावात झाले.ज्यामधून मी सहीसलामत वाचलो ,त्यामुळे जे माझ्या लक्षात राहिले अशांचाच उल्लेख मी करणार आहे.                                         

१)आम्ही कोकणातून नेहमीप्रमाणे दोन अडीच  महिने राहून परत आलो होतो .भाजी आणण्यासाठी मी बाहेर स्कूटर घेऊन निघालो.पूर्वीच्या स्कूटर्सना इंडिकेटर्स नसत . हाताने सिग्नलिंग करावे लागे.मी डाव्या किंवा उजव्या बाजूला वळत आहे .मी हळू होत आहे.मी डाव्या बाजूला जाऊन थांबत आहे इ.सिग्नलिंग करताना उजवा हात बाहेर कडून  सिग्नलिंग करावे लागे.सिव्हिल हॉस्पिटल पूर्वी गावात होते ते गावाबाहेर टिळकवाडी एरियात आल्यानंतरची गोष्ट आहे.मी टिळकवाडीतून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला वळून सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर  आलो. त्या वेळी रस्ता सिंगल होता रोड डिव्हायडर नव्हता.बस थांबा सिव्हिल हॉस्पिटलच्या  समोर होता .तिथे एक बस उभी होती .येणारा जाणारा ट्रॅफिक लक्षात घेतला तर पुढे जाण्याला  विशेष वाव नव्हता  .मी स्पीड हळू करीत असल्याचा सिग्नल दिला .माझ्या स्कूटरला कॅरिअर होता .माझ्या पाठीमागून एका स्कूटरवर तीन मुले येत होती . त्यांना स्पीड  नियंत्रित करता आली नाही .  त्यांनी माझ्या कॅरिअरला मागून तिरका कट मारला .स्कूटर एका हातामध्ये होती दुसरा हात सिग्नलिंगमध्ये  गुंतलेला होता.मी क्षणात काही कल्पना येण्याच्या अगोदर धाडदिशी उजव्या बाजूला आडवा झालो .मागून पुढून येणाऱ्या गाड्यांनी करकचून ब्रेक मारले व त्यांचा कर्णकर्कश  आवाज सर्वत्र भरून राहिला.स्कूटरवरील ते तिघे  न थांबता झपाट्याने पुढे निघून गेले. माझ्या मागील मोटारीने ब्रेक मारल्यामुळे त्याच्या मागील एक दोन मोटारी एकमेकांवर आदळल्या. त्यांच्या हेडलाईटच्या  काचा फुटल्या व मडगार्डनाही पोचे आले.मी स्कूटर खाली तसाच अडकलेला होतो मला बाहेर येता येईना .दोघांनी स्कूटर उभी केली, मला उठवले , मला चालताही येईना , कसाबसा मी कडेला गेलो. स्टँडवर गाडी कोणीतरी उभी केली. मी त्यावर बसून घेतले.उजवा पाय स्कूटर खाली दबल्यामुळे त्यातून असह्य वेदना येत होत्या .रक्तही आले होते .कोणीतरी समोर जावून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ड्रेसिंग करून घ्यावे असे सुचविले .तेवढ्यात एका मोटरचा ड्रायव्हर एक कागद घेऊन माझ्या पुढ्यात आला व  म्हणाला की काय झाले ते लिहून सही करून द्या नाहीतर माझा मालक मला गाडीचे नुकसान केले म्हणून रागवेल व दंड वसुल करील .मला हसावे की रडावे तेच कळेना त्याचे म्हणणे बरोबर होते . परंतु मला प्रचंड वेदना होत होत्या . मी त्याला मजकूर लिहायला सांगितला गाडी नंबर फोन नंबर टाकून सही करून कागद त्याला दिला .त्याच्या मोटारीचे हेडलॅम्प्स फुटले होते . त्याला त्याच्या नोकरीची काळजी वाटणे स्वाभाविक होते .मी जरा सावध होताच गाडीवरुन उतरलो. कुणीतरी मला किक मारून गाडी चालू करून दिली . मी घर अगदी नजीक असल्यामुळे घरी आलो .घरी आल्यावर मला गाडी स्टॅन्डवर उभी करता येईना .मी मुलाला हाक मारली सुदैवाने तो घरी होता. तो खाली आला गाडी स्टॅन्डवर घेतली . त्या वेळी साइड स्टँड नव्हते .प्रभंजनचा आधार घेत मी कसाबसा दुसऱया मजल्यावर गेलो .पाय भप्प सुजला. पाचसात पावले चालणेही मुश्किल झाले . त्यानंतर दोन तीन आठवडे मी जिना उतरू शकलो नाही. घरातच होतो.माझे मेहुणे डॉक्टर होते ते घरी येऊन रोज ड्रेसिंग करीत .सुदैवाने फ्रॅक्चर नव्हते .अॅक्सिडेंटच्या त्या क्षणात काहीही होऊ शकले असते. मागच्या  किंवा पुढच्या मोटारीखाली मी सापडलो असतो माझे डोके जर रस्त्यावर आदळले असते   तर काहीही होऊ शकले असते .मी हेल्मेट घातलेले नव्हते .

