Get it on Google Play
Download on the App Store

संपतरायाचे लग्न 1

“संपत, लग्नाला तयार आहेस ना? होय म्हण. मी माझी इच्छा तुझ्यावर लादीत आहे असे नाही. परंतु इंदुमतीसारखी मुलगी मिळणं कठीण. सारं तिला येतं. ती चांगला स्वयंपाक करते, चांगली चित्रं काढते. तिला शिवणं, टिपणं, कशिदा काढणं, सारं येतं. वाचते किती छान व कविताही म्हणे करते. एवढी श्रीमंताची मुलगी, परंतु आळस तिला माहीत नाही. तिला गर्व नाही. कोणाला टाकून बोलत नाही. दिसायला सुंदर, तशी मनानं सुंदर. संपत, त्या मुलीचा तू अंत पाहू नकोस. अधिक ताणल्यानं तुटतं. झाडाला वेळीच पाणी मिळालं तर ते नीट जगतं, वाढतं, फळाफुलांनी संपन्न होतं. परंतु झाडाची मुळं सुकून गेल्यावर कितीही पाणी घातलं तरी काय उपयोग? इंदुमतीचा बाप आशेने इतकी वर्षं थांबला. शेवटी त्राग्यानं दुसरीकडे कुठं मुलीला देऊन टाकील. मुलीला पुढं जन्माचं दु:ख,- कारण तिचं तुझ्यावर प्रेम आहे. सांग-सांग काय ते, झाला का निश्चय?” पित्याने विचारले.

“बाबा, लग्नाला मी तयार आहे. तुमच्या इच्छेविरुद्ध मी नाही. इतके दिवस तुमच्या मनाला त्रास झाला, त्याबद्दल क्षमा करा. परंतु काही कारणामुळं मी थांबलो होतो. इंदुमतीच्या प्रेमाचीही परीक्षा होत होती. आता तुम्ही ठरवाल तो मुहूर्त. तुम्ही हाक मारलीत की मी उभा राहीन.” संपत म्हणाला.

संपतराय व इंदुमती यांचा विवाह ठरला. मोठ्यांकडचे लग्न म्हणजे जणू सार्‍या गावाचे. सारे लोक खपत होते. मोठे मंडप घालण्यात आले. हंड्या, झुंबरे वगैरे थाट होता. आणि आमचा मनूबाबा! त्याने नवरदेवासाठी हळुवार हाताने नाजूक तलम वस्त्रे विणली. नववधूसाठी वस्त्रे विणली. त्याला भरपूर मजुरी मिळाली. लहानग्या मुलीसाठी ती झाली.

लग्नाचा दिवस आला. मोठा सोहळा झाला. लग्न लागले. वधूवरांनी परस्परांस माळा घातल्या. बार वाजले, वाजंत्री वाजली, चौघडे वाजले. रात्री मोठी वरात निघाली. घोड्यावर बसून वधूवरे जात होती. चंद्रज्योती लावल्या जात होत्या. मनूबाबा त्या लहान मुलीला वरात दाखविण्यासाठी उभा होता. ती लहान मुलगी वरात बघत होती. घोड्याकडे बोट दाखवीत होती. संपतरायाचे लक्ष त्या मुलीकडे गेले. त्याच्या डोळ्यांत पाणी आले. आईवेगळी मुलगी. अरेरे!

गावात मोठी मेजवानी झाली. झाडून सार्‍या गावाला लाडू मिळाले. परंतु मनूबाबा जेवायला गेला नाही. त्याच्या घरी लाडू पठविण्यात आले. त्या लहान मुलीला सुंदर कपडे पाठविण्यात आले. परंतु मनूबाबाने ते बोळलेणे मुलीच्या अंगावर घातले नाही. त्याने ते कपडे तिला चढविले नाहीत. तो म्हणाला, “मी माझ्या श्रमानं ते मिळवीन व बाळलेणं करीन. मी स्वत: सुंदर वस्त्र विणीन व त्या आंगडी या मुलीला करीन, लोकांची कशाला?”

मनूबाबा

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
जन्मभूमीचा त्याग 1 जन्मभूमीचा त्याग 2 जन्मभूमीचा त्याग 3 एकाकी मनू 1 एकाकी मनू 2 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 1 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 2 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 3 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 4 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 5 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 6 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 7 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 8 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 9 सोने परत आले 1 सोने परत आले 2 सोने परत आले 3 सोने परत आले 4 सोने परत आले 5 सोने परत आले 6 संपतरायाचे लग्न 1 संपतरायाचे लग्न 2 संपतरायाचे लग्न 3 सोनी 1 सोनी 2 सोनी 3 सोनी 4 सोनी 5 सोनी 6 सोनी 7 सोनी 8 सोनी 9 सोनी 10 सत्य लपत नाही 1 सत्य लपत नाही 2 सत्य लपत नाही 3 सत्य लपत नाही 4 सोनीचा नकार 1 सोनीचा नकार 2 सोनीचा नकार 3 सोनीचा नकार 4 सोनीचा नकार 5 सोनीचा नकार 6 सोनीचे लग्न 1 सोनीचे लग्न 2 सोनीचे लग्न 3 सोनीचे लग्न 4 सोनीचे लग्न 5 सोनीचे लग्न 6 सोनीचे लग्न 7 सोनीचे लग्न 8 सोनीचे लग्न 9 सोनीचे लग्न 10 सोनीचे लग्न 11 जन्मभूमीचे दर्शन 1 जन्मभूमीचे दर्शन 2 जन्मभूमीचे दर्शन 3