त्यागातील वैभव 7
“त्यांना काम करण्यात कृतार्थता वाटत असेल तर सांगते काम. आमचे बायकांचे काय? आम्ही सर्वांना राबवून घेऊ शकतो. कोणी नसले तरी एकट्या आम्ही रात्रंदिवस काम करू व प्रसंग पार पाडू. बरे, शंभर माणसे कामाला असली तरीही आम्हाला पुरी होत नाहीत. वायुदेवाला म्हणावे, हळदीकुंकवाच्या दिवशी मंद, शीतल असा वाहत रहा. माझ्या बाबांच्या गावाहून येत रहा. म्हणजे थंडगार असा असशील. तसेच बरोबर सुगंध आण म्हणावे आणि सारे रस्ते स्वच्छ ठेव. इवलासुद्धा केरकचरा त्या दिवशी नको. वाटेत दगडधोंडे, काटे काही नको. सारे म्हणावे उडवून टाक. कोट्यावधी बायका येणार. कोणाला वाहणे असतील, कोणाची नसतील. रस्ता सुंदर ठेवणे आपले काम. आणि पर्जन्यदेवाला म्हणावे सारा रस्ता शिंपडून ठेव. चिखल नको मात्र होऊ देऊस. बेताचा झिम् झिम् सडा घाल. म्हणजे पायांनी धूळ उडणार नाही. सांग ही त्यांना कामे.”
“सांगेन. त्यांना आनंद होईल. जातो हं ताई!” असे म्हणून चंद्र गेला.
लक्ष्मीचा आनंद गगनात मावेना. तो प्रासाद पाहून तिची दृष्टी सुखावली. अतिरम्य असा तो प्रासाद होता. त्याच्यावर चंद्राचे किरण पडून तो अधिकच मनोहर द्सला असता. गरुडाने सागराकडून रत्नांच्या राशी आणून ठेवल्या. शिवाय, सागराने हिरव्यानिळ्या रंगांची अनंत वस्त्रे पाठविली होती. सर्व रस्त्यांवरून पायघड्या घालण्यासाठी ती दिंडे पाठवण्यात आली होती.
“माझ्या बाबांना सारे सुचले. थोर आहेत माझा बाबा.” ती म्हणाली. लक्ष्मीने गरुडाला सर्व देवांकडे जाऊन आमंत्रणे देण्यास सांगितले.
“लक्ष्मीबाई, मी सर्वत्र जाईन. परंतु शंकराकडे जाणार नाही.” गरुड म्हणाला.
“का रे बाबा?”
“तेथे तो व्रात्य नंदी आहे. त्याने एकदा मागे एका हुंकारासरशी मला नाकात ओढले. कोण माझी त्रेधा! शिवाय तेथे ती भुते-प्रेते-पिशाच्चे असतात. मला भीती वाटते.”
“शंकर तर भोळे. तेथे कशाची भीती?”
“ते भोळे आहेत. परंतु त्यांच्या भोवतालची मंडळी भोळी नाहीत.”