Get it on Google Play
Download on the App Store

तपश्चर्या व तत्वबोध 1

तपश्चर्या व तत्वबोध

प्रकरण पांचवें

आळार कालामाची भेट

घर सोडून बोधिसत्त्व थेट राजगृहाला गेला, तेथे त्याची व बिंबिसार राजाची भेट झाली, आणि तद्‍नंतर तो आळार कालामाकडे जाऊन त्याचें तत्त्वज्ञान शिकला, अशा अर्थाचें वर्णन जातकाच्या निदानकथेंत सापडतें.  अश्वघोषकृत बुद्धचरितकाव्यांत निदानकथेचाच क्रम स्वीकारला आहे.  ललितविस्तरांत 'बोधिसत्त्व प्रथम वैशालीला गेला, व तेथे आडार कालामाचा शिष्य झाला, आणि नंतर राजगृहाला गेला, तेथे बिंबिसार राजाने त्याची भेट घेतल्यावर तो उद्रक रामपुत्रापाशीं गेला,' अशा प्रकारचें सविस्तर वर्णन आहे.  पण हीं दोन्ही वर्णनें प्राचीन सुत्तांशीं जुळत नाहीत.  वर दिलेल्या आर्यपरियेसन सुत्ताच्या उतार्‍यांत बोधिसत्त्वाने घरीं असतांनाच आईबापांसमक्ष प्रव्रज्या घेतली असें म्हटलें आहे.  त्यानंतर ताबडतोब हा मजकूर आढळतो ः-

सो एवं पब्बजितो समानो किंकुसलगवेसी अनुत्तरं सन्तिवरपदं परियेसमानो येन आळारो कालामो तेनुपसंकमिं ।

(भगवान् म्हणतो,) ''याप्रमाणे प्रव्रज्या घेतल्यावर हितकर मार्ग कोणता हें जाणण्याच्या उद्देशाने श्रेष्ठ, लोकोत्तर, शान्त तत्त्वाचा शोध करीत मी आळार कालामापाशीं गेलों.''

या उतार्‍यावरून असें दिसून येतें की, बोधिसत्त्व राजगृहाला न जातां प्रथमतः आळार कालामापाशीं गेला.  आळार कालाम कोसल देशाचाच रहिवाशी होता.  अंगुत्तरनिकायाच्या तिकनिपातांत (सुत्त नं. ६५) कालाम नांवाच्या क्षत्रियांच्या केसपुत्त शहराचा उल्लेख आला आहे.  त्यावरून असें दिसतें की, त्याच कालामांपैकी आळार कालाम हा एक होता.  शाक्य आणि कोलिय राज्यांत त्याची बरीच ख्याति होती.  त्याच्या एका शिष्याचा-भरण्डु कालामाचा- आश्रम कपिलवस्तूला होता, हें वर सांगितलेंच आहे.  दुसरे त्याचे किंवा फार झालें तर उद्दक रामपुत्ताचे शिष्य जवळच्या कोलियांच्या देशांत राहत असत; आणि या संप्रदायांचें प्रस्थ शाक्य आणि कोलिय देशांत बरेंच होतें, यांत शंका नाही.  बोधिसत्त्व प्रथमध्यानाची पद्धति ह्याच परिव्राजकांकडून शिकला, आणि त्यांनीच त्याला संन्यासदीक्षा दिली असली पाहिजे.

परंतु शाक्य किंवा कोलिय देशांतील एखाद्या आश्रमांत राहून काल कंठणें बोधिसत्त्वाला  योग्य वाटलें नाही.  हितकर मार्गाचा आणि श्रेष्ठ, लोकोत्तर, शान्त तत्त्वाचा बोध करून घेण्यासाठी त्याने खुद्द आळार कालामाची भेट घेतली.  त्या वेळीं आळार कालाम कोठे तरी कोसल देशांत राहत असावा.  त्याने बोधिसत्त्वाला चार ध्यानें व त्यांच्यावरच्या तीन पायर्‍या शिकविल्या.  पण केवळ या समाधीच्या सात पायर्‍यांनी त्याचें समाधान झालें नाही.  हा मनोनिग्रहाचा मार्ग होता खरा, पण सर्व मनुष्यजातीला त्याचा उपयोग काय ?  याचसाठी हितकर मार्गाचा शोध बोधिसत्त्वाने पुढे चालविला.

