Get it on Google Play
Download on the App Store

अगम्य वाटचाल

रखरखीत उन्हाळ्यात दुर्मिळ दिवसांपैकी हा एक दिवस होता. जेव्हा सूर्याचा चटका तितका तीव्र नव्हता. निळे आकाश आणि पहाटेची वाऱ्याची झुळूक मन ताजेतवाने करत होती. पण तो हेलिकॉप्टरचा आवाज त्या शांततेच्या थंडगार दुध-मलईच्या मस्तानीमध्ये मिठाचा खडा घालायला पुरेसा होता.

या नयनरम्य दृश्यात एक माणूस हेलिकॉप्टरमध्ये बेशुद्ध आणि निपचित पडलेला होता. चार बंदूकधारी त्याच्याकडे डोळे लावून बसले होते, जणू काही ते त्याने डोळे उघडण्याची अनंतकाळ वाट पाहत होते. त्या व्यक्तीचा चेहरा पांढरा पडला होता आणि त्याच्या दाढी आणि मिशा अस्ताव्यस्त वाढल्या होत्या. त्याचे लांबसडक, काळेभोर विखुरलेले केस त्याला अधिक गूढ बनवत होते.  तो चाळीशीचा असूनही देखणा दिसत होता. त्याचा चेहरा रेखीव होता. त्वचा आकर्षक आणि चमकदार होती, त्याच्याभोवती सौंदर्याची आभा निर्माण झाली होती. हेलिकॉप्टरच्या आवाजाने त्याचे शरीर थरथरत होते आणि जेव्हा तो हलत होता तेव्हा त्याच्या शरीरातून राखेचे कण हवेत उडत होते. तो बेशुद्ध असून देखील आजूबाजूच्या लोकांना ‘तो कोण आहे?’ हा  प्रश्न अस्वस्थ करत होता. ज्याने ज्याने त्याला पाहिले असेल  तो मोहित झाला असेल आणि त्याचे कुतूहल चाळवले असेल.

पायलटने घोषणा केली,

“पुढील ३ मिनिटात आपण बित्रा आयलंड बेटावर लैंडिंग करणार आहोत।”

बित्रा आयलंड बेट हे लक्षद्वीप द्वीपसमूहातील अत्यंत सुंदर द्वीप आहे. हे बेट कोचीनच्या पश्चिमेला साधारण ४८०  किमी इतक्या अंतरावर आहे. हे ठिकाण माणसाला दुर्मिळ आणि महत्त्वाच्या प्रजातींचा वारसा तसेच निसर्गाची उत्कृष्ठ देणगी आहे. अत्यंत निसर्गरम्य असे हे बेट मनाला आल्हाद देते आणि निसर्गप्रेमींना आकर्षित करते.

बेटाच्या नैसर्गिक सौंदर्यात भर टाकत होती एक घुमटाच्या आकाराची प्रचंड हायटेक इमारत. निव्वळ संशोधनाच्या उद्देशाने एका निर्जन भूमीवर उभारलेल्या या भव्य साम्राज्याने अगदी श्रीमंत माणसांनाही प्रभावित केले होते.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या प्रयोगशाळेमध्ये किनारपट्टी आणि सागरी सीमांवर पाळत ठेवणारी अत्याधुनिक यंत्रणा होती. हि इमारत फक्त काचेचा वापर करून बांधलेली होती. या इमारतीमध्ये सर्फेस टेक्नोलॉजी तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावीपणे वापर करण्यात आला होता. प्रत्येक स्क्रीनला स्पर्श करताच ती बोलू लागते, जणू काही ती एखाद्या अतीप्रगत बायोडिजिटल प्रजातीचा भाग आहे. आजूबाजूच्या तापमानात आणि वायुमंडलातील हवेच्या दाबात आवश्यक  बदल घडवून आणल्याने जीवन अकल्पनीयपणे सुकर झाले होते. सौंदर्य किंवा एस्थेटिक या दृष्टीने ती इमारत जितकी तेजस्वी होती, तितकीच सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील अतिशय प्रभावी होती. धनुष्याकृती छताच्या प्रत्येक कोपऱ्यात मोशन सेन्सर कॅमेरे बसवले होते. या विशाल घुमटाच्या आत कोणीही एकटे राहू शकत नव्हते. कुठेही गेलो तरी एक डिजिटल कॅमेऱ्याची नजर पाळतीवर असायची.

व्हीआरएस घेतलेले भारतीय लष्कराचे माजी ब्रिगेडियर रणधीर आपला कक्ष सोडून थेट प्रवेशद्वाराजवळ आले. बाहेर येताच त्यांना चार सशस्त्र सुरक्षा रक्षकांनी वेढलेला कैदी दिसला. हे चौघे कैद्याचा हातकडी घातलेला आणि डोळ्यावर पट्टी बांधलेला बेशुद्ध देह व्हरांड्यातून ओढत आणत होते. त्या कैद्याचे राखेने माखलेले अनवाणी पाय जमिनीवर रेषा उमटवत होते.

