सोने परत आले 5
एक अनाथ स्त्री रस्त्यात मरून पडली आहे. ही तिची मुलगी. रांगत माझ्या झोपडीत आली. चला लवकर. डॉक्टर बोलवा. ती स्त्री जिवंत आहे की मेली ते पाहा. दया करा त्या अनाथ स्त्रीवर, ह्या मुलीच्या आईवर.” मनूबाबा सदगदित होऊन म्हणाला.
दिगंबररायांच्या अंगणात गर्दी जमली. शेजारीपाजारी जमले. संपतराय या चिमण्या मुलीकडे पाहात होता. ती मुलगी घ्यावी असे त्याला वाटले.
“ती स्त्री जिवंत असेल का?” त्याने घाबरत प्रश्न विचारला.
“जिवंतपणाची लक्षणं नाहीत. परंतु डॉक्टर बोलवा. प्रयत्न करून पाहा.” मनूबाबा म्हणाला.
शेवटी मंडळी निघाली. डॉक्टरांना बोलावणे गेले. डॉक्टर अजून अंथरुणातच होते. आता कशाला उजाडत त्रास द्यायला आले, असे त्यांना वाटले. बाहेर गारवा होता. त्यांना सुखनिद्रा, साखरझोप लागली होती. परंतु लोकांनी हाकारे करून त्यांची झोप मोडली. डॉक्टर आदळ-आपट करीत आले. तो समोर संपतराय दिसले!
“तुम्हीही आला आहात वाटतं? एवढ्या थंडीत तुम्ही कशाला बाहेर पडलात? तुम्ही श्रीमंत माणसं, सुकुमार माणसं. थंडी बाधायची. मी जातोच आता. पाहातो कोण पडलं आहे.” डॉक्टर म्हणाले.
“मीही येतो.” संपतराय म्हणाला.
“दयाळू आहात तुम्ही. तुमचं हृदय थोर आहे. आनाथासाठी कोण येणार धावत?” साळूबाई तेथे येऊन म्हणाली.
त्या अनाथ स्त्रीजवळ सारा गाव जमला. डॉक्टरांनी नाडी पाहिली... प्राण केव्हाच निघून गेले होते. अरेरे! त्या लहान मुलीला सोडून माता गेली. मुलगी जगात उघडी पडली.
“या मुलीचं आता कोण?” डॉक्टर म्हणाले.