इंट्रोगेशन
"तुम्हाला जे आठवतं ते सांगा अनंत साहेब." सोनाली पर्रीकर मूळ मुद्द्यावर परत आल्या.
अनंत महाकाल बोलत होता आणि त्याचे हावभाव भराभर बदलले – हास्य, शांती, चिंता आणि भीती.
"मला सदाभाऊ बागडे आठवतात." अनंत महाकाल डोळे मिटून बडबडला.
ते नाव ऐकून डॉ. मेहता चकित झाले, जणू काही ते देखील सदाभाऊ बागडे यांना ओळखतात!
"ते कोण आहेत?" अभिषेकने विचारले.
"माझे जनरल. सदानंद दौलत बागडे " अनंत म्हणाला.
"ते देखील तुमच्या टीमचा भाग आहेत का?"
"हो!"
"ते आता कुठे आहेत?"
"त्यांचा मृत्यू झाला आहे."
" कसा?"
"त्यांची हत्या झाली होती."
"त्यांना कोणी मारले?"
"सर्फराज घारे ने."
"तुला अजून कोणी आठवतंय का?"
"संजय!"
"कोण संजय दत्त? संजय लीला भन्साळी? अभिषेकने उपहासाने विचारले.
ज्या मुलीने अभिषेकला अघोरी म्हणजे काय असे विचारले होते ती मोठ-मोठ्याने हसू लागली. KGB म्हणजेच कृतिका गुरुनाथ भोसले. व्यवसायाने हॅकर. अनेक ऑनलाइन फसवणूकी आणि बँक आकाउंट फ्रॉड पकडून देण्याच्या कामात सहभागी असलेल्या KGB ने वयाच्या २४ व्या वर्षी भारतीय सायबर सेलचे लक्ष वेधून घेतले होते; ती कोणत्याही फॉर्मल डिग्री शिवाय हे सर्व करण्यात माहीर होती त्यामुळे तिला अजिबात चिंता नव्हती. KGB एक सुंदर मुलगी होती. मूळची सातारा जिल्ह्यातील असलेली KGB बोलण्यात काहीशी उद्धट होती असंस्कृत होती, परंतु तिच्या कामात चतुर आणि बुद्धिमान होती. तिचे आवडते काम सोडून बाकी सर्व गोष्टींबद्दल ती बेफिकीर होती.
“ बहुतेक संजय नार्वेकर असेल...वास्तव मधला देड फुट्या....एSSSS ” KGB ने संजय नार्वेकर च्या स्टाईल मध्ये बोट वर करून म्हटले.
KGB स्वभावाने बेफिकीर होती. तिची जीभ क्वचितच तिच्या नियंत्रणात राहत असे. तिचा चेहरा इतका बोलका होता कि तिचा चेहरा पाहून कोणीही तिच्या मनात काय चालू आहे हे सहज सांगू शकेल. साताऱ्यात वाई येथे मूळ घर असलेल्या KGB ला तिच्या आई वडिलांनी पाचगणीच्या शाळेत शिकवले होते तिच्या वागण्या बोलण्यात सातारी लहेजा होता. तिचे दाट केस काळे आणि कुरळे होते. तिने ते खांद्यापर्यंत कापले होते. कपाळावर आणि डोळ्यावर येऊ नये म्हणून तिने एक घट्ट हेअरबैंड लावला होता. तिचे टपोरे डोळे बदामाच्या आकाराचे होते. तिने अनेक वेगवेगळ्या ॲक्सेसरीजसह पांढरा टीशर्ट घातला होता ज्यावर कार्टूनचे चित्र होते. तिने रंगीत फ्रेमच फैशनेबल चष्मा घातलेला होता, जो तिला खूप आधुनिक लुक देत होता. तिच्या लांब आणि सुडौल पायात पांढरे चमकदार हिपहॉप स्टाइल स्नीकर्स घातले होते. तिने तिच्या मनगटावर वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्या एक फिटनेस बैंड आणि गळ्यात ब्लेडच्या आकाराचे लॉकेट घातले होते. तिच्या कानामध्ये तिने तलवारीच्या आकाराचे इअररिंग होते.
"संजय! ऋषी गवळगण यांचा पुत्र .” अनंत महाकाल म्हणाला.
"आणि तुम्ही त्याला कसे ओळखता?" असा सवाल सोनाली पर्रीकर यांनी केला.
" संजयने महायुद्धादरम्यान हस्तिनापूर नरेश धृतराष्ट्र याला मार्गदर्शन केले होते." अनंतने उत्तर दिले.
तो पुढे म्हणाले, “मी हस्तिनापूरचा प्रधान होतो तेव्हा त्यांना भेटलो होतो. माझं नाव विदुर...”
हि नावं कानावर पडताच अभिषेक लक्ष देऊन ऐकू लागला, म्हणाला, "मी ही नावं मी या आधी ऐकली आहेत."
"बरं!" सोनाली पर्रीकर यांना पुढे जायचे होते.
"अहो, तुम्हाला लक्षात येतंय का? तो महाभारत काळात जिवंत असल्याचा दावा करतोय." अभिषेक म्हणाला.
"मी याच्या या पौराणिक भाकड कथांवर विश्वास ठेवावा अशी तुमची इच्छा आहे का?" डॉ.सोनाली.
“ या भाकड कथा नाहीयेत...तुम्ही माझं...”