ब्रिगेडियर रणधीर यांना समजले कि हीच ती व्यक्ती.

कैद्याच्या शरीरावर कमीत कमी कपडे घातले होते; फक्त एका लहान आणि पातळ लंगोटीने त्याचा खालचा भाग झाकलेला होता. त्याचे संपूर्ण शरीर राखेने माखलेले होते आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ लटकत होती. त्याच्या जटा  गुंडाळलेल्या होत्या. त्यांचा एक आंबाडा बांधला होता ज्यात एक गंजलेले लोखंडी त्रिशूळ खोचलेले होते. ब्रिगेडियर रणधीर त्या प्रयोगशाळेचे सुरक्षा प्रमुख या नात्याने २१ बंदूकधारी रक्षकांच्या गटासह समोर आले होते. ते एका खास कामासाठी तिथे आले होते . त्यांच्या कॅडरच्या लोकांमध्ये सर्वोत्कृष्ट उमेदवार असल्याने त्यांना जगभरातील विविध संस्था विविध गुप्त आणि सामाजिक मोहिमांसाठी बोलावत असत. मात्र त्यांनी स्वीकारलेली ही मोहीम त्या सर्वांपेक्षा वेगळी होती.

ब्रिगेडियर रणधीर यांची उंची साधारण ६ फूट २ इंच होती. त्यांच्या आयुष्यातील तब्बल ४० वर्षे ते अत्यंत रुबाबदार चांगले मान सन्मानाचे जीवन जगले, त्या आयुष्याचा बराचसा भाग त्यांनी सैन्यासाठी समर्पित केला होता. त्यांचा चेहरा एखाद्या सामान्य माणसा सारखाच होता, त्यात कोणतीही खास अशी वैशिष्ट्ये नव्हती.  काळी त्वचा आणि एखाद्या रिक्रूटसारखे कापलेले केस यामुळे त्यांचा स्वभाव कठोर भासत होता. त्यांच्या दोन्ही हातांवरील जखमांच्या खुणा त्यांनी देशासाठी सांडलेल्या रक्ताची कैफियत स्पष्ट करत होत्या. काळी जीन्स, पांढरा टी-शर्ट आणि त्यावर तपकिरी लेदर जॅकेट असा त्यांचा पोशाख होता.  त्याखाली त्यांचे कडक आणि स्नायुयुक्त पिळदार शरीर स्पष्टपणे दिसत होते. त्यांचे डोळे काळ्या एव्हिएटर गॉगलने झाकले होते. त्याच्या जॅकेटच्या खाली  झाकलेल्या त्यांच्या पिस्तुलाबद्दल ते नेहमी अलर्ट होते.

रणधीर यांनी एका गार्डला त्या माणसाच्या डोळ्यावरची पट्टी काढून त्याचे हात मोकळे करण्याचा आदेश दिला. त्यांनी आपला गॉगल काढला. त्यांच्या उजव्या डोळ्याखाली एक जखमेची खूण होती. रणधीर यांची भेदक नजर त्या माणसावर स्थिरावली. ब्रिगेडियर काही क्षण चकित होऊन स्तब्ध उभे राहिले.

रणधीर आणि त्यांचे बॉस त्या माणसाची वाट पाहत होते; मात्र,  नक्की का ते ठाऊक नव्हते? त्यांना एवढेच माहीत होते की ते ज्या माणसाला शोधत होते तो सापडला होता आणि आता त्याची चौकशी केली जाणार होती; कसली चौकशी हे देखील माहित नव्हते? पण काहीतरी गंभीर घडत असल्याची त्यांना खात्री होती. त्यामुळेच त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, कारणत्यांना संपूर्ण हकीकत जाणून घ्यायची होती. हे एक टॉप सीक्रेट मिशन होते.

ब्रिगेडियरनी अनेक प्रभावशाली व्यक्तींसोबत काम केले होते आणि त्यांचा अनुभव दांडगा होता. पण त्यांचे नवीन वरिष्ठ जरा विचित्र होते. ते या सर्व गोष्टींबद्दल विनाकारण खूप जास्त चिंतित होते, तरीही सर्व काही एक टॉप सीक्रेट ठेवण्यात ते यशस्वी झाले होते.

“रणधीर!”

प्रवेशद्वारातून ओळखीच्या आवाज ऐकून रणधीर थक्क झाले. तो आवाज डॉ. चंदावरकरांचा होता, ब्रिगेडियर यांचे बॉस.

“येस सर..!” ब्रिगेडियर म्हणाले

ब्रिगेडियर रणधीर यांनी ज्यांना उत्तर दिले ती व्यक्ती निव्वळ ५ फूट २ इंच उंच, रापलेली त्वचा असलेले ६२ वर्षाचे वयस्कर गृहस्थ होते. त्यांचे ओठ गडद तपकिरी होते, ज्यावरून त्यांना  धूम्रपानाचे व्यसन होते हे कोणालाही सहज लक्षात येईल. त्यांच्या डोक्याच्या फक्त पुढच्या भागावर काही पांढरे केस होते. आणखी एक गोष्ट ते वयस्कर आहेत हे प्रकर्षाने दर्शवत होती त्यांचा पेहराव.

