टॉप सीक्रेट मिशन
इकडे लॅबमध्ये रणधीर आणि अनंत महाकाल यांना पुन्हा एकदा एकमेकांसोबत राहणे भाग पडले होते. रणधीरला अनेक प्रश्नांनी घेरले होते; पण तो अनंतला काहीच बोलू शकत नव्हता. त्याला वाटले की एक छोटीशी चूक देखील त्याला या मिशन मधून बेदखल करू शकते. त्यामुळे तो मुद्दाम त्याची अस्वस्थता सहन करत होता.
रणधीर आत आल्यापासून अनंत त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहत होता.
"तुम्ही ठीक तर आहात ना?" अनंत चिंता व्यक्त करत म्हणाला.
"होय! का? काय झालं?" रणधीर आपल्या विचारातून बाहेर पडत म्हणाला.
"तुम्ही तणावग्रस्त दिसत आहात." अनंत म्हणाला.
रणधीरला नक्की कसला त्रास होतोय हे बोलावं की सोडून द्यावं या द्विधा मन:स्थितीत होता. तो काही क्षण गप्प बसून विचार करत राहिला; पण त्याची उत्सुकता सर्व गोष्टींवर मात करत होती आणि म्हणून त्याने न राहवून विचारले,
“तू इथे एका बंदिस्त कक्षात बसला आहेस. पाऊस पडणार आहे हे तुला कसे कळले, तेही हवामान बदलण्याच्या कित्येक तास आधी? याव्यतिरिक्त, तू वाऱ्याचा वेग मोजलास, ओल्या मातीचा सुगंध घेतला आणि तूला तापमानात घट जाणवली. या खोलीमध्ये हवा येण्यासाठी काही चान्स नाही. मग तू हे कसं साध्य केलंस?"
रणधीर अविश्वासाने मान हलवत म्हणाला.
अनंत किंचितसा हसला.
"खरं सांगू? मला तर हे देखील माहित आहे की मी भारताच्या नैऋत्य किनारपट्टीवरील एका बेटावर आहे आणि हे मी माझ्या इंद्रियांच्या मदतीने सांगू शकतो."
हे उत्तर ऐकून रणधीर चपापला.
“तुला हे कळू शकतच नाही! जेव्हा तुला हेलिकॉप्टरमध्ये आणले जात होते, तेव्हा तू बेशुद्ध होतास आणि तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधली होती.
"पण मला हे सर्व माहित आहे. त्यासाठी फक्त थोडा अनुभव आणि सराव आवश्यक असतो. तुम्हीही हे करू शकता, अगदी कोणीही करू शकतं .” अनंतने आपले खांदे उडवत सत्य कथन केले.
"कसे?" रणधीरला काहीच समजत नव्हते.
“ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या साहाय्याने विविध रंग सहज ओळखू शकता अगदी तसेच फक्त एकाग्र होऊन वेगवेगळ्या लहरींचा अनुभव घ्या, त्याचप्रमाणे तुम्ही आकाशात विमान गायब होताना पाहू शकता आणि गरुड उंच उडताना पाहू शकता. त्याच प्रकारे तुम्ही जवळ येणा-या आणि दूर जाणाऱ्या गोष्टींचा वास घेऊ शकता.
अनंतने रणधीरच्या बुद्धीपलिकडे असलेले तर्कशास्त्रीय विश्लेषणात्मक स्पष्टीकरण दिले.
रणधीरला अजून बरेच प्रश्न पडले होते इतक्यात डॉ. चंदावरकर दालनात दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ डॉ.मेहताही त्याचवेळी तेथे पोहोचले.
मेहता डॉ.चंदावरकरांना म्हणाले, “आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे.”
“आम्हाला?” डॉ. चंदावरकर
“सर आम्हाला म्हणजे आम्हा सर्वाना..” डॉक्टर मेहता.
"आता नको. या सेशन नंतर लंच ब्रेकमध्ये आपण बोलू.”
"सर, तुमच्याशी बोलल्याशिवाय आम्ही दुसरे सेशन सुरूच करणार नाही." डॉ मेहता यांनी ठामपणे सांगितले.
"बाकीचे टीम मेंबर कुठेत?" डॉ.चंदावरकर यांनी विचारले.
"तुमच्या ऑफिसमध्ये. ते आपल्या दोघांची वाट पाहत आहेत. डॉ.मेहता म्हणाले.
अनंत आणि रणधीर त्या दोघांकडे बघत ऐकत होते. डॉ.चंदावरकर यांनी रागाने हातातील फाइल टेबलावर आपटली आणि डॉ.मेहता यांच्याकडे वळले. इतक्यात डॉ. मेहता वळले आणि खोलीबाहेर निघून गेले.
डॉ. चंदावरकर खोलीतून बाहेर पडताना मागे वळले आणि रणधीरला आपल्या मागे येण्याची त्यांनी ऑर्डर दिली. रणधीर अनिच्छेने त्यांच्या मागे गेला. अनंतवर नजर ठेवण्यासाठी दोन रक्षक तैनात होते.
“ तवा तापलाय जरा बी उशीर झाला तर भाकर करपून जायची..” अनंत ग्रामीण शैलीत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर एक निराळेच हास्य होते.
रणधीर डॉक्टर चंदावरकरांच्या मागे खोलीबाहेर गेला. जाताना वाटेत डॉ. चंदावरकरांच्या कार्यालयात शिरण्यापूर्वी त्याने स्वयंपाकघरात डोकावून पाहिलं. तवा चुलीवर होता आणि स्वयंपाकी कुठेच दिसत नव्हता भाकरी तव्यावर होती आणि उलटायला झाली होती. रणधीर धावत तिथे गेला आणि त्याने तव्यावरील भाकरी उलटली. इतक्यात स्वयंपाकी अचानक आला आणि रणधीरला तिथे पाहून आश्चर्यचकित झाला.
दुसऱ्या क्षणी रणधीर डॉ. चंदावरकरांच्या मागे जाण्यासाठी पटकन स्वयंपाकघरातून बाहेर पडला. डॉ.चंदावरकर कार्यालयात प्रवेश करताच त्यांना सर्वजण त्यांची वाट पाहत उभे असलेले दिसले. डॉ. चंदावरकर थेट आपल्या खुर्चीकडे गेले आणि ऐटीत बसले. त्यांची नजर डॉ.मेहता यांच्यावर होती. खोलीत तणावाचे वातावरण होते.
"तो कोण आहे?" डॉ.मेहता यांनी स्पष्ट प्रश्नाने थेट मुद्द्द्याला हात घातला..
“मेहता, तुम्हाला इथे विशिष्ट काम करण्यासाठी बोलावण्यात आले आहे . मला प्रश्न विचारण्यासाठी नाही.”
“सर आय थिंक मला जाणून घेण्याचा अधिकार आहे कि तो माणूस कोण आहे?" डॉ.मेहता यांनी थोडी अधिक विनंती केली. त्यांना टीमचा पूर्ण पाठिंबा होता
अपमान झाल्यामुळे डॉ. चंदावरकर ताडकन उभे राहिले आणि चढ्या आवाजात म्हणाले,
“नाही, इथे तुम्हाला कोणताही अधिकार नाही. इथले सर्व अधिकार माझ्याकडे आणि फक्त माझ्याकडे आहेत.
"सर, कृपया शांत व्हा."
डॉ.सोनाली पर्रीकर यांनी डॉ.चंदावरकर यांना विनंती केली. त्या पुढे म्हणाल्या,
“ सर, अनंत महाकाल विषयी आमच्या अपूर्ण माहितीच्या आधारे आम्हाला एका विचित्र निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास भाग पाडले जात आहे. आम्ही सर्वजण खूप अस्वस्थ आणि गोंधळलेले आहोत.”
"आपण कदाचित इथे सुरक्षित असू शकतो, पण जर तो दहशतवादी असेल तर आमचे कुटुंब सुरक्षित नाही." डॉ.मेहता यांनी योग्य चिंता व्यक्त केली.
"तो दहशतवादी नाही!" डॉ चंदावरकर संतापले आणि त्यांच्या घोगऱ्या आवाजात ओरडले तेव्हा त्यांचा आवाज संपूर्ण इमारतीमध्ये घुमत होता.
"एवढ्या आत्मविश्वासाने हे असं कसं म्हणता येईल?" डॉ. मेहता कोणाच्याही लहरीपणामुळे मागे हटणार नव्हते, विशेषत: यावेळी नाहीच नाही.
"मला माहित आहे." डॉ. चंदावरकर हाताची घडी घालून रागावर नियंत्रण ठेवत म्हणाले.
"तुम्हाला अजून काय माहित आहे?" डॉ मेहता यांनी विचारले. त्यांची परिस्थिती देखील निराळी नव्हती.
डॉ.चंदावरकर आता डॉ. मेहता यांना अक्षरशः शिवीच देणार होते पण त्यांनी आपले तोंड बंद ठेवले. ते आता रागाने थरथरू लागले होते.
डॉ. सोनाली पर्रीकर यांनी डॉ. चंदावरकर यांच्याकडे गेल्या त्यांनी त्यांच्या खांद्यावर थोपटून त्यांना खुर्चीवर बसवले. त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना टेबलावर ठेवलेला पाण्याचा ग्लास दिला. डॉ.चंदावरकर पाणी प्यायले. डॉ.सोनाली पर्रीकर यांनी बोलण्यापूर्वी त्यांना सेटल होण्यासाठी काही वेळ दिला काही क्षण गेल्यानंतर त्या म्हणाल्या,
“सर, आम्हाला अशा काही गोष्टी कळल्या आहेत ज्या आम्हाला अस्वस्थ करत आहेत आणि काही खुल्या सूत्रांकडे घेऊन जात आहेत. KGB, सरांना कृपया थोडक्यात सांग.”
KGB अनंत महाकालबद्दल मिळवलेल्या माहितीच्या आधारे संक्षिप्त वर्णन करत म्हणाली,
“सर, ज्या माणसाला आपण ‘अनंत महाकाल’ म्हणून ओळखतो त्याची देशाच्या विविध भागात अनेक नावं आहेत. काही ठिकाणी त्याचा स्वतःचा पिता असा उल्लेख आहे तर काही ठिकाणी त्याचा स्वतःचा मुलगा असा उल्लेख आहे. चेहरा सारखाच, पण नावं वेगळी. मला त्याच्या इतर ओळखींच्या नावावर दोन एक्टिव लॉकर्स आणि अनेक बँक खाती सापडली आहेत, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे आहेत. कायदेशीरदृष्ट्या तो मनुष्य अगदी क्लीन आहे. तो एक व्यवस्थित व्यक्ती असल्याचे भासते, जो कदाचित एखाद्या भूमिगत दहशतवादी संघटनेसाठी काम करतो. तो कदाचित एखाद्या गुप्त मोहिमेवर असेल ज्याबद्दल आपल्याला अद्याप नीटशी माहिती नाही. आणखी एक आम्हाला अशी गोष्ट कळली आहे की तो सुभाषचंद्र बोस यांचा शोध घेत आहे, जो सरकार आणि देशासाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय असू शकतो."
डॉ.चंदावरकर यांनी KGBचे म्हणणे बारकाईने परीक्षण करत ऐकले. डॉ. सोनाली पर्रीकर हा धागा पुढे नेत म्हणाल्या,
“संमोहित अवस्थेत त्याने पूर्वीच्या युगात या पृथ्वीवर होऊन गेलेल्या लोकांबद्दल बोलले आहे. आपल्यापैकी काहींना असे वाटते की त्याला त्याचे सर्व जन्म आठवतात आणि काहींना असे वाटते की तो दुहेरी व्यक्तिमत्त्वाचा रुग्ण आहे. हे देखील शक्य आहे की तो एखाद्या प्राचीन गुप्त गटाचा सदस्य आहे, जो पिढ्यानपिढ्या कोणत्यातरी गुप्त हेतूसाठी कार्यरत आहे; परंतु त्याची कोणतीही ओळख यापैकी कोणत्याही शक्यतांशी जुळत नाही.”
डॉ.सोनाली पर्रीकर यांनी बोलणे थांबवले. काही क्षण त्या ठिकाणी शांतता होती डॉ.सोनाली पर्रीकर पुढे म्हणाल्या,
"सर, आम्ही तुम्हाला मदत करावी असे तुम्हाला जर वाटत असेल, तर तुम्हाला जे माहीत आहे ते आम्हाला सांगून आधी मदत करावी लागेल. या निर्जन बेटावरील इमारतीचे काय रहस्य आहे? आपण त्या माणसाला इथे का आणले आहे? आपण त्याच्याकडून काय जाणून घेण्यासाठी धडपडत आहोत? सर, तुम्हाला काय माहिती आहे ते प्लीज आम्हाला सांगा.”
