त्यागातील वैभव 11
“तू माझ्या मूषकावर बसून जा.” गणपती सरस्वतीला म्हणाले.
“तुमची नेहमी उठून थट्टा!” सरस्वती म्हणाली.
“यात काय थट्टा? हा उंदीर टुणटुण उड्या मारीत जाईल. वैकुंठात तुम्हा बायकांचे प्रदर्शन व दुसरे सर्व वाहनांचे प्रदर्शन! हत्ती, बैल, हंस, गरुड, उंदीर- जमू देत सारे पशू-पक्षी.”
“उंदीर ओंगळ आहे. त्याच्यावर तुम्हीच शोभता.”
“म्हणजे मी ओंगळ वाटते?”
“ओंगळ नाही तर काय” नीटनेटके राहताच येत नाही. अघळपघळ सारे काम. उगीच का तो चंद्र मागे हसला?”
“चंद्र हसला म्हणून तूही हसतेस वाटते? केलेत कशाला लग्न?”
“विद्या आहे तुमच्याजवळ म्हणून! मी बाकीचे तुमचे स्वरूप विसरून जाते व केवळ ज्ञानमय असे जे मंगल स्वरूप, त्याच्याकडे बघत राहते.”
“मग कशावर बसून जातेस?”
“मोरावर. हातात विणा घेईन व मोरावर बसेन.”
“मोरावर तू किती छान दिसतेस! त्या मोराच्या पिसा-यात जसे हजारो डोळे असतेत. तसे हजारो डोळे मला फुटावेत व त्यांनी तुझ्याकडे पाहत राहावे असे वाटते. ते असू दे, ती प्रमेयरत्ने कानात घाल.”
सरस्वती मयूरावर बसून निघाली. वीणेच्या तारांचा झंकार झाला. गणपतीच्या अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहिले.
वैकुंठाला आज अपूर्व सोहळा. सर्वत्र सुगंध दरवळला होता. मंद शीतल वारा वाहत होता. सर्वत्र स्वच्छता व सौदर्य यांचे साम्राज्य होते. त्रिभुवनातील सारी संपत्ती तेथे एकवटली होती. मंगलवाद्ये वाजत होती. देवी लक्ष्मी सर्वांचे स्वागत करीत होती. त्या अपूर्व प्रासादात निरनिराळ्या रंगांच्या फुलांची आसने बसण्यासाठी मांडण्यात आली होती. इंद्राणी शेवंतीच्या आसनावर बसली. सावित्री जाईजुईच्या आसनावर बसली. देवी सरस्वती दूर्वादलांनी वेष्टित अशा जपाकुसुमांच्या आसनावर बसली. सर्वांना आसने मिळाली. चंद्राचा रमणीय प्रकाश सर्वत्र पसरला होता. सर्व देवांगनांचे डोळे तेथील सौदर्य व भाग्य पाहून दिपून गेले.