डॉ. चंदावरकर यांनी एक पांढरा शर्ट घातला होता ज्यावर फिकट निळ्या रंगाचे उभे पट्टे होते. एक ब्राऊन रंगाची ढगळ पैन्ट. शर्ट इन केला होता आणि त्यावर सस्पेंडर्स घातले होते. सस्पेंडरच्या दोन्ही पट्ट्यांच्या मधून त्यांची गोल गरगरीत ढेरी पुढे दिसत होती. त्यांनी डोळ्यावर अत्यंत आउट ऑफ फैशन असलेला चौकोनी जाड भिंगांचा चष्मा घातला होता जो काळ्या लेसेस ने त्यांच्या गळ्यात बांधलेला होता.

डॉ.चंदावरकर यांचा पोशाख हास्यास्पद होता हे खरं पण त्याच्या डोळ्यात कडक शिस्त दिसत होती. त्यांच्या वागण्यातून ते अगदी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही आदेश देऊ शकतील असे वाटत होते. त्यांच्या बॉडी लैन्ग्वेज मधून आजूबाजूच्या लोकांमध्ये ते न्यूनगंडाची भावना सहज निर्माण करू शकत होते. जोपर्यंत ते गप्प होते  तोपर्यंत ते हास्यास्पद दिसत असत. त्यांना विनोद अजिबात आवडत नसे आणि ते आपल्या कामाप्रती अत्यंत समर्पित अशी व्यक्ती होत याचा सहज अंदाज लावता येत असे.

डॉ. चंदावरकर यांच्या मागे उभे होते डॉ. मेहता, एक गोरेपान व्यक्ती. चंदावरकर यांनी ब्रिगेडियर रणधीर आणि डॉ. मेहता यांची एकमेकांशी ओळख करून दिली. दोघांनी हस्तांदोलन केले. ब्रिगेडियर रणधीर यांना डॉ. चंदावरकर आणि डॉ. मेहता हे सहकारी वाटत होते.

रणधीर यांना ते फारसे आशावादी वाटले नाही. त्यांच्या  हावभावावरून ते अस्वस्थ दिसत होते जणू ते अत्यंत व्यथित होते. ते डॉ. चंदावरकर यांच्या पेक्षा जास्त शिक्षित असावेत. त्यांचे डोळे एखाद्या बुद्धीजीवी व्यक्तीसारखे दिसत होते.

डॉ. मेहता हे साधारण ५० वर्षे वयाचे पुरुष होते आणि ते जैन समाजाचे सदस्य होते. त्यांचे डोळे तपकिरी आणि चेहरा गुबगुबीत होता. त्यांनी मरून रंगाचा शर्ट आणि काळी पँट घातली होती, जी त्यांच्या काळ्या रंगाच्या व्हीगन लेदरच्या महागड्या शूजसह चांगली दिसत होती. त्याच्या शरीरातील बहुतेक चरबी त्याच्या पोटाभोवती केंद्रित होती. त्यांनी उजव्या हातात २४ कॅरेट सोन्याचे ब्रेसलेट आणि डाव्या हातात रोमन अंक असलेले सोन्याचे  घड्याळ घातले होते.

“ हाच आहे का तो?” डॉ. चंदावरकर यांनी आपल्या जाड्या आवाजात विशिष्ट अशा कोकणी लहेजाच्या मराठीत विचारले.

“होय सर..!” ब्रिगेडियर

“ मग आपण इथे कोणाची वाट पाहतोय? याला इंट्रोगेशन  चेम्बर मध्ये घेऊन चला.” चंदावरकर

सुरक्षा रक्षकांनी कैद्याला धरून ब्रिगेडियर रणधीरच्या मागे ओढत नेले. त्यांनी एका मोठ्या कॉरिडॉरमध्ये प्रवेश केला. डॉ.चंदावरकर सरळ चालत पुढे गेले आणि ब्रिगेडियर त्यांच्या मागे मागे गेले. कॉरिडॉरच्या एका बाजूला सरळ भिंत होती आणि दुसऱ्या बाजूला डावीकडे दारे यांच्या होती. त्या भिंतीच्या शेवटच्या दारात दोन सुरक्षा रक्षक होते ज्यांनी या सर्वांना प्रवेश दिला. तत्पूर्वी सर्वांचे त्यांनी सर्वांची फोटोसहीत नोंद करून घेतली.

ब्रिगेडियर रणधीरला मात्र आता हा प्रश्न पडला होता कि नक्की इंट्रोगेशन मध्ये काय प्रश्न विचारणार आहेत.

क्रमश: