त्यागातील वैभव 16
“मला वाटले नव्हते की येथे अलंकारांचे प्रदर्शन आहे. मला वाटले की, सर्व देवांगना प्रेमाने परस्परांस भेटण्यासाठी जमणार आहेत, म्हणून मी आले. म्हणून मी पतिदेवांजवळ काही मागितलं नाही.” पार्वती म्हणाली.
“आणि मागितले असते तरी काय मिळाले असते?” उर्वशी म्हणाली.
“नवरा तर जोगडा! हातात कपालपात्र मिरविणारा.”
“आणि माहेरी बापाजवळ दगड नि धोंडे!”
“जंगलेही आहेत. झाडांच्या साली नेसाव्यात व पानांनी नटावे.”
“का अशा हसता” जगाच्या कल्याणासाठी हसत हलाहल प्राशन करणा-या शंकरांना का हसता? त्यांच्या अंगाला विभूती असेल; परंतु त्या विभूतीच्या एकेका कणात सर्व विश्वाची संपत्ती आहे.” सरस्वती म्हणाली.
“हे खरे असेल तर जा, घेऊन ये संपत्ती.” सर्व देवांगना म्हणाल्या.
“जाते, घेऊन येते. मी येईपर्यंत थांबा मात्र!” सरस्वती म्हणाली.
सती पार्वतीच्या डोळ्यांतून पाणी येत होते. तीच परत जायला निघाली; परंतु सरस्वती म्हणाली, “तुम्हा थांबा. मी जाऊन येते. या सर्व देवांगनांचा गर्व आज दूर होऊ दे. त्यागातील वैभव त्यांना दिसू दे. त्यांचे डोळे केवळ बहिर्मुख झाले आहेत. ते अंतर्मुख होऊ देत. बसा तुम्ही या आसनावर. मी आता जाऊन येते.”
“सरस्वती, हंसावर बसून जा, म्हणजे लवकर येशील. पायी जाऊन केव्हा येणार? शिवाय या कैलासाची वाट दगडाळ व धोंडाळ. मी सावित्रीदेवीस विचारते!” लक्ष्मी म्हणाली.
“नाहीतर आमच्या ऐरावतावर बसून जा.” इंद्राणी म्हणाली.