अभिषेक आपले वाक्य पूर्ण करण्याआधीच डॉ.सोनाली पर्रीकर यांनी अनंतला दुसरा प्रश्न विचारला.
"...मिस्टर अनंत महाकाल! तुमची अजून काय नावं आहेत?"
"सुषेण!" अनंत महाकाळ हसत उत्तरला.
"सुषेण म्हणून तू काय करायचास?" डॉ. सोनाली पर्रीकर यांनी ठासून विचारले.
"मी एक वैद्य होतो." अनंत
"इतकीच नावं आहेत की तू आणि कुठलं नाव सुद्धा वापरलं आहेस?" असा सवाल सोनाली पर्रीकर यांनी केला.
"मी एकदा विष्णूगुप्त देखील होतो." त्याने उत्तर दिले.
हे नाव ऐकताच डॉ. सोनाली पर्रीकर वैतागल्या आणि त्यांनी डोळे मिटून आपल्या डोक्याला हात लावला.
"बरं आणि विष्णूगुप्त म्हणून तू काय केलेस?" त्यांनी कंटाळून जात विचारले.
अनंत महाकाल काहीतरी बडबड करू लागला. पण तो काय बोलतोय हे कोणालाच समजत नव्हते.
व्याघ्रीव तिष्ठति जरा परितर्जयन्ती
रोगाश्च शत्रव इव प्रहरन्ति देहम्।
आयुश्च परस्वितभिन्नघटादिवाम्भः
लोकस्तथाप्यहितमाचरतीति चित्रम्॥
“ एक मिनिट. हे बघा मिस्टर अनंत. आम्हाला समजेल अशा भाषेत आपण कृपया बोला. मराठी, इंग्लिश किंवा हिंदी.” डॉ. सोनाली जरा नाराजीच्या सुरातच म्हणाल्या.
यावर अनंत महाकाल फक्त हसत होता. इतक्यात अभिषेकने ह्या श्लोकाबद्दल ऑनलाईन माहिती मिळवली आणि तो एकदम ओरडला.
“सापडलं सापडलं...” सगळे त्याच्याकडे पाहू लागले.
“ सॉरी म्हणजे मला तो काय म्हणतोय ते समजतय...मी सांगू का?” अभिषेक
डॉ. सोनाली पर्रीकर खुणेनेच हो म्हणाल्या पण त्यांचा हात अजूनही डोक्याला लावलेलाच होता.
व्याघ्रीव तिष्ठति जरा परितर्जयन्ती रोगाश्च शत्रव इव प्रहरन्ति देहम्। आयुश्च परस्वितभिन्नघटादिवाम्भःलोकस्तथाप्यहितमाचरतीति चित्रम्॥
भर्तृहारीकृत वैराग्यशतकातील हा एक श्लोक आहे ज्याचा अन्वय असा.. {जरा व्याघ्री इव परितर्जयन्ती तिष्ठति, रोगाः च शत्रवः इव देहम् परिहरन्ति, भिन्नघटात् अम्भः इव आयुः परिस्रवति, तथा अपि लोकः अहितम् आचरति इति (मम) (वि)चित्रम् (भाति) ।}
अर्थात
म्हातारपण वाघासारखे गुरगुरत उभे आहे, रोग शत्रूंसारखे शरीरावर आक्रमण करीत आहेत, तडा गेलेल्या मडक्यातून पाणी गळते तसे वय कमी होत आहे, तरीही हे जग म्हणजे जगातील लोक विघातक कार्यात गुंतलेले आहेत. हे माझ्या बुद्धीच्या आकलना पलीकडचे आहे आणि खरोखर विचित्र आहे.
थोडक्यात स्पष्टीकरण
सरासरी माणूस ऐहिक यशांसाठी इतका समर्पित असतो की तो त्या साध्य करण्यासाठी आपला सर्व वेळ, श्रम आणि शक्ती घालवतो. त्यापलीकडे कशातही लक्ष द्यायला त्याला वेळ मिळत नाही. त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला नेहमीच भाग पाडले जाते असे नाही. अर्थात, काही दुर्दैवी लोकांचा वेळ त्यांच्या दैनंदिन उदरनिर्वाहासाठी खर्च होतो, परंतु प्रत्येकाच्या समस्या इतक्या दबावाच्या नसतात. आपल्या गरजा काय आहेत आणि आपल्या मर्यादा काय आहेत याचा विचार त्यांना करायचा नसतो हेच खरे. त्यांची एखादी गरज पूर्ण होताच त्यांच्या इच्छा एक पाऊल पुढे सरकतात आणि त्यांच्यासाठी नवीन गरजा जन्माला येतात, ज्या ते साध्य करण्याचा प्रयत्न करतात. हा सिलसिला आयुष्यभर चालू राहतो, ते नेहमीच अमरपट्टा घेऊन आल्यासारखे वागतात वागतात. पण आयुष्यातील कटू सत्य काही औरच आहे.......”
पुढे अभिषेक वाचणार इतक्यात KGB किंचाळली
“अय्या नवनीत का... मला सुद्धा संस्कृत मध्ये ९० अबोव्ह मार्क असायचे.
KGB, अभिषेक आणि अनंत सोडले तर सगळे कंटाळले होते.
“ समजलं. धन्यवाद!” डॉ सोनाली वैतागून पुढे म्हणाल्या
“संस्कृताचे धडे गिरवून झाले असल्यास आपण पुढे जाऊया का? अभिषेक सर..”
क्रमश: