समकालीन धर्मिक परिस्थिति 14
बालविवाहाची प्रथा
या गोष्टीचा परिणाम बौद्ध राजांवर तरी चांगलाच झाला असला पाहिजे. पण त्यामुळे दुसरीच एक वाईट चाल निघाली असावी. ब्रह्मदेशांतील राजे विवाहित स्त्रीला आपल्या झनानखान्यांत ठेवीत नसत; जरी विवाहित स्त्रीच्या पतीने आपल्या बायकोशीं काडीमोड करून तिला राजाच्या हवालीं करण्याचें कबूल केलें, तरी हा मोठा अधर्म समजत असत. पण अविवाहित स्त्रीला तिच्या आईबापांच्या संमतीशिवाय खुशाल उचलून घेऊन जात. राजा आपल्या मुलीला जबरदस्तीने नेईल या भयाने आईबाप मुलींचे लग्न लहानपणींच करून त्यांच्या गळ्यांत मंगळसूत्र बांधीत. ही लग्नें साफ खोटीं असत. मुली नवर्याच्या घरीं जात नसत, एवढेंच नव्हे, तर पहिला नवरा सोडून वाटेल त्या नवर्याशीं लग्न लावण्यास त्यांना पूर्ण मूभा असे. केवळ राजांच्या जुलमापासून मुलींचे रक्षण करण्याचा हा उपाय होता. हिंदुस्थानांत बालविवाहाची दृढमूल झालेली चाल अशाच परिस्थितींतून निघाली की काय हें सांगतां येणे शक्य नाही. पण ही चाल बुद्धसमकालीं सार्वत्रिक झाली नव्हती आणि एकसत्ताक राज्यपद्धति बळकट झाल्यावर ती धार्मिक होऊन बसली, याबद्दल शंका नाही. हिंदुस्थानांत गणसत्ताक राज्यपद्धतीचा विकास झाला असता, तर बालविवाहाला मुळीच थारा मिळाला नसतो, हें सांगावयालाच नको.
चार प्रकारचे श्रमणब्राह्मण
बुद्धकालापर्यंत चार प्रकारचे श्रमणब्राह्मण झाले, याच्यावर एक रूपक व त्याचें स्पष्टीकरण मज्झिमनिकायांतील निवापसुत्तांत सापडतें. त्याचा सारांश असा :-
बुद्ध भगवान् श्रावस्ती येथे अनाथपिंडिकाच्या आरामांत राहत असतां भिक्षूंना उद्देशून म्हणाला, ''भिक्षुहो, कुरण लावणारा मनुष्य तें मृगांच्या कल्याणासाठी लावीत नसतो. या कुरणांतील गवत खाऊन मृग प्रमत्त व्हावेत व सर्वस्वीं आपल्या ताब्यांत यावेत, असा त्याचा हेतु असतो.
''(१) भिक्षुहो, अशा एका कुरणामध्ये मृग शिरले आणि ते यथास्थित गवत खाऊन प्रमत्त झाल्यामुळे त्या कुरण लावणार्या मनुष्याच्या ताब्यांत गेले. (२) तें पाहून दुसर्या कांही मृगांनी असा विचार केला की, या कुरणांत शिरणें अतिशय अनिष्ट आहे. तें कुरण सोडून देऊन ते ओसाड अरण्यांत गेले. उन्हाळ्याचे दिवस आल्यावर तेथे त्यांना चारापाणी मिळेनासें झालें. आणि त्यामुळे त्यांच्या शरीरांत बळ राहिलें नाही. उदरपीडेने त्रस्त होऊन ते त्या कुरणांत शिरले आणि प्रमत्तपणें चारापाण्याचा उपभोग घेऊं लागल्यामुळे त्या मनुष्याच्या ताब्यांत गेले. (३) तिसर्या कांही मृगांनी हे दोन्ही मार्ग सोडून देऊन कुरणाच्या जवळच्या जंगलाचा आश्रय धरला व मोठ्या सावधगिरीने ते कुरणांतील गवत खाऊं लागले. बराच काळपर्यंत कुरणाच्या मालकाला तें समजलें नाही. कांही काळाने त्याने त्या मृगांचें आश्रयस्थान शोधून काढलें आणि त्या जागेभोवती जाळीं पसरून त्या मृगांना हस्तगत केलें. (४) पण चौथे मृग फार हुशार होते. त्यांनी कुरणापासून दूर अंतरावर गहन अरण्यांत वस्ती केली; आणि तेथून ते कुरणांतील चारापाण्याचा सावधगिरीने उपभोग घेऊं लागले. त्यांच्या आश्रयस्थानाचा पत्ता कुरणाच्या मालकाला लागला नाही.
''भिक्षुहो, मी हें रूपक केलें आहे. कुरण लावणारा मनुष्य दुसरा कोणी नसून मार आहे. (१) ज्या श्रमणब्राह्मणांनी विषयसुखामध्येच आनंद मानला, ते पहिले मृग होय. (२) विषयसुखाच्या भयाने ज्यांनी अरण्यवास पत्करला आणि जे सर्व जगापासून वेगळे झाले, ते दुसरे मृग. (३) जे श्रमणब्राह्मण विषयांचा उपयोग मोठ्या सावधगिरीने घेऊन 'जग हें शाश्वत आहे की अशाश्वत आहे, आत्मा अमर आहे की नाशवंत आहे' इत्यादि प्रश्नांविषयीं वादविवाद करतात व आपला वेळ फुकट घालवतात, ते तिसरें मृग. (४) परंतु जे असल्या वादविवादांत न पडतां आपलें अंतःकरण निष्कलंक ठेवण्याविषयीं काळजी घेतात, ते चौथे मृग होत.''
या सुत्तांत सांगितलेले पहिले श्रमण ब्राह्मण म्हटले म्हणजे यज्ञयागांत व सोमरसपानांत धर्मसर्वस्व समजणारे वैदिक ब्राह्मण होत. वैदिक हिंसेला आणि सोमपानाला कंटाळून जे अरण्यांत शिरले, आणि तेथील कंदमूलांवर निर्वाह करूं लागले, ते ॠषिमुनि दुसर्या प्रकारचे श्रमण ब्राह्मण समजावेत. अरण्यांत फळेंमुळें मिळेनाशीं झालीं, किंवा खारट अगर आंबट पदार्थ खाण्याची इच्छा झाली, म्हणजे ते लोक गावांत येत आणि प्रपंचाच्या जाळ्यांत फसत. याचें एक उदाहरण वर (पृ. ५४-५५) दिलेंच आहे. ॠषिमुनींचा फळांमुळांवर निर्वाह करण्याचा मार्ग सोडून ज्यांनी भिन्न भिन्न श्रमणसंप्रदाय स्थापन केले, ते तिसर्या प्रकारचे श्रमणब्राह्मण होत. हे परिव्राजक गहन जंगलांत न जातां लोकवसतीच्या आश्रयाने रहात आणि लोकांकडून मिळालेल्या अन्नवस्त्राचा मोठ्या सावधगिरीने उपभोग घेत. पण ते 'आत्मा आहे किंवा नाही' इत्यादि वादांत गढून जात. त्यामुळे त्यांची आत्मशुद्धि न होतां ते माराच्या जाळ्यांत सापडतात. बुद्धाने हे सर्व निरर्थक वाद सोडून देऊन अध्यात्मशुद्धीचा मार्ग शोधून काढला. त्याच्या भिक्षूंची चौथ्या श्रमणब्राह्मणांत गणना केली आहे. इतर श्रमणब्राह्मणांच्या आणि बुद्धाच्या आत्मवादांत कसा फरक होता, याचें स्पष्टीकरण सातव्या प्रकरणांत करण्यांत येईल. येथे एवढेंच सांगावयाचें आहे की, या चार प्रकारच्या श्रमणब्राह्मणांत उपनिषदृषींचा मुळीच समावेश होत नाही; आणि यावरुन, उपनिषदांपासून बौद्धधर्म निघाला, ही कल्पना निराधार ठरते.