Get it on Google Play
Download on the App Store

प्रस्तावना

रॉबर्ट कानिगेल नावाच्या लेखकाने १९९१ साली लिहिलेल्या रामानुजमच्या चरित्रावर हा लेख आधारलेला आहे. भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजम याचे नाव सर्व भारतीयांना माहीत असते पण त्याचा काळ आता मागे पडल्यामुळे व गणित विषयातील त्याची असामान्य कामगिरी सामान्य सुशिक्षिताच्या परिचयाची नसल्यामुळे त्याच्याबद्दल आपणाला फारशी माहिती नसते. रामानुजमच्या मृत्यूनंतर ७० वर्षानी एका अमेरिकन अभ्यासकाला त्याचे विस्तृत चरित्र लिहावेसे वाटले यातच त्याची थोरवी उघड होते. त्याने हे चरित्र खूप संशोधन करून माहितीपूर्ण असे लिहिले आहेच पण त्याबरोबर त्याच्या गणिततील कामगिरीचाही चांगला परिचय करून दिला आहे हे विशेष. लेखकाने रामानुजम चा बालपणाचा व तारुण्याचा काल, तेव्हाचे भारताच्या दक्षिण भागातील शैक्षणिक व सामाजिक वातावरण, त्याचे केंब्रिजमधील आयुष्य, त्याची गणितातील अद्वितीय कामगिरी या सर्वांचे माहितीपूर्ण व वास्तव चित्रण केले आहे. रामानुजम् च्या गणितसंशोधनाने अभ्यासकांना घातलेली भुरळ त्यच्या पश्चातहि दीर्घकाळ टिकली व त्याचीं प्रमेये अभ्यासण्याचे काम विद्वानांना अनेक दशके पुरले! त्याच्या अल्प आयुष्यात चर्चिल्या गेलेल्या त्याच्या प्रमेयांपेक्षां कितीतरी अधिक फॉर्म्युले व इक्वेशने त्याने आयुष्याच्या अखेरच्या वर्षात लिहून ठेवली व तीं नंतर उजेडात आली! हे पुस्तक इतके विस्तृत व माहितीने परिपूर्ण आहे की त्याचा परामर्ष थोडक्यात घेता येणार नाही. रामानुजम च्या ऐन तारुण्यात झालेल्या निधनामुळे मात्र मन विषण्ण होते. रामानुजमवे जीवन व गणितातील थोर कार्य याचा अल्प परिचय या पुस्तकाच्या आधारे मी करून देणार आहे.