त्यागातील वैभव 20
“केसाच्या वजनाइतके?”
“इतके दागिने अंगावर घालवतील का?”
“पार्वतीदेवी वाकून जातील इतक्या दागिन्यांच्या राशीखाली.”
“पार्वतीच्या त्या कन्या आहेत. त्या वाकणार नाहीत.”
“बोलवा कुबेराला येथे तराजू घेऊन.” लक्ष्मी म्हणाली.
कुबेर तराजू घेऊन आला. तो गुंजा दोन गुंजा सोने घेऊन आला. सा-या हसू लागल्या. फक्त सरस्वती व पार्वती हसत नव्हत्या. कुबेराने अका पारड्यात तो केस ठेवला. दुस-या पारड्यात एक गुंजभर सोने टाकले; परंतु केसाचे पारडे खालीच होते. त्याने आणखी एक गुंजभर सोने टाकले. तरी केसाचे पारडे खालीच. मग दोन मासे टाकले, तोळाभर टाकले. तरी केसाचे पारडे वर उठेना. पाच तोळे, दहा तोळे, शंभर तोळे सोने घातले गेले. तरी केसाचे पारडे खाली.
कुबेराने आता मोठा तराजू आणला. त्यात तो भराभर आपली संपत्ती ओतीत होता. सर्व संपत्ती संपली, तरी त्या गुंतवळाचे वजन होईना. देवांगनांची तोंडे काळवंडली. त्यांच्या नागिणीप्रमाणे वळवळ करणा-या जिभा लुळ्या पडल्या. लक्ष्मीने आपल्या माहेरची सर्व संपत्ती त्या पारड्यात घातली. तरी काही नाही. सर्व देवांगनांनी, अप्सरांनी आपले अलंकार त्या पारड्यात घातले, तरी त्या केसाची बरोबरी होईना. कुबेर तोल करून करून थकला. शेवटी तो म्हणाला, “या केसांच्या भारंभार माझ्याजवळ सोने नाही. मी भिकारी आहे. दुसरा कोणी मोठा कुबेर असेल, तर त्याच्याकडे हा केस घेऊन जा.”
सती पार्वतीचे मुख तेजाने फुलले. सरस्वती आनंदली. लक्ष्मी, इंद्रणी आदीकरून सर्व देवांगना खट्टू झाल्या. आपले भाग्य मिरवण्याचा लक्ष्मीचा गर्व गळाला. सर्व देवांगनांचा गर्व नाहीसा झाला. त्या सर्वजणी सता पार्वतीच्या पाया पडल्या व म्हणाल्या, “हे सती पार्वती, हे जगदंबे, आम्ही अज्ञ मुली. आम्हाला क्षमा कर. तुझ्या पतीची तपश्चर्या थोर, त्याग अपार, वैराग्य अनंत. ते दिसतात भिकारी, परंतु सर्वांहून ते श्रीमंत आहेत.