त्यागातील वैभव 18
“तू आलीस. ती कोठे आहे?” शंकरांनी विचारले.
“त्यांनी मला पाठविले आहे.” सरस्वती म्हणाली.
“काय आहे निरोप?”
“सासूबाईंनी दागदागिने मागितले आहेत. तेथे लक्ष्मीसहित सर्व देवांगना त्यांना हिणवीत आहेत. सासूबाईंचा त्यांनी अपमान केला. नाही नाही ते त्या उन्मत्त बायका बोलल्या. सासूबाईंचे डोळे भरून आले. मी त्यांना म्हटले की, तुम्ही थांबा. मी घरी जाऊन दागदागिने घेऊन येते. मामंजी, असेल नसेल ते द्या. देवांगनांचा गर्व हरवा.”
“मजजवळ काय आहे?”
“तु्मच्याजवळ सारे आहे. मला माहीत आहे. त्रिभुवनातील सारी संपत्ती, सारे सामर्थ्य तुमच्याजवळ आहे. कारण तुम्ही त्रिभुवनाशी एकरुप झालेले आहात. देवा महादेवा, द्या. जे जवळ असेल ते द्या.”
“जटेचा एक केस देतो. चालेल?”
“त्याचे काय करू?”
“तो केस घेऊन कुबेराकडे जा व त्याला सांग की, या केसाच्या भारंभार दागिने दे.”
“कुबेर वैकुंठासच आला आहे.”
“मग तर बरेच झाले. तुला दुसरीकडे त्याला शोधीत जायला नको. तरी मी तिला सांगत होतो की, जाऊ नकोस. तुला हसतील आणि तू मग रडशील. असो. हा घे केस व जा.”
सरस्वतीने श्रद्धेने व विश्वासाने तो केस घेतला. मामंजीस प्रणाम करून हंसावर बसून ती निघाली. वैकुंठात सर्वांची उत्कंठा वाढली होती. लक्ष्मी सर्वांच्या ओट्या भरीत होती. पार्वतीची अद्याप राहिली होती.
“त्यांची सर्वांच्या मागून भरा, सर्वांच्या मागूनच नाहीतरी त्या आल्या.”
“आणि उरलीसुरली माणिक-मोती त्यांना द्या.”