गावात फिरताना मी हेल्मेटचा वापर करीत नसे. त्या काळी हेल्मेटची सक्ती नव्हती.मी सुरक्षितता म्हणून केवळ नाशिकरोड किंवा बाहेर गावी जाताना हेल्मेटचा वापर करीत असे .खांदे रुंद व मान आखूड असल्यामुळे मी बचावलो.  अशा प्रसंगी नेहमी खांद्याला इजा होत असे व डोके बचावत असे.अक्षरश:डोक्यावरचे खांद्यांवर निभावत असे( जिवावरचे शेपटावर निभावत असे) .उजवा खांदा दुखावला डॉक्टरांना दाखवल्यावर त्यांनी नर्व्ह चेपली गेली असे निदान केले.डॉक्टरनी यावर काही उपाय नाही असे सांगितले . काही व्यायाम सांगितले .काही आयुर्वेदिक उपाय घरगुती औषधे ही केली .त्या वेळी पूर्ण बरे वाटले परंतु वयाच्या पंचाहत्तर वर्षांपासून खांद्याला खूप त्रास सुरू झाला आहे .

२)मिसेसला शाळेत सोडण्यासाठी गेलो होतो .ती खाली उतरली आणि मी जामिनीवर टेकवलेले पाय वरती  उचलले एवढ्यात पाठीमागून सायकल वर एक दूधवाला दुधाच्या बरण्या  सायकलवर लटकवलेल्या स्थितीत जोरात आला. तिथे बऱ्यापैकी उतार असल्यामुळे त्याने मागून येऊन जोरात ठोस दिली .(तोही आडवा झाला रस्ताभर दूध सांडले).मी जागच्या जागी डाव्या बाजूला आडवा झालो . माझ्या डाव्या खांद्याला  जोरात मार पडला .पायाला भरपूर  खरंचटले .डाव्या खांद्याची नर्व्ह चेपली गेली . गळ्यात हात टाकून पंधरा दिवस फिरत होतो .  त्या वेळी बरा झालो परंतु आता मात्र तो खांदा त्रास देतो .अश्या प्रकारे डावा उजवा दोनही खांदे चुरले गेले व आता ते दुखतात . या वेळीही रुंद खांदे व आखूड मान यामुळे डोके सहीसलामत बचावले .

३)नाशिक रोडला जाताना सेंट  झेव्हियर स्कूलच्या पुढ्यात ऑईल सांडले होते .तिथे काही मुले उभी राहून ते दाखवण्याचा प्रयत्न करीत  होती . रस्त्यांवरील लक्ष्य स्वाभाविक पणे त्यांच्याकडे गेले . स्कूटर ऑइलवरून घसरली आणि आम्ही उजव्या बाजूला घसरून आडवे होऊन तसेच स्केटिंग करीत जवळजवळ सात आठ मीटर गेलो .पॅंट शर्ट  फाटला उजव्या बाजूला खरचटले जखमा झाल्या ऑईल  लागले .सुदैवाने मागून किंवा पुढून कोणी येत नव्हते त्यामुळे आमच्या वर कुणी येऊन आदळले नाही .आखूड मान व रुंद  खांदे यामुळे डोके सहीसलामत पुन: बचावले .४)म्युनिसिपालिटीला दिवसा वाहनांची अडचण होऊ नये म्हणून रात्री स्पीडब्रेकर  टाकण्याची खोड आहे .रोज कॉलेजला येत जात असल्यामुळे रस्ता टायरखालचा (पायाखालचा )माहितीचा होता .एका रात्री सेंट झेव्हियर्स स्कूलसमोर स्पीडब्रेकर टाकण्यात आले.त्यावर पांढरे पट्टे काढलेले नव्हते .सकाळी कॉलेजला जाताना जवळ आल्यावर ते एकदम दिसले .ब्रेक लावणे शक्य नव्हते.आम्ही पडलो असतो .त्यामुळे गाडी त्यावरून जोरात सर्कशी प्रमाणे उडाली .आम्ही पुन्हा जमिनीवर व्यवस्थित आलो.सुदैवाने कोणालाही काहीही झाले नाही .आम्ही थांबलो सुद्धा नाही तसेच कॉलेजला गेलो .

