सोनीचे लग्न 7
“काही तरी नाही. खर्या अर्थानं विचारीत आहे. मी एकाच गोष्टीला भितो. ती म्हणजे सोनी कोणाची कोण हे तुमच्या मनात येईल की काय? सोनी एका अनाथ स्त्रीची मुलगी, तिच्या आईबापांची माहिती नाही. असं तुमच्या मनात येईल का असं मला वाटे आणि म्हणून तुम्हाला विचारायला धजत नव्हतो. साळूबाई, तुमच्या मनात असं काही येणार नाही असं मला वाटतं. तुमचं मन मोठं आहे. तुमचं हृदय प्रेमळ आहे. तसं नसतं तर तुम्ही सोनीला कधी हात लावला नसता. तिचे केस विंचरले नसतेत, तिला न्हाऊमाखू घातलंत नसतं. तिला जेवायला बोलावलंत नसतं. आताच तुम्ही तिला तुमच्या घरी पाठवलंत. दूध उतर, भाकर्या झाक, चहा कर वगैरे सांगितलेत. तुम्ही सोनीला हीन समजत नसाल. परंतु साळूबाई, हे सारं करणं-सवरणं निराळं आणि प्रत्यक्ष उद्या सून म्हणून पत्करणं निराळं. कारण जग एखादे वेळेस नावं ठेवील. आप्तेष्ट नावं ठेवतील. सारं पाहावं लागतं. परंतु तुम्ही असल्या गोष्टींना महत्त्व देणार नाही असं मला वाटतं. सांगा, तुम्ही काय ते सांगा. रामू व सोनी यांचा जोडा अनुरूप आहे. त्यांचं परस्परांवर प्रेम आहे. त्यांचा संसार सुखाचा होईल आणि तुमच्यासारखी सासू मिळणं म्हणजे खरोखरच पुण्याई हवी. बोला. या म्हातार्याचं स्वप्न खरं करा. माझ्या मनात किती तरी दिवस खेळवलेले हे मनोरथ पुरे करा. तुमच्या हातात सारं आहे. रामूचे वडील केव्हाच तयार होतील. तुम्ही तयार झाल्यात म्हणजे सारं होईल. सांगा साळूबाई.”
“मनूबाबा, सोनीच्या जातकुळीचा प्रश्न माझ्या डोळ्यांसमोर कधीही आला नाही. जसा माझा रामू तशी ती. खरं सांगू का, माझ्यासुद्धा मनात किती तरी वर्षे हे स्वप्न आहे. पुढंमागं सोनीला सून करून घेऊ असं मी मनात म्हणे. त्या दोघांचं परस्परांवर प्रेम आहे हीही गोष्ट खरी. ती दोघं लहानपणी भातुकली खेळत. त्यांचा खेळ मी बघे व मनात म्हणे, आज लटोपटीचा संसार करीत आहेत. ती त्याला लटोपटीची भाकर वाढत आहे. परंतु सोनी एक दिवस रामूचा संसार करू लागेल व त्याला खरोखरीची भाकरी वाढील. मघा इथं मी आल्ये. सोनी रामूला वाढीत होती. ते पाहून माझ्या मनात किती कल्पना आल्या. मला जरा गहिवरून आलं होतं. जणू दोघांचं देवानं लग्नच लावलं असं वाटलं. परंतु मनाला मी आवरलं. मनूबाबा, मीच तुमच्याजवळ सोनीसाठी मागणी घालणार होत्ये. परंतु ज्या दिवशी तुमच्या मोहरांच्या पिशव्या परत मिळाल्या, त्या दिवशी मला एक प्रकारचं जरा वाईट वाटलं. म्हटलं, की मनूबाबा आता श्रीमंत झाले. सोनीचं लग्न आता थाटानं होईल. तिला मोठ्या घरी देतील. आता आपण कशी सोनीला मागणी घालायची? आपण गरीब. आपणास दागदागिने अंगावर घालता येणार नाहीत. उंची तलम लुगडी घेता येणार नाहीत. आमच्याकडे जाडेभरडे कपडे, भाजीभाकर खायला, गडीमाणसं तर कामाला मिळायची नाहीतच, उलट स्वत: गडीमाणसांप्रमाणं राबावं लागेल. कशी घालावी सोनीला मागणी? मी स्वत:वर रागावल्ये. आपल्या रामूला चांगली बायको मिळावी हा माझा स्वर्थ. सोनी सुस्थळी पडू दे. तिचे हात कशाला कामात राबायला हवेत? तिचे हात का आमच्या हातांसारखे राठ करायचे? तिनं का भांडी खरकटी करावी, धुणी धुवावी, घरं सारवावी? मनूबाबांना पैसे मिळाले. चांगलं झालं. सोनीचं नशीब थोर. त्याचा आनंद वाटण्याऐवजी मला जरा वाईट वाटलं. माझी मला लाज वाटली. पुन्हा असा स्वार्थी विचार मनात येऊ द्यायचा नाही, असं ठरविलं. मनूबाबा, खरोखरच का सोनी रामूला देऊ म्हणता?”