भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 4
हीं नऊ अंगें अस्तित्वांत येण्यापूर्वी सुत्त आणि गेय्य ह्या दोनच अंगांत बाकीच्या अंगांचा समावेश करण्यांत येत होता असें महासुञ्ञतासुत्तांतील खालील मजकुरावरून दिसून येतेंः- बुद्ध भगवान आनंदाला म्हणतो, ''न खो आनन्द अरहति सावको सत्थारं अनुबन्धितुं यदिदं सुत्तं गेय्यं वेय्याकरणस्स हेतु । तं किस्स हेतु । दीघरत्तं हि वो आनन्द धम्मा सुता धाता वचसा परिचिता...'' ('हे आनन्द, सुत्त आणि गेय्य यांच्या वेय्याकरणासाठी (स्पष्टीकरणासाठी) श्रावकाने शास्त्या (गुरूच्या) बरोबर फिरणें योग्य नाहीं. कां की, तुम्ही या गोष्टी ऐकल्याच आहेत; आणि तुम्हांला त्या परिचित आहेत.') म्हणजे सुत्त आणि गेय्य एवढ्यांतच बुद्धोपदेश होता आणि वेय्याकरण किंवा स्पष्टीकरण श्रावकांवर सोपविण्यांत आलें होतें. होतां होतां त्यांत आणखी सहा अंगांची भर पडली, आणि पुढे त्यांतील कांही अंगांची भेसळ करून सध्याचीं बरींच सुत्तें बनविण्यांत आली. त्यांत बुद्धाचा खरा उपदेश कोणता व बनावट कोणता हें सांगणें जरी कठीण जातें, तरी अशोकाच्या भाब्रा किंवा भाब्रू शिलालेखाच्या आधारें पिटकांतील प्राचीन भाग कोणते असावेत याचें अनुमान करतां येणें शक्य आहे.
अशोकाच्या भाब्रू शिलालेखांत खालील सात बुद्धोपदेश भिक्षूंनी, भिक्षुणींनी, उपासकांनी आणि उपासिकांनी वारंवार ऐकावे व पाठ करावे अशी सूचना केली आहे. ते उपदेश असे ः-
(१) विनयसमुकसे, (२) अलियवसानि, (३) अनागतभयानि, (४) मुनिगाथा, (५) मोनेयसूते, (६) उपतिसपसिने, (७) लाघुलोवादे मुसावादं अधिगिच्य भगवता बुद्धेन भासिते.
या सातांपैकी नंबर ७ मज्झिमनिकायांतील राहुलोवाद सुत्त (नं. ६१) आहे असें ओल्डेनबर्ग आणि सेनार या दोन पाश्चात्य विद्वानांनी दाखवून दिलें. बाकीच्यांची माहिती देण्याचा प्रयत्न प्रो. र्हिस डेविड्स यांनी केला. पण सुत्तनिपातांतील मुनिसुत्त याच्याशिवाय त्यांनी जीं दुसरी सुत्तें दर्शविलीं ती सर्व चुकीचीं होतीं. नंबर २, ३, ५ आणि ६ हीं चार सुत्तें कोणतीं असावींत याचा ऊहापोह मी १९१२ सालच्या फेब्रुवारीच्या 'इंडियन ऍंटिक्वेरी' च्या अंकांत केला आहे. त्यांत दर्शविलेलीं सुत्तें आता सर्वत्र ग्राह्य झालीं आहेत. फक्त पहिल्या सुत्ताचा मला त्या वेळीं थांग लागला नव्हता. 'विनयसमुकसे (विनयसमुत्कर्ष) याचा विनयग्रंथाशीं कांही तरी संबंध असला पाहिजे असें वाटलें आणि तशा तर्हेचा उपदेशा कोठेच न सापडल्यामुळें तें सूत्र कोणतें हें मला सांगतां आलें नाही.
परंतु विनयशब्दाचा अर्थ विनयग्रंथ करण्याचें कांही कारण नाही. 'अहं खो केसि पुरिसदम्मं सण्हेन पि विनेमि फरुसेन पि विनेमि ।' (अंगुत्तर चतुक्कनिपात, सुत्त नं. १११); 'तमेनं तथागतो उत्तरिं विनेति ।' (मज्झिम, सुत्त नं. १०७) 'यन्नूनाहं राहुलं उत्तरिं आसवानं खये विनेय्यं ति ।' (मज्झिम, सुत्त नं. १४७). इत्यादि ठिकाणीं विपूर्वक नी धातूचा अर्थ शिकविणें असा आहे; आणि त्याच्यावरूनच नंतर विनयाच्या नियमांना विनयपिटक म्हणण्यांत येऊं लागलें. बुद्धानें ज्या वेळीं भिक्षु गोळा करण्यास आरंभ केला, त्या वेळीं विनयग्रंथाचें अस्तित्व मुळीच नव्हतें. जी कांहीं शिकवणूक होती ती सुत्ताच्या रूपानेच. पहिल्याप्रथम पञ्चवर्गीय भिक्षूंना बुद्धाने आपले शिष्य केले ते 'धम्मचक्क-पवत्तन-सुत्त' उपदेशून. तेव्हा विनय शब्दाचा मूळचा अर्थ शिकवणूक असाच घेतला पाहिजे, आणि त्या विनयाचा समुत्कर्ष म्हणजे बुद्धाचा उत्कृष्ट धर्मोपदेश. 'समुक्कंस' हा शब्द जरी पालि वाङ्मयांत बुद्धोपदेशवाचक आढळत नाही, तथापि 'सामुक्कंसिका धम्मदेसना' हें वाक्य अनेक ठिकाणीं सापडतें. उदाहरणार्थ, दीघनिकायांतील अम्बट्ठसुत्ताच्या शेवटीं आलेला हा मजकूर पाहा, -- ''यदा भगवा अञ्ञासि ब्राह्मणं पोक्खरसातिं कल्लचित्तं मुदुचित्तं विनीवरणाचित्तं उद्ग्गचित्तं पसन्नचित्तं, अथा या बुद्धानं सामुक्कंसिका धम्मदेसना तं पकासेसि दुक्खं समुदयं निरोधं मग्गं ।'' ('जेव्हा भगवंताने जाणलें की पौष्करसादि ब्राह्मणाचें चित्त प्रसंगाला उचित, मृदु, आवरणांपासून विमुक्त, उदग्र आणि प्रसन्न झालें आहे, तेव्हा बुद्धाची जी सामुत्कर्षिक धर्मदेशना ती त्याने प्रगट केली. ती कोणती ? तर दुःख, दुःखसमुदय, दुःखनिरोध आणि दुःखनिरोधाचा मार्ग.')