समकालीन राजकीय परिस्थिति 2
बिंबिसार राजाचा मुलगा अजातशत्रु आपल्या अमात्यांसह पौर्णिमेच्या रात्रीं प्रासादाच्या गच्चीवर बसला आहे. त्या वेळीं त्याला कोणातरी एखाद्या मोठ्या श्रमणनायकाची भेट घ्यावी अशी इच्छा होते. तेव्हा त्याच्या अमात्यांपैकी प्रत्येक जण एकेका श्रमणसंघाच्या नायकाची स्तुति करतो व राजाला त्याच्याजवळ जाण्यास विनवितो. त्याचा गृहवैद्य मुकाट्याने बसला होता. त्याला अजातशत्रु प्रश्न करतो; तेव्हा जीवक बुद्ध भगवंताची स्तुति करून त्याची भेट घेण्यास राजाचें मन वळवितो. आणि जरी या श्रमणसंघांच्या पुढार्यांत बुद्ध वयाने लहान होता, आणि त्याचा संघ नुकताच स्थापन झाला होता, तरी त्याचीच भेट घ्यावी असें अजातशत्रु ठरवतो, आणि सहपरिवार बुद्धाच्या दर्शनासाठी जीवकाच्या आम्रवनांत जातो.
अजातशत्रूने आपल्या बापाला कैद करून ठार केलें व गादी बळकावली. तथापि बापाने जो श्रमणांचा आदर ठेवला होता, तो त्याने कमी पडूं दिला नाही. बिंबिसार राजाच्या मरणानंतर बुद्ध भगवान क्वचितच राजगृहाला येत असे. त्यांपैकी वर सांगितलेला एक प्रसंग होता. गादी मिळण्यापूर्वी अजातशत्रूला आपल्या बाजूला वळवून देवदत्ताने बुद्धावर नालगिरि नांवाचा उन्मत्त हत्ती सोडण्याचा कट केला होता, इत्यादि गोष्टी विनयपिटकांत वर्णिल्या आहेत. त्यांत कितपत तथ्य असावें हें सांगतां येत नाही. तथापि एक गोष्ट खरी की, अजातशत्रूचा देवदत्ताला चांगलाच पाठिंबा होता. आणि त्यामुळेच बुद्ध भगवान राजगृहापासून दूर राहत असावा. पण जेव्हा तो राजगृहाला आला तेव्हा त्याची भेट घेण्याला अजातशत्रु कचरला नाही. आणि त्याच वेळीं राजगृहाच्या आजूबाजूला मोठमोठाल्या श्रमणसंघांचे सहा नेते राहत असत, ही गोष्ट लक्षांत घेतली म्हणजे अजातशत्रू आपल्या बापापेक्षा देखील श्रमणाचा आदर विशेष ठेवीत होता, असें स्पष्ट दिसून येतें. किंबहुना त्याच्या कारकीर्दीत मगध देशांतील यज्ञयाग नष्टप्राय होत चालले, आणि श्रमणसंघांची भरभराट होत गेली.
मगधांची राजधानी राजगृह. ही जागा बिहार प्रांतांत तिलय्या नांवाच्या स्टेशनापासून सोळा मैलांवर आहे. चारी बाजूंना डोंगर असून त्याच्या मध्यभागीं हें शहर वसलें होतें. शहरांत जाण्याला डोंगराच्या खिंडींतून दोनच रस्ते असल्यामुळे शत्रूपासून शहराचें रक्षण करणें सोपें काम वाटल्यावरून येथे हें शहर बांधण्यांत आलें असावें. पण अजातशत्रूचें सामर्थ्य इतकें वाढत गेलें की, त्याला आपल्या रक्षणासाठी या डोंगरांतील गोठ्यांत (गिरिव्रजांत) राहण्याची गरज वाटली नाही. बुद्धाच्या परिनिर्वाणापूर्वी तो पाटलिपुत्र येथे एक नवीन शहर बांधीत होता; आणि पुढे त्याने आपली राजधानी त्याच ठिकाणीं नेली असावी.
अजातशत्रूला वैदेहीपुत्र म्हटलें आहे. यावरून त्याची आई विदेह राष्ट्रांतील असावी असें सकृद्दर्शनीं दिसून येतें. आणि जैनांच्या 'आचारांग' सूत्रादिकांतही त्याची आई वज्जी राजांपैकी एका राजाची कन्या होती असा उल्लेख आढळतो. परंतु कोसलसंयुत्ताच्या दुसर्या वग्गाच्या चौथ्या सुत्ताच्या अट्ठकथेंत त्याला पसेनदीचा भाचा म्हटलें आहे, आणि वैदेही शब्दाचा अर्थ 'पंडिताधिवचनमेतं, पंडितित्थिया पुत्तो ति अत्थो' असा केला आहे. ललितविस्तरांत मगध देशाच्या राजकुलाला वैदेहीकुल हीच संज्ञा दिली आहे. यावरून असें दिसतें की, हें कुल पितपरंपरेने अप्रसिद्ध होतें. आणि पुढे त्यांतील एखाद्या राजाचा विदेह देशांतील राजकन्येशीं संबंध जडल्यामुळे तें नांवारूपास आलें; आणि कांही राजपुत्र आपणास वैदेहीपुत्र म्हणवून घेऊं लागले.
अजातशत्रूने बिंबिसाराला ठार मारल्याची बातमी ऐकली तेव्हा अवंतीचा चंडप्रद्योत राजा फार रागावला व अजातशत्रूवर स्वारी करण्याचा त्याने घाट घातला. त्याच्या भयाने अजातशत्रूने राजगृहाच्या तटाची डागडुजी केली.* पुढे चंडप्रद्योताच्या स्वारीचा बेत रहित झाला असावा. चंडप्रद्योतासारखा परकीय राजा अजातशत्रूवर रागावला, पण मगधांतील प्रजेचा प्रक्षोभ मुळीच झाला नाही. यावरून या देशांत एकसत्ताक राज्यपद्धति कशी दृढमूल झाली होती, याचें चांगलें अनुमान करतां येतें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* मज्झिमनिकायांतील गोपकमोग्गल्लानसुत्ताची अट्ठकथा पाहा.