वादळी रात्र
ती एक वादळी रात्र होती. भरपूर वारा सुटला होता.
कॉरिडोरमध्ये अंधार होता. आपापल्या खोलीत जाताना केजीबी सोनाली पर्रीकरला 'गुड नाईट' म्हणाली आणि तिच्या खोलीत जाताच शूज काढू लागली. तिची खोली बरीच मोठी होती, पण त्यातून ओलसर वास येत होता. लाकडी फर्निचर होते आणि खोली दिव्यांनी सजवलेली होती. असे असले तरी ती बराच काळ वापरात नसल्यासारखी दिसत होती.बाकीचे लोक आपापल्या खोलीत स्थिरावत होते.
केजीबीच्या बाजूच्या खोलीतच सोनाली पर्रीकर आरामखुर्चीत बसून छताकडे एकटक पाहत होत्या. त्या कदाचित आपल्या मुलांची काळजी करत होत्या. डॉ.सोनाली पर्रीकर यांचे डोळे झोपेमुळे जड झाले होते आणि लवकरच त्यांना आरामखुर्चीतच झोप लागली.
रात्री उशिरा डॉ. सोनाली पर्रीकर यांना अचानक जाग आली दाराबाहेर कोणाची तरी सावली दिसली आणि कोणीतरी बाहेर फिरत आहे असे वाटले . त्या पटकन उठल्या आणि दरवाजा उघडून बाहेर पाहू लागल्या. डॉ.सोनाली पर्रीकर अंधाऱ्या कॉरिडॉरच्या शेवटच्या टोकापर्यंत गेल्या आणि तिथे कोणीच नाही हे पाहिले. त्यांना वाऱ्याचा आवाज ऐकू आला. त्या मागे वळल्या आणि अचानक केजीबी समोर उभी दिसली.
डॉ.सोनाली पर्रीकर घाबरून ओरडल्या, “तू इथे काय करत आहेस?”
केजीबी धापा टाकत होती. ती म्हणाली, “मला एकटीला भीती वाटत्ये. मी तुमच्या खोलीत झोपू का?"
डॉ. सोनाली पर्रीकर यांनी त्यांच्या कपाळावर जमा झालेला घाम पुसत पुसत होकारार्थी मान हलवली.
दोघी खोलीत गेल्या. केजीबीने आपली बॅग बेडवर ठेवली आणि ती उघडली.
डॉ.सोनाली "तुला कोणाची चाहुल लागली का?"
“हो, मला माझ्या खिडकीतून कोणाची तरी सावली दिसली, पण अंधार आणि हेडफोनमुळे मला काहीच ऐकू आले नाही हे बरं झालं. मला भूत वगैरे आजीबात बघायचं नाहीये किंवा ऐकायचं सुद्धा नाही," केजीबी घाबरली होती.
डॉ.सोनाली पर्रीकर यांनी पाण्याचा ग्लास भरला आणि केजीबी समोर ठेवला. तिला धीर देत त्या म्हणाल्या
"भूतबित असं काही नसतं गं, कृतिका"
“ मला फारसं कोणी माझ्या खऱ्या नावाने म्हणजे कृतिका या नावाने हाक मारत नाही. फक्त माझी आई आणि ताई मला कृतिका म्हणायची. पण ते जाउदे, तुम्ही बाहेर काय करत होतात?" केजीबीने कुतूहलाने विचारले,
डॉ.सोनाली पर्रीकर यांनी त्यांना दिसलेल्या भयंकर सावलीच्या गोष्टीला बगल दिली कारण केजीबी आधीच घाबरली होती.
पुढे त्या म्हणाल्या “मला माझ्या मुलांची आठवण येत होती. मला त्यांच्याशी बोलायचे आहे, पण आता खूप रात्र झाल्ये. घरी सगळे झोपले असतील.”
केजीबी डॉ. सोनालीना धीर देत म्हणाली, "काळजी करू नका, मला खात्री आहे त्यानाही तुमची आठवण येत असेल आणि आपणं इथलं काम संपवून लवकरच घरी जाऊ ." हे बोलताना तिने बोटं क्रॉस केली होती.
डॉ. सोनाली पर्रीकर यांनी तिला एक स्माईल दिली आणि नि:श्वास सोडून त्या आपल्या पलंगावर आडव्या झाल्या. त्या काही क्षणातच झोपी गेल्या.
मग केजीबीने चष्मा लावला, लॅपटॉपची स्क्रीन उघडली आणि काहीतरी काम करू लागली. बटणे दाबण्याच्या आवाजाने खोलीतील शांतता भंग पावली.पण त्या आवाजाने डॉ सोनाली यांना आजीबात जाग आली नाही.
दरम्यान, रणधीर त्याच्या दोन माणसांसह रात्रीच्या अंधारात स्पीड बोटीने ‘कवरत्ती’ बेटावर काही बॉक्स गोळा करण्यासाठी गेला. काही अंतरावर समुद्रात थांबलेल्या एका मोठ्या जहाजातून कोणीतरी त्याला बॉक्सेस हाताळताना पाहत होते. रणधीर जेव्हा पुन्हा 'बित्रा' आयलंडला जायला निघाला तेव्हा एक अज्ञात व्यक्ती दुसऱ्या एका स्पीडबोटीने त्याचा पाठलाग करत होता. रणधीरच्या चाणाक्ष सैनिकी नजरेने त्या व्यक्तीला अगोदरच हेरले होते.
काही वेळातच रणधीर आणि त्याचे साथीदार बित्रा आयलंडच्या डॉकवर आले आणि त्यांनी बॉक्सेस उतरवून घेतले. रणधीरने मागे वळून पहिले, पाठलाग करणारी स्पीडबोट आता नजरेच्या टप्प्यात नव्हती.
क्रमश: