Get it on Google Play
Download on the App Store

"अंगकोर वाट‘ येथील विष्णुमंदिर

फुटबॉलची तब्बल अडीचशे मैदाने सहज मावतील, एवढे प्रचंड मोठे क्षेत्रफळ असलेले "अंगकोर वाट‘ येथील विष्णुमंदिर संपूर्णत: वैज्ञानिक दृष्टिकोनातून बांधण्यात आले आहे. जगभरातील पर्यटक या मंदिराचे स्थापत्यशास्त्र पाहून थक्क होतात! 

जगातील सर्वांत मोठी धार्मिक वस्तू आणि तेदेखील विष्णूचे मंदिर भारतात नव्हे; तर कंबोडिया देशात आहे, हे फारच थोड्या भारतीयांना माहीत असेल! बाराव्या शतकात सूर्यवर्मन (द्वितीय) राजाच्या कारकिर्दीत हे मंदिर बांधले गेले. वयाच्या पंधराव्या वर्षी सूर्यवर्मनचे राज्यारोहण झाल्यावर त्याने लगेचच या मंदिराचे बांधकाम सुरू केले. पुढच्या पस्तीस वर्षांत दिवाकर पंडित या स्थपतीने ते बांधून पूर्ण केले. दीड किलोमीटर लांब आणि सव्वा किलोमीटर रुंदीच्या चौरसात दोनशे मीटर रुंदीचा खंदक खणून त्याच्यामध्ये हे मंदिर बांधलेले आहे. हा खंदक पावसाच्या पाण्याने भरल्यामुळे मंदिर जणू तरंगते असल्याचा भास होतो. याच्या बाह्यभिंतींचा परीघ चार किलोमीटर आहे. फुटबॉलची तब्बल अडीचशे मैदाने सहज मावतील, एवढे त्याचे प्रचंड मोठे क्षेत्रफळ आहे! 


विष्णू हे दैवत "काळ‘ आणि "अवकाश‘ यांचे प्रतीक; म्हणूनच त्याच्या हातात चक्र आणि शंख ही आयुधे असतात. हे विष्णूमंदिर असल्यामुळे याची सर्व मापे "काळा‘च्या परिमाणात आहेत. प्रवेशासाठीचा खंदकावर असलेला पूल 432 हस्त लांब आहे. देवळाचा आतला परिसर 1296 हस्त म्हणजे याच्या तिपटीने मोठा आहे. एक हस्त म्हणजे एक हजार वर्षे! चार युगे ओलांडून आपण मंदिरात पोचतो. मुख्य मंदिर तीन आवरणात आहे. सर्वांत आतल्या आवरणाची लांबी-रुंदी सुमारे दोनशे फूट असून, ते शंभर फूट उंच आहे. त्याच्यावर मध्ये एक आणि भोवती चार शिखरांचे मुख्य मंदिर आहे. कळसाची उंची 220 फूट आहे. भोवतालच्या चार शिखरांचे मध्यबिंदू जोडल्यास त्याची लांबी 365.36 (वर्षाचे दिवस) हस्त एवढी होते. वर्षातील दोन्ही संपातांच्या दिवशी (म्हणजे जेव्हा दिवस-रात्र समान असतात) 21 मे आणि 23 सप्टेंबरला बरोबर मधल्या शिखराच्या मागून सूर्योदय होताना दिसतो. तसेच 21 जूनला म्हणजे वर्षातल्या सर्वांत मोठ्या दिवशी उत्तरेकडील आणि 21 डिसेंबरला म्हणजे वर्षातल्या सर्वांत छोट्या दिवशी दक्षिणेकडील छोट्या शिखरावर सूर्योदय होताना दिसतो. 

सूर्याचे हे अयन याच मंदिरातील पूर्वेकडच्या भिंतीवरील तीनशे फूट लांबीच्या एका विराट शिल्पपटावर अत्यंत कल्पकतेने रेखाटलेले आहे. समुद्रमंथनाचे हे शिल्प असून, यात एकीकडे नव्वद देव आणि दुसरीकडे नव्वद दानव कोरले आहेत. मध्यभागी कूर्मावर उभा असलेला विष्णू आहे. विष्णू हा देव आणि दानव या दोघांकडूनही असल्यामुळे त्याला दोनदा मोजावे लागते. विष्णूच्या डोक्‍यावर इंद्र कोरलेला आहे. त्यामुळे देव, दानव आणि विष्णू यांची बेरीज 182 होते. हे एका अयनाचे दिवस झाले. दोन अयन म्हणजे 364 दिवस आणि त्यात इंद्र धरला तर 365 दिवस होतात! दोन्ही संपातांच्या दिवशी सूर्य मध्यावरील विष्णूवर उगवतो,अन्‌ 21 जून व 21 डिसेंबरला अनुक्रमे पहिल्या देवावर आणि पहिल्या दानवावर उगवतो. याचा अर्थ असा, की कोणत्या देवावर अथवा दानवावर सूर्य उगवला आहे हे कळले, तर त्या वर्षाच्या कोणत्या महिन्याची कोणती तारीख आहे, हे नक्की सांगता येते! 

हिंदूंची "देव‘ ही संकल्पना मुळात वैज्ञानिक सिद्धांतांवर आधारित आहे. त्यामुळे त्या काळच्या शास्त्रज्ञांच्या निर्देशानुसार ही मंदिरे बांधली गेली. अंगकोर वाट येथील विष्णुमंदिर हिंदू देव आणि विज्ञान यांचा थेट पुरावा देणारे आहे. या मंदिराबद्दलची ही सर्व माहिती एलिनोर मनिका या अमेरिकन विदुषीने पंचवीस वर्षे अभ्यास करून नमूद केलेली आहे. कंबोडियातील या मंदिरांचे वैभव पाहण्यासाठी जगभरातून चाळीस लाख पर्यटक दरवर्षी येतात आणि अप्रतिम स्थापत्यशास्त्र पाहून थक्क होतात!

Source: eSakal