५)हल्ली जिथे आयनॉक्स थिएटर आहे .ज्याचे नाव पूर्वी फेम होते . त्याच्या अगोदर विजय ममता . त्याठिकाणी पूर्वी एक मोठी विहीर होती .हल्ली  आहे की नाही ते माहीत नाही .त्यावर पंप सतत चालत असे . शेतीसाठी पाणी पाटातून नेले जाई. हल्ली बैलगाड्या दिसत नाहीत परंतु त्या वेळी त्या रस्त्याने बैलगाड्या जात असत .नाशिक रोडच्या दिशेने जाताना गाडीवाले गाडी उभी करीत बैलांना रस्ता क्रॉस करून नेत पाणी पाजत व पुन्हा परत येत . एकेदिवशी मी नाशिकच्या दिशेने येताना डाव्या बाजूने दोन बैलांचा कासरा हातात धरून गाडीवाला नाशिकरोडच्या दिशेने चालत होता . तो तसाच काही वेळ चालत राहील अशी माझी अटकळ होती .नेहमी अापण ड्रायव्हिंग करताना समोरची माणसे व वहाने कशाप्रकारे हलतील यांचा अंदाज घेऊनच  ड्रायव्हिंग करीत असतो .अकस्मात गाडीवाला राइट  टर्न करुन रस्ता क्रॉस करू लागला .त्याच्या बरोबर बैल होतेच .तो अकस्मात आल्यामुळे ब्रेक लावी लावी पर्यंत गाडी बैलांच्या पोटाखाली गेली .हेड लॅम्प फुटला माझ्या  मुठी बैलांच्या पोटाखाली घासल्या गेल्यामुळे जखमा झाल्या .आम्हाला प्रचंड धक्का बसला माझे हात हॅंडलवर असल्यामुळे मी जागच्या जागी सावरलो .

.आमच्या मागची स्वारी मात्र उड्डाण करून जमिनीवर पडली .बैलाचा ब्रेक! लागल्यामुळे गाडी थांबली .मी जमिनीवर दोन्ही पाय टेकले .भूस्थिर झालो.माणसापुढे जनावरांची ताकद किती असते हे लक्षात आले .बैलाला काहीही झाले नाही.सुदैवाने बैल मारकुटा नव्हता . त्याने आम्हाला काहीही केले नाही.त्याने आमच्याकडे लक्षसुद्धा दिले नाही .या वेळीही काहीही होण्याच्या बऱ्याच शक्यता होत्या परंतू आम्ही सहिसलामत बचावलो.

या चार पाच घटनांकडे आता वळून पाहिले असता हसू येते .दोन्ही खांदे दुखतात हात वरती करता येत नाही त्यावेळी या सर्वांची आठवण येते .

१८/८/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

स्मृतिचित्रे

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
०१ यात्रा (डोर्ले ते शेटफळे) ०२ यात्रा (होडीतून) ०३ यात्रा (नाशिक ते गुळे व्हाया महाबळेश्वर) ०४ यात्रा (नाशिक ते गुळे व्हाया रनपार) ०५ यात्रा (नाशिक ते गुळे) ०६ यात्रा--- दुर्गम----- खडतर ०७ डोळे ०८ दहाचा आकडा ०९ कातकरी १० गणपतीपुळे पहिले दर्शन ११ चमत्कार १२ बेस्ट (बॉम्बे इलेट्रिकल सप्लाय ॲन्ड ट्रॅम कंपनी) १३ पावस १ १४ पावस २ १५ पोत एक अजब उपचार १६ ऐशी वर्षांपूर्वीचा कोकणातील दुर्गम प्रवास १७ नाशिकचे पहिले दर्शन १८ देव तारी त्याला कोण मारी १९ अनुभव-तो (मृत्यू) २० आमचॊ गांव २१ आमचे घर २२ आमची म्हैस २३ आमचा ग्रामोफोन २४ आणखी काही दिव्यौषधी २५ जे कृष्णमूर्ती व मी २६ कोर्टाची पायरी २७ दंतकथा २८ दिव्यौषधी २९ मी व योग ३० मन्या ३१ मला साप चावतो ३२ मुंज ३३ मी सौ.ला स्कूटरवरून पाडतो ३४ मी ड्रायव्हिंग लायसन्स काढतो ३५ मामा ३६ माझ्या स्कुटर्स ३७ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा १ ३८ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा २ ३९ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ३ ४० माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ४ ४१ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ५ ४२ माझा धाकटा भाऊ ४३ माझा शाळेतील पहिला दिवस ४४ माझी आई ४५ माझी पाकिटमारी ४६ माझे आजोळ ४७ माझे डोर्लॅ ४८ भाऊ ४९ लक्ष्मण ५० विठ्ठल ५१ अण्णा ५२ अप्पा ५३ मी लेखक कसा झालो ५४ राम हमारा जप करे ५५ मी दादा कसा झालो