यावेळी डॉ.मेहता रागावण्याऐवजी काहीसे हताश झालेले दिसले. नेहमीप्रमाणे या वेळीही डॉ.चंदावरकर यांच्या चेहऱ्यावर कोणताही भाव दिसून आला नाही. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि ते स्वत:च्या पायाकडे बघू लागले आणि मनातल्या मनात काहीतरी विचार करु लागले. काही वेळाने ते म्हणाले,
“ठीक आहे, मला जे माहीत आहे ते मी तुम्हाला सांगतो; पण त्याआधी, तुम्ही त्याच्या लॉकर्सबद्दल काय सांगितले आहे याची मला संपूर्ण माहिती हवी आहे.”
"WHY NOT सर, हे घ्या." KGB डॉ. चंदावरकर यांना एक कागद हातात देत म्हणाली,
त्यांनी तो कागद रणधीरकडे दिला. कागद हातात घेताच रणधीर खोलीबाहेर गेला. त्याला पुढे काय करायचं होतं ते त्याला माहीत होतं!
डॉ. चंदावरकरांनी त्यांच्या डेस्कला लागून असलेली तिजोरी अतिशय काळजीपूर्वक उघडली. त्यांनी त्यातून काही छायाचित्रे आणि कागदपत्रे काढून डॉ. सोनाली पर्रीकर यांना दिली. त्यांनी ती पहिली आणि ती एक एक करून इतरांमध्ये वाटली. सर्व चित्रे अनंत महाकाल याची वेगवेगळ्या रूपातील आणि वेशभूषेत होती. प्रत्येक फोटोच्या खाली त्याच्या भेटीचे ठिकाण आणि वर्ष लिहिले होते.
सोनाली पर्रीकर एक एक करून वाचू लागल्या
बनारसमध्ये १८७४
हरियाणामध्ये १८८२
मद्रासमध्ये १८८८
महाराष्ट्रात १८९५
केरळमध्ये १९०२
लखनौमध्ये १९१६,
१९३० सत्याग्रह चळवळ
१९४४ मध्ये, फॉरवर्ड ब्लॉक ऑफ सुभाषचंद्र बोस
१९६४ मध्ये, जवाहरलाल नेहरू यांच्या सोबत
१९८४ मध्ये, श्रीमती इंदिरा गांधी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी
१९९१ मध्ये, राजीव गांधी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी
१९९८/२००१/२००५/२०१०/२०११ /२०१२/२०१३/२०१३/२०१३...
सर्वांचे आश्चर्यचकित झालेले चेहरे पाहून डॉ. चंदावरकर म्हणाले,
“ही सर्व मृत्यू प्रमाणपत्रे आणि काही सरकारी नोंदी आहेत, जे अनंत महाकाल याने वापरलेली सर्व नावे मृत असल्याची पुष्टी करतात. पण जेव्हा तो एका ठिकाणी मेला, तेव्हा तो दुसऱ्या ठिकाणी जिवंत होतो. उल्लेखनीय बाब म्हणजे, तो प्रत्येक फोटोमध्ये सारखाच दिसतो, ना तरूण ना म्हातारा, ४० वर्षांचा माणूस.”
सर्वाना समजायला वेळ देऊन डॉ. चंदावरकर काही वेळ गप्प राहिले आणि पुन्हा गंभीरपणे म्हणाले,
“आणि म्हणूनच तुम्ही सगळे इथे आहात आणि तो माणूस कोण आहे हे विचारण्यासाठी तुम्हाला इथे बोलावले नाही तर मी तुम्हाला विचारायला आलो आहे. या प्रकरणाबद्दल मी त्या माणसाची माहिती घेण्यासाठी उपस्थित आहे. या गूढ माणसाबद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि समर्पक माहिती शोधण्यासाठी तुम्ही सर्वजण गुप्त मोहिमेचा भाग आहात. लक्षात ठेवा, हे एक टॉप सीक्रेट मिशन आहे!
क्रमशः