Get it on Google Play
Download on the App Store

स्वर्णलता मिश्रा

जेव्हा ती ३ वर्षांची होती, तेव्हा एका प्रवासाच्या वेळी घरापासून १०० मैल लांब असताना तिने वडिलांना अचानक "आपल्या" घराकडे गाडी वळवण्यास सांगितले. यानंतर काही दिवसातच तिला "कटनी" मधील आपल्या जन्माच्या सर्व गोष्टी आठवू लागल्या. तिने सांगितले की तिचे नाव बिया पाठक होतं आणि तिला २ मुलगे होते. तिने आपल्या घराबद्दलही सांगितले - ते पांढऱ्या रंगाचं घर होतं, त्याचे दरवाजे काळे होते, त्याच्या ४ खोल्या पक्क्या बांधून झाल्या होत्या पण बाकीचं बांधकाम व्हायचं होतं.

 

ज्हुर्कुटियाच्या एका भागात तिचं घर होतं. त्या घराच्या मागे एक मुलींची शाळा होती. स्वर्णलताने सांगितलं की तिचा मृत्यू घशाच्या दुखण्याने झाला होता आणि तिचा इलाज जबलपूरच्या डॉक्टर एस सी भाबरत यानी केला होता. स्वर्णलता जेव्हा १० वर्षांची झाली तेव्हा स्टीवेंसन चे सहकारी श्री. एच एन बनर्जी, वरील बाबींची चौकशी करण्यासाठी तिला भेटायला आले. त्यांनी तिच्या वडिलांच्या लिखित माहितीद्वारे सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना ते घर सापडलं. परंतु १९३९ मध्ये बियाचा मृत्यू झाल्यापासून आता ते खूप मोठं बनलं होतं. तिथे पाठक नावाचे एक समृद्ध व्यावसायिक कुटुंब राहत होतं. मुलींची शाळा घराच्या पाठीमागे थोड्याच अंतरावर होती. त्यांनी त्या परिवारासोबत चर्चा केली आणि सत्य समोर आलं. बियाचा मृत्यू १९३९ साली झाला होता आणि ती आपल्या मागे पती, २ छोटी मुलं आणि अनेक भावांडाना दुःखी करून निघून गेली होती.

 

१९५९ मधे बियाचे पती, मुलगा आणि मोठा भाऊ सत्य जाणून घेण्यासाठी, पूर्वकल्पना न देता स्वर्णलताला भेटायला गेले. स्वर्णलताने चटकन आपल्या भावाला ओळखून "बाबू" या टोपणनावाने हाक मारली. १० वर्षांच्या स्वर्णलताने एका खोलीत एक एक करून सर्व ओळखीच्या माणसाना ओळखले (त्यावेळी खोलीत काही अनोळखी देखिल होते). शेवटी ती बियाचे पती चिंतामणी पांडे याच्याजवळ गेली आणि त्यांना पाहून सलज्ज झाली. काही दिवसानंतर स्वर्णलताचे वडील तिला घेऊन कटनीला जिथे बिया राहत होती तिथे गेले. तिथे गेल्यावर तिने घरात झालेल्या बदलांची दखल घेतली. तिने घरातून वजा केलेला व्हरांडा आणि कडुनिम्बाच्या झाडाची आठवण काढली. तिने बियाची खोली ओळखली, जिथे बियाचा मृत्यू झाला होता. तसेच तिने बियाच्या सर्व नातेवाईकांनाहि बरोबर ओळखले.

पुढे स्वर्णलताने अनेक वेळा पाठक परिवाराला भेट दिली. तिचा त्या परिवाराशी आणि त्यातील सदस्यांशी नेहमीच स्नेह राहिला. त्या सर्वांनी तिला बियाचा पुनर्जन्म मानलं होतं. पाठक बंधू आणि स्वर्णलता रक्षाबंधनही साजरं करत असत. एकदा अशाच सणाच्या वेळी स्वर्णलता येऊ शकली नाही तेव्हा पाठक बंधू तिच्यावर नाराज झाले, त्यांना वाटत होतं की मिश्रा परिवारापेक्षा स्वर्णलतावर त्यांचा जास्त हक्क आहे. स्वर्णलताच्या वडिलांनीही मनोमन मान्य केल होत की त्यांची मुलगी बियाच आहे. स्वर्णलताचं लग्न ठरवताना त्यांनी पाठक बंधुंच मतही विचारात घेतलं.

 

नंतर बियाने बॉटनीमध्ये उच्च पदवी घेतली आणि तिचं लग्न झालं. ती सांगायची की जेव्हा तिला कटणीच्या आयुष्याची आठवण यायची तेव्हा इच्छा व्हायची की आपण बियाच्या आयुष्यात परत जावं. पण मिश्रा परिवारावरही तिचं अतूट प्रेम होतं. कटणीला नियमित भेटी देत असतानाच तिचं एका सुंदर तरुणीमध्ये रुपांतर झालं, अशा तरुणीमध्ये की जिला आपली पूर्ण हकीगत माहीत होती.