सोनीचे लग्न 5
रामू निघाला. सोनी त्याला दारापर्यंत पोचवायला गेली. रामू मागे वळून पाहात होता. सोनी तेथेच उभी होती. रामू वळला, दिसेनासा झाला. तरी सोनी तेथेच उभी होती.
घरात साळूबाई व मनूबाबा दोघे होती. साळूबाई जायला निघाली, परंतु म्हातार्याने तिला थांबविले.
“साळूबाई. जरा थांबा. थोडं बोलू आपण.” तो म्हणाला.
“घरी चुलीवर दूध आहे. उतास जाईल.” ती म्हणाली.
“सोनीला पाठवू. ती दूध उतरून ठेवील.” म्हातारा म्हणाला.
“बरे तर. सोने, अग सोन्ये!” तिने हाक मारली.
“काय रामूच्या आई?” सोनीने येऊन विचारले.
“आमच्या घरी जा व तेवढं चुलीवरचं दूध तापलं म्हणजे उतरून ठेव. झाकून ठेव. भाकर्याही झाकल्या नसतील तर झाकून ठेव. मी लवकरच येत्ये म्हणून सांग. त्यांना थोडा चहा हवा असला तरी करून दे. अलीकडे त्यांना जरा दमा लागतो. तुला येतो की नाही करता?” साळूबाईने विचारले.
“हो. देईन करून. जाऊ मी? जाते हं बाबा.” असे म्हणून ती गेली. आता ती दोघेच तेथे होती. मोकळेपणाने बोलता आले असते.
“काय बोलणार आहात मनूबाबा?” साळूबाईने विचारिले.
“सोनी आता मोठी झाली. तिचं लग्न नको का करायला?”
“हवं करायला. मी कधीच तुम्हाला म्हणणार होत्ये, पण म्हटलं की तुम्हांला वाईट वाटेल. सोनी सासरी गेली की तुम्ही एकटे राहाल. सोनीच्या दूर जाण्याचा विचारही तुम्हाला सहन होणार नाही. परंतु आता हवं हो करायला लग्न. सारं रीतीनं वेळीच झालं पाहिजे. नाही का?”