उद्दक रामपुत्ताची भेट

आळार कालाम आणि उद्दक रामपुत्त हे दोघेही एकच समाधिमार्ग शिकवीत होते.  त्यांच्यांत एवढाच फरक होता की, आळार कालाम समाधीच्या सात पायर्‍या व उद्दक रामपुत्त आठ पायर्‍या शिकवीत असे.  या दोघांचा कोणी तरी एकच गुरु असावा, आणि नंतर त्यांनी हे दोन पंथ काढले असावेत.  आळार कालामाला सोडून बोधिसत्त्व उद्दकापाशीं गेला.  पण त्याच्याही मार्गांत त्याला विशेष तथ्य दिसलें नाही.  तेव्हा राजगृहाला जाऊन तेथील प्रसिद्ध श्रमणपंथांचें तत्त्वज्ञान जाणून घेण्याचा त्याने निश्चय केला.

भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

धर्मानंद कोसंबी
Chapters
भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 1 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 2 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 3 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 4 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 5 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 6 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 7 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 8 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 9 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 10 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 11 आर्यांचा जय 1 आर्यांचा जय 2 आर्यांचा जय 3 आर्यांचा जय 4 आर्यांचा जय 5 समकालीन राजकीय परिस्थिति 1 समकालीन राजकीय परिस्थिति 2 समकालीन राजकीय परिस्थिति 3 समकालीन राजकीय परिस्थिति 4 समकालीन राजकीय परिस्थिति 5 समकालीन राजकीय परिस्थिति 6 समकालीन राजकीय परिस्थिति 7 समकालीन राजकीय परिस्थिति 8 समकालीन राजकीय परिस्थिति 9 समकालीन राजकीय परिस्थिति 10 समकालीन राजकीय परिस्थिति 11 समकालीन राजकीय परिस्थिति 12 समकालीन राजकीय परिस्थिति 13 समकालीन धर्मिक परिस्थिति 1 समकालीन धर्मिक परिस्थिति 2 समकालीन धर्मिक परिस्थिति 3 समकालीन धर्मिक परिस्थिति 4 समकालीन धर्मिक परिस्थिति 5 समकालीन धर्मिक परिस्थिति 6 समकालीन धर्मिक परिस्थिति 7 समकालीन धर्मिक परिस्थिति 8 समकालीन धर्मिक परिस्थिति 9 समकालीन धर्मिक परिस्थिति 10 समकालीन धर्मिक परिस्थिति 11 समकालीन धर्मिक परिस्थिति 12 समकालीन धर्मिक परिस्थिति 13 समकालीन धर्मिक परिस्थिति 14 गोतम बोधिसत्त्व 1 गोतम बोधिसत्त्व 2 गोतम बोधिसत्त्व 3 गोतम बोधिसत्त्व 4 गोतम बोधिसत्त्व 5 गोतम बोधिसत्त्व 6 गोतम बोधिसत्त्व 7 गोतम बोधिसत्त्व 8 गोतम बोधिसत्त्व 9 गोतम बोधिसत्त्व 10 गोतम बोधिसत्त्व 11 गोतम बोधिसत्त्व 12 गोतम बोधिसत्त्व 13 गोतम बोधिसत्त्व 14 तपश्चर्या व तत्वबोध 1 तपश्चर्या व तत्वबोध 2 तपश्चर्या व तत्वबोध 3 तपश्चर्या व तत्वबोध 4 तपश्चर्या व तत्वबोध 5 तपश्चर्या व तत्वबोध 6 तपश्चर्या व तत्वबोध 7 तपश्चर्या व तत्वबोध 8 तपश्चर्या व तत्वबोध 9 तपश्चर्या व तत्वबोध 10 तपश्चर्या व तत्वबोध 11 तपश्चर्या व तत्वबोध 12 तपश्चर्या व तत्वबोध 13 तपश्चर्या व तत्वबोध 14 तपश्चर्या व तत्वबोध 15 श्रावकसंघ 1 श्रावकसंघ 2 श्रावकसंघ 3 श्रावकसंघ 4 श्रावकसंघ 5 श्रावकसंघ 6 श्रावकसंघ 7 श्रावकसंघ 8 श्रावकसंघ 9 श्रावकसंघ 10 श्रावकसंघ 11 श्रावकसंघ 12 श्रावकसंघ 13 श्रावकसंघ 14 श्रावकसंघ 15 श्रावकसंघ 16