सोनी 10
“सोन्ये, आज सारं आठवतं आहे. सारं माझं व तुझं आयुष्य माझ्या डोळ्यांसमोर येत आहे. या रायगावात मी एकटा होतो. कधी हसलो नाही, कधी कोणाजवळ बोललो नाही. मी शुष्क होतो. सारं जीवन जणू पाषाणमय होतं. मी दिवसभर विणीत बसे. पैसे मिळत ते साठवीत असे. मोहरांच्या दोन पिशव्या भरल्या. त्या मोहरा म्हणजे माझं जीवन. परंतु त्या मोहरा चोरीस गेल्या आणि तू मला मिळालीस. एके दिवशी पहाटे तू माझ्या झोपडीत आलीस. तुझी आई झोपडीपासून काही अंतरावर मरून पडली होती. तुला मी माझी मानली. तुला वाढवलं. माझ्या जीवनात तू आनंद आणलास. पंधरा वर्ष माझी वाचा बंद होती. जीवनाचे सारे झरे बंद होते. परंतु मी हसू, खेळू लागलो. तू माझं जीवन कृतार्थ केलंस. कशासाठी जगावं ते मला कळू लागलं. सोन्ये, तुझ्यामुळं माझ्या जीवनात केवढी क्रांती झाली, हे तुला माहीत नाही. तू माझा उद्धार केलास. तुझे बोबडे बोल, तुझं हसणं, तुझं रडणं यांनी माझं वाळलेलं जीवन पुन्हा फुललं. आता तू मोठी झालीस. तुझ्या डोळ्यांसमोर नवीन क्षितिजं आता दिसत असतील. संसाराची नवीन स्वप्नं दिसत असतील. सोन्ये, जा, योग्य अशी कोणासह संसार करायला जा. मी पुन्हा एकटा राहीन, पूर्वी एकटा होतो, पुन्हा एकटा माझा प्राण व मी. माझ्यासाठी तुझा कोंडमारा नको, सोन्ये.”
म्हातार्याला बोलवेना. घळघळ अश्रू पुन्हा वाहू लागले.
“बाबा, नका रडू. तुमचं माझ्यावर किती प्रेम. तळहाताच्या फोडाप्रमाणं तुम्ही मला वाढवलंत. मला कोण होतं जगात. या लहानशा मुलीचे तुम्ही आईबाप झालांत. आता तुमच्या हातांनी योग्य पती द्या. रामू चांगला आहे. आणि बाबा, तुम्हांला काही सोडून नाही मी जाणार. आपण सारी एकत्र राहू. रामू व मी काम करू. तुम्ही विश्रांती घ्यायची. तुमचा आशीर्वाद आम्हांला मिळायचा. खरं बाबा? तुम्हांला सोडून मी कशी जाईन? आपण एकत्र राहू.”
“राहू. एकत्र राहू.”
सोनीने मनूबाबांचा हात धरला. दोघं घरी आली. आणि त्या दोघांचे हृदय भरून आले होते.