सोनी 2
मनूबाबा सोनीला पायांवर घेई. तिच्या अंगाला तेल लावी. हळद, दूध लावी. नंतर कढत पाण्याने तिला आंघोळ घाली. तिचे अंग नीट पुशी. मग तिला तो झोपवी. तो गोड ओव्या म्हणे. सुंदर अभंग म्हणे. एके दिवशी मनूबाबा सोनीला झोपवीत होते. अभंग म्हणत होते. इतक्यात साळूबाई तेथे आली. झोपडीच्या दारात उभी राहून ती ऐकत होती.
“तुम्हांला येतात वाटतं अभंग? किती गोड म्हणता!” तिने पुढे येऊन विचारले.
“मी सारं विसरून गेलो होतो. परंतु ही सोनी आली व माझी सारी स्मृतीही आली. लहानपणी माझ्या बहिणीला मी ओव्या म्हणत असे. माझी बहीण लहान असताना आईबाप मेले. माझ्या बहिणीला मीच वाढविलं. त्या वेळच्या ओव्या आता आठवतात.” मनूबाबा म्हणाला.
“निजली वाटतं?” साळूबाईने विचारले.
“निजली. अलीकडे ती एकसारखी बाहेर जाते. आणली आत तरी पुन्हा बाहेर जाते. मला भीती वाटते. तिला आता पाय फुटले आहेत. नजर चुकवते व जाते बाहेर. आई-गुरं जात असतात. शिंगंसुद्धा मारायची. मघा जरा रागं भरलो तर लगेच रडायला लागली. मग मी घट्ट पोटाशी धरली तेव्हा थांबली. जरा बोललेलं तिला सहन होत नाही.” मनूबाबा सांगत होता.
“परंतु थोडा धाक दाखवायलाच हवा. मारू बिरू नका. आमचा रामू लहान होता, तेव्हा असाच त्रास देई. एके दिवशी त्याला घरातील कोळसे ठेवायच्या खोलीत नेलं व म्हटलं, ‘ठेवू कोळशाच्या खोलीत, येतील उंदीर, मग चावतील. ठेवू कोळशाच्या खोलीत? नाही ना जाणार बाहेर? बाहेर गेलास तर या कोळशाच्या खोलीत ठेवीन. त्या दिवसापासून रामू बाहेर जाईनासा झाला. काही तरी असं करावं लागतं.” साळूबाई अनुभव सांगत होती.
मनूबाबा मागावर बसले होते. सोनी जवळच खेळत होती. सुताच्या गुंड्यांशी खेळत होती. परंतु तिकडे रस्त्यावरून एक बैलगाडी जात होती. सोनीने बैल पाहिले. ती दाराकडे वळली. ती घरातून बाहेर पडली. ती लांब गेली. मनूबाबांच्या एकदम लक्षात आले. सोनी कोठे आहे? ते इकडे तिकडे पाहू लागले. ते घाबरले. त्यांनी झोपडीच्या सभोवती पाहिले. त्यांचा जीव घाबरला. छाती धडधडू लागली. कोठे गेली सोनी? ‘सोने, सोने!’- ते हाका मारू लागले. सोनी ओ देईना, नाचत पुढे येईना. त्यांना झोपडीच्या उत्तर बाजूला असलेला तो खळगा आठवला. त्या खळग्याकडे तर नाही ना गेली? पडली तर नसेल तेथील चिखलात? ज्या दिवशी मनूबाबाचे सोने चोरीस गेले होते, त्या दिवशी बराच भरून गेला होता. गावातील पावसाचे सारे पाणी तेथे जाई. तेथे दलदली असे. मनूबाबांचे मन दचकले. ते धावपळ करीत होते. इतक्यात त्यांना सोनी दूर दिसली.